* वाई ,पाचगणी व महाबळेश्वरचे कलापर्यटन *
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
लोकसत्ता - 24 फेब्रूवारी 2024 . पर्यटन विशेषांक .
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
वाई ,पाचगणी आणि महाबळेश्वर ही महाराष्ट्राची नावाजलेली ठिकाणे आहेत . वाई हे पर्यटनाच्या दृष्टीने तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते, काही जण वाईला दक्षिण काशी असेही संबोधतात . तीर्थक्षेत्र ही जशी वाईची ओळख आहे तसेच फार पूर्वीपासून विद्वान मंडळीचे गाव किंवा विश्वकोश निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींमुळे वाईला महत्व प्राप्त झाले आहे .
वाई पासून बारा कि .मी अंतरावर पसरणीचा वेडावाकडा घाट पार करून पोहचले की थंडगार वाऱ्याच्या झुळका सुरु झाल्या की ओळखायचे आपण पाचगणीत पोहचत आहोत . पर्यटनाच्या दृष्टीने थंड हवेचे ठिकाण म्हणून पाचगणीला ओळखतातच पण त्याहीपेक्षा ब्रिटींशानी सुरु केलेल्या रेसिडेन्सल बोर्डींग स्कूल्समुळे पांचगणीला एक नवी ओळख मिळाली आहे .
महाबळेश्वर हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नंदनवन व उंचावर असलेले गिरिस्थान आहे . थंड हवेच्या ठिकाणाबरोबरच महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणूनही महाबळेश्वरला महत्व आहे . क्षेत्र महाबळेश्वर येथील पुरातन पंचगगा व कृष्णाबाईचे मंदीरे , कृष्णा नदीचे उगमस्थान व पंचनद्याचे संगमस्थान यामुळे तीर्थक्षेत्र म्हणूनही प्राचीन काळापासून क्षेत्रमहाबळेश्वर सुप्रसिद्ध होते . अशा या महाबळेश्वर पाचगणीला खऱ्या अर्थाने विकसित करण्याचे श्रेय मात्र ब्रिटिशांना किंवा गोऱ्यासाहेबांना दिलेच पाहीजे . याचे मुख्य कारण म्हणजे येथील थंडगार हवा , सुंदर वनश्री , आल्हाददायक वातावरण ही वैशिष्ठये असली तरी या ठिकाणाला येण्यासाठी चांगले रस्ते नव्हते . राहण्यासाठी प्रशस्त बंगले , निवासस्थाने , क्लब्ज , बाजारपेठ , नव्या सुंदर पॉईंटसचा शोध घेऊन तेथपर्यंत अवघड डोंगराळ जागी पोहचण्यासाठी लागणारे रस्ते विकसित करण्याचे काम ब्रिटीश राजवटीत सुरु झाले . पुणे किंवा मुंबईतील असह्य उकाड्यामुळे उन्हाळ्यातील मे महिन्यात व्हाईसरॉय , गव्हर्नरसाहेब यांनी राज्यकारभार करण्यासाठी महाबळेश्वर येथून राजभवन किंवा गव्हर्नर हाऊस नावाचे प्रशस्त बंगले बांधले व खऱ्या अर्थाने पर्यटनाची कारकीर्द सुरू केली . या ठिकाणांचा प्रसार व प्रचार केला त्यामुळे अनेक ब्रिटीश अधिकारी व भारतातील राजे , श्रीमंत व्यापारी , प्रसिद्ध उदयोजक त्यांची बायका मुले सर्व परिवार घेऊन मित्रमंडळीसोबत सातत्याने येथे येऊ लागली व हळूहळू खऱ्या जीवनावश्यक सुविधा येथे पुरविल्या जाऊ लागल्या . त्याचबरोबर अनेक इंग्रज कलाकार मंडळी येथे निसर्गचित्र काढण्यासाठी येऊ लागले .
परमेश्वराकडे माझ्या अनेक तक्रारी आहेत पण एका गोष्टीविषयी मी सतत त्याचा कृतज्ञ आहे की त्याने माझा जन्म व बालपण पाचगणीसारख्या सुंदर निसर्गरम्यस्थानी घालवले . लोकसत्ताने जेव्हा या तीन ठिकाणी चित्रकाराच्यादृष्टीने या पर्यटनस्थळांचे काय महत्व आहे असा विषय मांडायला सांगितले त्यावेळी जवळपास पन्नासवर्षांपासूनचा एका कलाकाराचा समृद्ध जीवनपटच माझ्या डोळ्यापुढे सरकला . सगळ्या आठवणी जाग्या झाल्या सष्टपणे डोळ्यासमोर चित्र दिसू लागले .
साधारण पन्नासपूर्वी म्हणजे 1975 च्या दरम्यान आम्ही मुले पाचगणीच्या मराठी शाळेत शिकत होतो . त्या कोवळ्या आठ दहा या बालीश वयात पाचगणीच्या गावाबाहेर जकात नाक्याशेजारी एका शनिवारच्या अर्ध्या दिवसाच्या शाळेनंतर आम्ही मुले शाळा सारावण्यासाठी शेण गोळा करायला जात होतो . त्यावेळी त्या दुपारच्या शांत वेळी एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले . एक वयस्कर जाडजूड रिचर्ड ॲटनबरोसारखा दिसणारा गोरापान म्हातारा माणूस डोक्यावर मोठी फेल्टहॅट घालून रंगाची एक मोठी पेटी घेऊन छान ब्रशेस कागदाचे पॅड घेऊन बिलिमोरीया स्कूलच्या बाहेर मुख्य रस्त्याच्या कडेला निवांतपणे एक चित्र काढत होता . हा म्हातारा नेमके काय करतोय हे पाहण्यासाठी उत्सुकतेपोटी आम्ही मुले त्याच्या बाजूला गोळा झालो . अतिशय व्यवस्थित काटेकोरपणे समोरच्या दृश्याचे पेन्सीलने केलेले रेखाटन व सुंदर रंगसगतीने चित्रित केलेले कृष्णाव्हॅलीचे ते पाहिलेले पहीले
डेमोन्सस्ट्रेशन नंतरच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले . सगळी मुले गेली पण मी मात्र या गोऱ्या चित्रकाराचा शेवटपर्यंत पाठलाग केला . त्यावेळी ते गृहस्थ पाचगणीच्या प्रसिद्ध एम आर ए या राजमोहन गांधी यांच्या संस्थेत गेले . पुढे मोठे झाल्यानंतर त्यांचे नाव व कार्य कळले . या चित्रकाराचे नाव होते गॉर्डन ब्राऊन . हे मूळचे ऑस्ट्रेलियाचे पण त्यांनी नैतिक पुनरुत्थान केन्द्र (MRA ) ही संस्था उभी करण्यासाठी आर्किटेक्ट म्हणून फुकट काम केले . राजमोहन यांच्या प्रेमाखातर ऑस्ट्रेलियातून स्वखर्चाने येऊन संस्थेचे वास्तूनिर्मितीचे नियोजन व पूर्ण त्रेसष्ट एकरात एक भव्य प्रकल्प उभा केला . पण येथील सुंदर वातावरण , टेबललॅन्डची पठाराखालची संस्था , कृष्णा व्हॅलीची , रस्त्यांची त्यांनी अनेक चित्रे जलरंगात साकारली . त्यातील काही चित्रे एम आर ए या संस्थेच्या इमारतीमध्ये आजही पाहता येतात .
त्यानंतर कलाशिक्षक सुभाष बोंगाळे यांनी अनेक चित्रे जलरंगात जागेवर जाऊन रेखाटलेली आहेत . हिरव्या शेवाळी रंगाच्या सायकलला एक पाठीमागे स्टॅन्ड बांधून रंगाचे सामान घेऊन सिडने पॉईंटच्या व्हॅलीत बोंगाळे सर सतत स्केचिंग व लॅन्डसेकप्स करत बसायचे . पाचगणीच्या या संराच्या चित्रनिर्मितीच प्रेरणा घेऊन मी या लेखाचा लेखक सुनील काळे आयुष्यभर या परिसरात रेखाटणे करत व जलरंग वापरून सातत्याने तीस पस्तीस वर्ष चित्र काढत राहीलो आहे . कृष्णानदीच्या किनाऱ्यावर धोमधरण बांधल्यानंतर पाचगणीच्या विविध भागातून दिसणारे विहंगम दृश्य , चिखली , पसरणी या गावांची बारावाडीची दिसणारी भातशेती , चमकणाऱ्या सह्याद्री पर्वताच्या रांगा , पाचगणीचे दुतर्फा रस्त्याच्या बाजूला असलेली भव्य वडाची झाडे , अशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सपाट पठार म्हणून प्रसिद्ध असलेली टेबललॅन्डची पठारे या पाच पठारावरून दिसणारे पाचगणी गावाचे दृश्य विलोभनीय दिसते . खिंगर , दांडेघर , आंब्रळ , राजपुरी , तायघाट , भिलार या सभोवतालच्या गावामध्ये पसरलेले शंभर एकरचे एकेक सपाट पठार रंगवणे हे आयुष्यभर आनंद देणारे कार्य ठरले . ब्रिटिशांनी त्यांच्या मुलांमुलीसाठी येथे प्रथम त्यांचा जॉन चेसन नावाचा रिटायर्ड ऑफीसर पाठवून भरपूर अभ्यास केला . सिल्व्हर वृक्षाची झाडे लावली . प्रत्येक वर्षातील बारा महिन्यांचे तापमान पाहून तीनही ऋतूमध्ये काय काय फरक दिसतो याच्या सविस्तर नोंदी केल्या . रिकाम्या पसरलेल्या जागेत मोठ्या शाळा व राहण्यासाठी वसतिगृहे बांधली बंगले बांधले . रस्त्यांचे नियोजन केले . स्ट्रॉबेरी , बटाटा , कॉफी व इतर अनेक फळझाडे वृक्षांची लागवड केली . नगरपालीका बांधली . ऑफीसर्स राहण्यासाठी विश्रामगृहे बांधली . प्रथमच टेबललॅन्डच्या पायथ्याशी शाळा बांधली या शाळांपैकी सेंट जोसेफ स्कूल , किमिन्स स्कूल , सेंट पीटर्स स्कूल , यांनी सव्वाशे वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे .
परंतू सव्वाशे वर्ष होवूनसुद्धा आजही किमिन्स , सेंट जोसेफ या शाळांमध्ये उत्तम दर्जाचे सुशिक्षित कलाशिक्षक नसल्याने चांगले कलाकार निर्माण झाले नाहीत किंवा कलापरंपरां निर्माण झाली नाही . चित्रसंस्कृती टिकून राहीली नाही ही दुर्देवाची गोष्ट आहे .
सुनील व स्वाती काळे या दाम्पत्याने मात्र या परिसराचा सखोल अभ्यास करून येथील किमिन्स , सेंट पीटर्स , बिलीमोरीया , या शाळांसोबत अनेक ब्रिटीशकालीन बंगले , पारशी लोकांचे बंगले , अग्यारी , चर्चेस , या वास्तूंचे जलरंगात चित्रिकरण केले . गावातील मुख्यरस्ते , सुंदर वनश्री , गार्डनमधील फुले , कुंड्या , कॉसमॉस , हॉलिहॉक्स ,वॉटरलिलीज , रानफुले तैलरंगात रंगवून पाचगणीचा निसर्ग अनेक मान्यवर कलाप्रेमी मंडळीच्या घरी व अनेक देशात चित्रे विकली त्यामुळे पाचगणी ,महाबळेश्वर व वाईपरिसरातील चित्रकार म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे . नुकतेच त्यांचे प्रदर्शन नेहरू सेंटर येथील AC व सर्क्युलर आर्ट गॅलरीमध्ये भरले होते त्याठिकाणी त्यांनां चित्र रसिकांकडून भरघोस अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला .
वाई हे ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या खूप महत्वाचे गाव आहे . लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी विश्वकोष निर्मितीचे संपादक मंडळाचे प्रमुख म्हणून अनेक वर्ष काम केले . त्याकामासाठी अनेक तज्ञ व नावाजलेले चित्रकार वाई येथे कलासंपादक म्हणून येऊ लागले .
प्रसिद्ध चित्रकार व जेजे स्कूल ऑफ मुंबईचे डिन असलेले ज . द . गोंधळेकर वाईच्या विश्वकोषात काही वर्षांसाठी आले होते . त्यांनी गणपती घाट , मधलीआळी घाट , मेणवली घाट येथे पेनने व जलरंगात चित्रे काढलेली आहेत .
विश्वकोषासाठी विशेष नोंदी करण्यासाठी आलेले चित्रकार सुहास बहुळकर तर वाईच्या प्रेमातच पडले . त्याचे सुंदर वर्णन त्यांनी वाई कलासंस्कृती या पुस्तकात केले आहे . पेशवेकालीन पुण्याचे वास्तुवैभव , महिरपी खिडक्या , वाडयांचे दरवाजे , चौकटी , कोनाडे हे त्यांच्या चित्रांचे विषय आहेत . या विषयांची प्रेरणा घेऊन आकारसंस्कृती नावाचे त्यांनी केलेले प्रदर्शन खूप गाजले आहे .
वाईच्या घाटाची तर अनेकांनी चित्रे काढलेली आहेत त्यापैकी ना. श्री . बेन्द्रे यांच्या आत्मचरित्रात वाईच्या घाटाचे पेनने चित्र रेखाटलेले पाहता येते . वि .मा . बाचल मूळचे वाईचे . काही वर्ष त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम केले आहे . त्यांनी काढलेली रेखाटने व घाटाची चित्रे फर्ग्युसनच्या शताब्दी स्मरणिकेत पाहायला मिळतात .
वाईचे सु .पि .अष्टपुत्रे सर व गजानन वंजारी सर हे दोघेही वाईच्या द्रविड हायस्कूलमध्ये कलाशिक्षक होते . त्यांना ज्यावेळी वेळ मिळत असे तेव्हा ते गणपती घाटावर चित्रे काढायला यायचे . अष्टपुत्रेसर अपारदर्शक कलर्स म्हणजे पोस्टर कलरमध्ये व वंजारीसर तैलरंगमध्ये निसर्गचित्रे रेखाटतात . मूळचे पसरणी गावाचे पण सध्या इंग्लडमध्ये वास्तव्य असणारे तुषार साबळे यांनीही वाई घाटपरिसरातील , मेणवली घाटाची चित्रे रेखाटली आहेत .
सुप्रसिद्ध सिनेनट चंद्रकांत मांडरे , चित्रकार पी एस कांबळे , दिवाकर प्रभाकर, या जुन्या पिढीतील कलावतांनी वाईची चित्रे साकारलेली आहेत . बाळासाहेब कोलार , श्रीमंत होनराव (वाई) , यांच्या बरोबरच मिलींद मुळीक , संजय देसाई , शलैश मेश्राम , कविता साळुंखे , दिवगंत सचीन नाईक , कुडलय्या हिरेमठ (पुणे) , प्रफुल्ल सावंत , सागर गायकवाड (सातारा ) , संदीप यादव ( पुणे), अमोल पवार , निशिकांत पलांडे (मुंबई ), गणेश कोकरे (सातारा) विजयराज बोधनकर (ठाणे ) सुनील काळे अशा नव्या दमाच्या चित्रकारांनी वाई परिसरातील अनेक चित्रे काढलेली आहेत .
एडवर्ड लियर या ब्रिटीश चित्रकाराने वाईच्या घाटाचे केलेले सुरेख रेखाटन अरुण टिकेकर यांच्या ' स्थलकाल ' या पुस्तकात पाहायला मिळते . त्याचबरोबर जॉन फेड्रीक लिस्टर 1871 याने एलफिस्टन पॉईंटची व्हॅली रंगवलेली आहे . तर 1850 साली विल्यम कारपेंटर या चित्रकाराने प्रतापगडाचे विहंगम दृश्य रंगवल्याचे गुगलसर्च केल्यावर सापडले . एम.के . परांडेकर यांनी रेखाटलेल्या ऑर्थरसीट पॉईंटचे चित्र खूप प्रसिद्ध आहे . त्याचबरोबर अभिनव कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दिवंगत श्री . दिवाकर डेंगळे यांनीही पांचगणी वाई महाबळेश्वर येथील चित्रे जलरंगात रेखाटलेली आहेत .
प्रसिद्ध चित्रकार जहाँगीर साबावाला याचां महाबळेश्वरमध्ये बालचेस्टर नावाचा बंगला आहे . त्यामुळे त्यांनी महाबळेश्वरच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा त्यांच्या अमूर्त शैलीत ऑईलकलर मध्ये साकारले आहे . नाशिकचे शिवाजी तुपे यांनी घोड्यांचे पार्कींग असलेले इमारतीचे चित्र काढले आहे तर रवि परांजपे यांनी प्रसिद्ध पंचगंगेच्या मंदिराचे प्रवेशद्वार त्यांच्या शैलीत रेखाटले आहे .वासुदेव कामत यांनीही या परिसरात चित्रांकन केलेले आहे .
मेणवली घाट , धोमचे नरसिंहाचे मंदीर , गणपती घाट , गंगापुरी घाट , मधलीआळी घाट , भीमकुंडआळीचा घाट , असा घाटांचा परिसर व मंदिराचे गाव म्हणून जरी वाई प्रसिद्ध असले तरी या घाटांच्या आजूबाजूला वाढलेले स्टॉल्स , टपऱ्या , दुकाने , कातकऱ्यांच्या वस्त्या , स्थानिक नगरपालीकेचे व सर्व घरांचे नदीपात्रात सोडण्यात येत असलेले दुषित सांडपाणी उघडपणे कृष्णा नदीत राजेरोसपणे सोडले जाते . त्यामुळे ट्रॅफिकची प्रचंड वर्दळ , गोंगाट , उघडी नागडी नदीत अंघोळ करणारी माणसे, भांडीकुडी कपडे धुणारी व हागणदारी करत नदीशेजारीच झोपड्यात राहणारी माणसे प्रदुर्षण करतात . मंदिराशेजारची वाढणारी गलीच्छ वस्ती पाहीली की चित्र काढण्याचा चित्रकाराचा मूड जाण्याचीच जास्त शक्यता असते . त्यावर कोणाचेच नियंत्रण नाही . भंगारवाल्याच्या टपऱ्या , मेणवली जोर रस्त्यावर जाणाऱ्या जीपगाडया , छोट्या पुलावर बसणारे छोटे व्यावसायिक पाहीले की रस्त्यातून गाडया चालवणे किंब चालत जाणे एक मोठे संकट आहे . तरीही कलामहाविद्यालयाचे विद्यार्थी व चित्रकार येथे येऊन चित्र काढत बसतात . मेणवली घाटावर लेखी परवानगी घेऊन फी देऊन फोटो व चित्र काढावे लागते . मेणवली घाटावर उतरत असताना डाव्या बाजूला जवळच स्मशानभूमीची जागा आहे व त्याशेजारी उघड्यावरची हागणदारी पाहीली की येथे पैसे देऊन चित्र का काढावे असा प्रश्न पडतो . तेथे बसून चित्र काढावे असे कधीकधी वाटत नाही .
खूप वर्षांपूर्वी एकदा फलटणचे रघुनाथराजे निंबाळकर यांच्या घरी राहण्याचा योग आला होता . त्यावेळी औंधचे कलाप्रेमी बाळासाहेब पंतनिधी महाराज यांचे तैलरंगातील २ फूट बाय ३ फूट आकारातील एक मेणवलीच्या घाटाचे चित्र पाहायला मिळाले . त्या चित्रातील वातावरण व शांतता आता कधीच अनुभवता येईल असे वाटत नाही . सगळीकडे व्यापारीकरण सुरु आहे .
पाचगणीच्या टेबललॅन्डच्या पठारावर आता मोठी तटबंदी बांधली आहे . त्याच्या सभोवताली खाण्याच्या टपऱ्या व घोडागाडीची रेलचेल पाहीली की चित्र काढणाराच चकीत होतो . सगळीकडे हॉटेल्स व त्यांच्या जाहीरातीचे फ्लेक्स दिसतात त्यातून निसर्ग शोधावा लागतो . शिवाय अति गर्दीमुळे पर्यटकांचा त्रास असतोच . महाबळेश्वरला शनिवार रविवारी जायचे असेल तर घाटातच ट्रॅफीक जामचा अनुभव येऊन ड्रायव्हींग करताना मुंबई पुण्यासारखा इंच इंच लढवावा लागतो . प्रसिद्ध पॉईंटसवर चित्रे काढणाऱ्या चित्रकारानां परवानगी घ्यावी लागते अन्यथा तुमचे रेखाटलेले चित्र खोडणारे नतद्रष्ट येथे आहेत . नियमांचा बडगा दाखवून कलाप्रेमीनां काम करताना बंद पाडणारे हाकलून देणारे महाभाग येथे आहेत . त्यामुळे कलेविषयी सातारा जिल्हयात अनास्था भरपूर आहे .
संपूर्ण सातारा जिल्हयात एकही कलादालन नसल्याने चित्रकारांनी काढलेली चित्रे प्रदर्शित करण्यासाठी कोठेही जागा नाही . कापडाच्या बांबूच्या कनाती बांधून नाटक असल्यासारखे प्रदर्शन करावे लागते . येथे अनेक व्यावसायिक मंडळी , राजकीय पुढारी , मुख्यमंत्री , आमदार ,खासदार , शिवरायांचे वशंज राजेमंडळी आहेत पण जिल्ह्यात वाई ,पाचगणी ,महाबळेश्वर , सातारा , कराड येथे कोठेही सुसज्ज चित्रप्रदर्शनासाठी कलादालन नाही आणि याची कोणाला लाज वाटत नाही . सगळ्या चित्रकारानां नाईलाजाने पुण्यामुंबईत प्रदर्शनासाठी जावे लागते . एकंदर कलेविषयी खूप लाचार अनास्था या पर्यटनस्थळी आहे . त्यामुळे प्रदर्शने भरत नाहीत , कलाप्रेमी तयार होत नाहीत व कलारसिकही नाहीत .
एकंदर परिस्थिती गंभीर आहे पण चित्रकार मात्र मनाने खंबीर आहेत .
आजही चित्रकार मनापासून चित्रे रेखाटत आहेत व भावी पिढीचेही नवे चित्रकार भविष्यातही चित्रे रेखाटत राहतील कारण निसर्गाची ओढ, जुन्या स्थापत्यशैलीतील मंदीरे,घाट, सहयाद्री पर्वताच्या डोंगरांच्या दूर पसरलेल्या रांगा , भव्य सपाट टेबललॅन्डची पठारे कायम चित्रकारानां प्रेरणा देत राहणारच आहेत . चित्रकारांची ही चित्रे आणखी काही वर्षांनी इतकी महत्वाची असतील कारण जे वेगाने बदल होत आहेत त्या बदलांचे हे एक प्रकारे दस्तीकरण होत असते .निसर्गदेव सदैव दोन्ही हातांनी भरभरून देत राहणार आहे . माणूस नावाचा प्राणी मात्र निसर्गाची वाट लावायला रोज नवी यंत्रणा राबवतो , त्याच्या कुठे तरी भलताच ' विकास ' करण्याच्या प्रयत्नांनां मात्र लगाम घातला पाहीजे .
सुनील काळे ✍️[चित्रकार]
9423966486
Sunilkaleartist@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा