ब्लॉग संग्रहण

शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०२५

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड

 दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

       आपल्यापैकी प्रत्येकाच्या रोजच्या जगण्यात  वेगवेगळ्या वयाची ,वेगवेगळ्या स्वभावाची ,अठरापगड जातीधर्माची , अतिशय वेगवेगळ्या विचारांचा पगडा असलेली , धार्मिक , राजकीय एकमत नसलेली  तर अगदी विरुद्ध विचारधारा व विरुद्ध टोकाची विचारसरणी असलेली अनेक माणसे जीवनप्रवासात भेटत असतात . काहीजण भेटल्यानंतर लगेच विस्मृतीत जातात,काही थोडेच दिवस लक्षात राहतात व नंतर विसरली जातात तर काही कायमची लक्षात राहतात . कधीकधी तर ही कायम लक्षात राहिलेली माणसे आपल्या जीवन प्रवासाचा एक अविभाज्य भागच झालेली असतात . त्यांचे हे अचानक निर्माण झालेले अनोखे मैत्रीचे नाते मनात कायम टिकून राहते .

            आज मी अशाच एका दूरदेशीच्या मैत्रीची गोष्ट सांगणार आहे. जी माझ्या जातीची नाही , धर्माची नाही , माझ्या वर्णाची नाही , जी माझ्या देशाची नाही , इतकेच काय ती मला समवयस्कर देखील नाही . आमचे राहणीमान , आर्थिक परिस्थिती , भौगोलिक वातावरण , आवडीनिवडी वेगवेगळ्याच आहेत .तरी देखील आम्ही कितीतरी वर्षे एकमेकांचे अगदी पक्के घनिष्ट मित्र आहोत आणि ह्या मैत्रीच्या मनाचे गुंफलेले धागे दिवसेंदिवस अजूनच घट्ट बनत चालले आहेत.

           1996 साली माझे एक चित्रप्रदर्शन पाचगणीत सुरु होते . त्या ओपन प्लाझाटाईप आर्टगॅलरीमध्ये अनेक पर्यटक येत होते . प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत होता.  एके दिवशी अशाच या प्रदर्शनाच्या धामधूमीत माझे चित्रप्रदर्शन पाहुन झाल्यावर पंच्चाहत्तरीच्या वयाची , पांढरेशुभ्र केस , युरोपीयन गोऱ्या वर्णाची , चेहर्‍यावर सुरकुत्या पण तजेलदार चेहरा असलेली , काळा गॉगल व लालभडक शर्ट व पांढरी पॅन्ट परिधान केलेली , पाठीमागे छोटी हॅवरसॅक लटकवलेली एक म्हातारी आज्जीबाई अगदी अचानकपणे माझ्यासमोर चालत आली व काही कळायच्या आतच तिने गळ्याभोवती प्रेमाने हात टाकत मनसोक्त गळाभेट घेतली . या अचानक झालेल्या जादूच्या झप्पीमुळे मी क्षणभर गांगरलो , बावरुन गेलो आणि थोडा आश्चर्यचकीतही झालो .

युवर पेंटीग्ज आर वंडरफूल ! 

युअर डिस्पले ॲन्ड स्टाईल इज अलसो व्हेरी व्हेरी इंटरेस्टींग .

कॅन वुई टेक कप ऑफ कॉफी टुगेदर ? तिने तिच्या मनातील भावना व ओळख थोडक्यात  शेकहँड करत अशा प्रेमळ पद्धतीने व्यक्त केल्यामूळे मी नकार देऊ शकलो नाही . मी , स्वाती , तिचा मित्र व ती असे चौघे कॉफी घेत हॉटेलमध्ये बसलो .

माय नेम इज इल्झे , 

आय एल एस ई .

व्हेरी सिंपल नेम .शेकहँन्ड करत तीने स्वतःची ओळख करून दिली . 

आय एम फ्रॉम जर्मनी , माय सिटी नेम इज बॉन . बी ओ एन एन . 

आय एम रिटायर्ड आर्ट टिचर ,बट नाऊ  टोटली फ्रि . 

आय लाईक एन्जॉईंग माय रिटायर्ड लाईफ स्केचिंग इंडिया . इंडिया अँन्ड इंडियन पीपल आर व्हेरी व्हेरी इंटरेस्टींग . आय लाईक युवर्स पेन्टींग अँन्ड स्केचेस .

           माझी चित्रे तिला आवडली होती , त्याविषयी ती भरभरून बोलत होती . तिला कौतुक करताना किती बोलावे याचे जणू भानच राहीले नव्हते . मग तिच्या लक्षात आले व तिच्यासोबत आलेल्या लालबुंद चेहरा असलेल्या , हाफ शर्टावर फोटोग्राफरचे जॅकेट परिधान केलेल्या वयोवृद्ध मित्राची ओळख करून दिली . त्याचे नाव ग्वीन्टर जॉन . त्या भेटीमध्ये तीने माझा पत्ता घेतला आणि दुसऱ्या दिवशी ती ग्वीन्टर सोबत माझ्या पाचगणीच्या त्या छोट्या घरात आली . तिचं जर्मनमिश्रित इंग्रजी आणि माझे मराठी गावरान इंग्रजी एकमेकाला मात्र थोडे थोड़े समजत होते .

            इल्झे आणि तिचा मित्र ग्वीन्टर दोघेही जर्मनीत बॉन नावाच्या शहरात राहत होते . तिथे तिचे 125 वर्ष जुने अनेक खोल्यांचे घर आहे . आणि तेथे ती एकटीच राहत असते . जर्मनीत डिसेंबरच्या सहा महिन्याच्या काळात अतिशय थंडी व बर्फ कोसळत असल्याने मायनस दहा डिग्रीच्या कडाक्याच्या थंडीमुळे घरात इलेक्ट्रीक हिटर बसवावा लागतो . त्या हिटरचे इलेक्ट्रीकचे इतके बिल येते की त्या बिलाच्या रकमेमध्ये सहा महिने भारतात राहायला परवडते . त्यामूळे अनेक वर्षांपासुन ते भारतात स्केचिंग करत भटकत असतात.

           ग्वीन्टर 85 वर्षांचा असुन तो पूर्वी जर्मन राजदूतांच्या सरकारी कार्यालयात नोकरी करायचा . जर्मनीत ते वेगवेगळ्या घरांमध्ये राहतात , पण दोघांना चित्रांची व स्केचिंगची आवड असल्याने ते भारतात एकत्र फिरतात .

या वयात असे मैत्रीपूर्ण संबध ठेवून एकत्र राहत , एकत्र भटकंती करत असताना तुमच्या दोघांचे कुटुंबिय काही तक्रार करतात का? मी आपला भारतीय , मराठमोळा प्रश्न विचारल्यानंतर इल्झे मनसोक्तपणे हसली .मग तिने तिच्या कुटूंबाविषयी माहिती दिली . इल्सेला दोन मुली व एक मुलगा सगळे वयाच्या पन्नासच्या पुढे . इल्सेचा नवरा कॅसिनो व गॅम्बलींगमध्ये बरबाद झाला. घटस्फोटानंतर इल्सेने सर्व जबाबदारी स्विकारली आर्ट टिचरची नोकरी केली आणि आपल्या सर्व मुलानां उत्तम शिक्षण दिले . जावई , सुना , नातवंडे सगळा भरपूर मोठा परिवार आहे. प्रत्येकजण सेटल आहे. प्रत्येकाची मोठी घरे आहेत व सर्वजण वेगवेगळे राहतात. त्यांच्या संसारात मग्न आहेत . पण आपण कोणालाही ओझे वाटता कामा नये यासाठी ती वेगळे राहणे पसंद करते . तिला चित्रे काढायला , स्केचिंग करायला भटकायला आवडते . योगायोगाने ग्वींटर तिच्याच शहरात राहणारा तोही समवयस्कर . त्याची पत्नी अजारपणात गेली . मुले सेटल आहेत .पण दोघांनीही नात्याच्या गुंत्यात स्वतःला गुरफटून घेतले नाही . मग या दोघांची निरागस मैत्री सुरु झाली व स्वच्छन्दी भटकंती देखील .

               वयाच्या साठीनंतर तिला स्केचिंग , चित्रकला करत मनसोक्त भटकायचे होते त्याप्रमाणे कधी एकटी किंवा एकत्रपणे ती भारतात प्रत्येकवर्षी सहा महिने भटकत असते . वाराणसी , इंदोर , औरंगाबाद , राजस्थानमधील जोधपूर ,उदयपूर , जैसलमेर , मद्रास , पचमढी , भोपाळ , मांडू , अजिंठा , वेरुळ ' पाँडेचरी , हम्पी , कर्नाटक , गोवा , सातारा , वाई, पाचगणी , महाबळेश्वर , म्यानमार , बाली , जावा , जकार्ता , मलेशिया , थायलंड , इंडोनिशिया बँकॉक अशा सर्व ठिकाणी तिची मुशाफिरी सुरु असते . गेली पंचवीस वर्षे तिचा हा मुक्तप्रवास मजेशीरपणे चालू आहे.

             दरवर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ती पाचगणीला येते . ती भारतात आली की तिचा अचानक फोन येतो . प्रत्येक वेळी आठवणीने ती अपॉईंटमेंट घेतल्याप्रमाणे टायमिंग विचारते आणि ते कधीही आजपर्यंत चुकलेले नाही . तिला लाल एस.टी बसने प्रवास करायला आवडतो . त्याचे कारण म्हणजे एसटी स्वस्त आहेच पण त्यात बसणारी साधी माणसे प्रेमळ असतात व सुरक्षितपणे प्रवास करता येतो असे तिचे व्यक्तिगत मत आहे . आपली छोटी सॅक पाठीवर घेऊन ती सगळा भारत चित्रित करत बसमधूनच फिरत असते .

             एकदा तिने मला स्केचिंग करण्यासाठी माझ्या आवडत्या स्पॉटवर सोबत येण्याची विनंती केली. मग तिला इम्प्रेस करण्यासाठी मी माझे चित्रकलेचे सामान , ईझल (चित्रकलेचे स्टॅन्ड ), भरपूर पेन , ब्रशेस , वॉटरकलर्स ,पेन्सीली , बसायची खुर्ची , उन्हाची आऊटडोअरची मोठी छत्री , त्याचे लोखंडी स्टॅन्ड , व इतर अनेक सटरफटर वस्तू घेऊन पांगारी गावच्या व्हॅलीचे चित्र काढायला माझ्या मारुती व्हॅन गाडीतून निघालो . आमच्या दोघांनाही एकमेकानां स्पॉटवर चित्रे काढताना पाहण्याची इच्छा व उत्सुकता होती .

              पंजाबी ड्रेसमध्ये बसलेल्या इल्झेने मस्तपैकी जमीनीवरच बैठक मांडली . तिच्या जवळचे पाच बाय सात इंच आकाराचे छोटे स्केचबुक उघडले . त्यात एक बॉर्डर मार्किंग करायची चौकट होती . ती चौकट पेन्सिलीने आऊटलाईन करून तिची अतिशय छोट्या आकाराची जलरंगाच्या वड्या असलेली पेटी उघडली . तिच्याकडे एकच ब्रश होता तो दोन भागात विखुरलेला आट्या असलेला ब्रश तिने जोडला . युरीन टेस्ट करताना वापरतात तशी पाण्याची छोटी बाटली उघडली . अतिशय तत्परतेने तीने चित्र काढावयास सुरुवात केली . थोडे अमूर्त , थोडे मूर्त , इंप्रशेनिस्ट पद्धतीचे चित्र 15 मिनिटात संपले देखील . मग पाठीमागच्या बाजूला तिने मला स्पॉटविषयी माहिती विचारली . त्या दृश्याचे नाव ,गाव , वेळ लिहली मग माझ्याकडे हसत पहात म्हणाली माय वर्क इज फिनिश्ड . नाऊ यु स्टार्ट युवर वर्क .

             मी मात्र माझे सामान लावण्यातच अर्धा तास घालवला आणि मग दोन तीन तास माझे डिटेल स्केचिंग काम सुरु झाले . तोपर्यंत इल्झे सगळीकडे मनसोक्तपणे भटकून आली . तिचा स्केचिंगचा विचार , चित्राकडे , दृश्याकडे पाहण्याची दृष्टीच वेगळी होती . तिच्या चित्रानां कोणतीही अशी स्टाईल नव्हती . तिचे स्केचबुक म्हणजे एक छान प्रवासवर्णन होते . प्रत्येक चित्रामागे सारांशरुपाने लिहलेली माहिती ,वेळ ,दिनांक व्यवस्थितपणे लिहलेले होते . त्या प्रत्येक स्केचमध्ये मला कधी व्हॅनगॉग , पॉल क्ली, पिकासो , मोनेट , कधी कोलते , अवचट , चंद्रमोहन अशी वेगवेगळी चित्रकारांच्या पद्धतीने रेखाटलेली चित्रे दिसायची . कोणतेही एक चित्र दुसऱ्यासारखे नाही . मी तिला याविषयी विचारले तर म्हणाली चित्र काढताना मला त्यादिवशी ,त्यावेळेला ,त्याक्षणाला जे जाणवले ,भावले ते मी रेखाटले . 

नो डिस्कशन . 

विषय संपला .

              मी मात्र माझी पारंपारीक पठडी , डिटेल्स स्केच करायची सवय सोडलेली नसायची पण त्यावर तिने कधीही टिकाटिप्पणी केली नाही किंवा मला ती स्टाईल सोडण्यासाठी । सांगितले नाही उलट ती कौतुकाने म्हणायची एक्सलंट जॉब , एक्सलंट पेशन्स . इल्झेने  चित्रकलेतील कोणत्याही ईझम्सचा निषेध केला नव्हता . तिला सगळे ईझम्स सारखेच प्रिय होते , सगळ्यानांच तिने स्विकारले होते . आनंदाने ..........

            पुढे प्रत्येकवर्षांच्या भेटीमध्ये ती आणि मी वाईच्या गणपती घाटावर , मधल्या आळीतील घाट , मेणवलीचा फडणीसवाडा , पाचगणी व महाबळेश्वरच्या परिसरातील  शेरबाग , आर्थरसीट , राजभवन , लॉडवीक पॉईंटला भटकत स्केचिंग करायचो खूप फिरायचो . तिला कोणत्याही विषयाचे वावडे नसायचे . डोंगर , दरी , रस्ता , झाडे , इमारत , बंगले काहीही विषय असो ती सगळे अगदी प्रेमाने चित्रित करायची . तिच्या स्वतःच्या स्टाईलने . तिचा ऐशींव्या वर्षाचा सातत्याने स्केचिंग करण्याचा उत्साह पाहून मी चकीत व्हायचो . बिनधास्तपणे अनोळखी गावांमध्ये फिरण्याची सवय , परका देश , परकी माणसे याविषयी तिची कसलीही तक्रार नसायची . तिची चित्रांची छोटी सॅक पाठीवर घेऊन कोणी सोबत असो वा नसो ती आयुष्यातील प्रत्येक क्षण भरभरून जगते .

           मग मला माझी आपल्याकडची काही म्हातारी माणसे आठवतात . सांधेदुखी , गुडघेदुखी , हातपाय सुजलेले दाखवत राहतात . अनेक आजारांनी मानसिक व शारिरीक दृष्टीने खंगलेली एकाच जागेवर पडून राहीलेली असतात . प्रवासाचे नाव जरी काढले तरी अनेक अडचणी सांगत टाळाटाळ करत राहतात . काहीजण जुन्या घडलेल्या वाईट गोष्टींवर राजकारण , सरकार , व नातेवाईकांविषयी सतत टिकात्मक बोलून टिव्ही पहात स्वतः व इतरानाही अस्वस्थ करणारी मंडळी आठवत राहतात . अर्थात काही अपवाद असतात , सगळीच वयस्कर माणसं त्रासदायक नसतात .

              इल्झेचे व्यक्तिमत्व मात्र या सर्वांपेक्षा वेगळेच आहे . स्वतः नकाशा घ्यायचा , त्या गावाची शहराची माहीती काढायची , तिथल्या कोणत्या स्पॉटवर चित्रे काढता येतील याचा अभ्यास करायचा . हॉटेल बुक करायचे ,एसटीचे वेळापत्रक घ्यायचे . कोणतीही एसटी वेळेवर आली नाही म्हणून ती कधीही वैतागलेली दिसली नाही .एसटी मध्ये फाटलेल्या सीटाबद्दल , असुविधांबद्दल तिची कोणतीही तक्रार नाही. जे नानाविध प्रकारचे चांगले वाईट जेवण मिळेल ते आनंदाने खायचे , कोणत्याही अनोळख्या स्त्रीया , माणसांबरोबर मैत्री करायची त्यांच्या मुलानां खाऊ द्यायचा . त्यांच्याबरोबर मोबाईलने असंख्य फोटो काढायचे . बुरखा घातलेली एखादी मुस्लिम स्त्री दिसली की तीचा बुरखा उघडायचा व त्या बाईबरोबर हातात हात घालून एक हसतमुख फोटो काढण्यासाठी  त्याच बाईच्या सोबत असलेला तिच्याच नवर्‍याला सांगायचे ही तिची हॉबी ती पुरेपूर एन्जॉय करते . आपल्या या सहा महीन्यांच्या प्रवासात भरपूर स्केचबुके घेऊन ती समाधानाने जर्मनीला जाते . तेथे गेल्यावर सर्व ओळखीच्यानां आवर्जून पत्रे लिहते . स्वतः ई मेल करते व तिच्या अनुभवाबद्दल केलल्या मदतीबद्दल भरभरून लिहते . 

            गेली पंचवीस वर्ष मी आणि स्वाती करत असलेल्या आर्ट गॅलरीच्या संघर्षाची ती साक्षीदार आहे . येताना ती मुद्दाम जर्मनीची ब्रशपेन्स तर कधी छोटी स्केचबुके आणते त्याबदल्यात मी तिला कधी खास मदत करावी अशी तिची कधीही अपेक्षा नसते .आम्ही राहत होतो त्या सर्व चित्रविचित्र परिस्थितीचा तिने कधी तिरस्कार केला नाही . माझ्या अपयशावर टिकास्त्र सोडले नाही . उपदेशाचे डोस पाजले नाहीत .यावर्षी करोनाच्या महामारीमुळे डिसेंबर महिन्यामध्ये इल्झे भारतात आली नाही . यावर्षी मायनस वीस डिग्री सेल्सियस तापमानात बर्फामूळे पसरलेला ग्रे रंगाचा उदासिनपणा तिला भारताची आठवण करून देतो. युवर कंट्री इज कलरफूल , यु ऑल इंडियन्स आर वंडरफूल पीपल  असे सांगत इल्झे आता वॉटसअपवर कधी स्काईपवर व्हिडीओ कॉल करत खूप बोलत असते . तिने केलेली नवीन चित्रे दाखवत राहते .तिने माझी सगळी घरे पाहिलीत आता माझे नवीन घर पाहण्याची व परत त्या परिसरातील स्केचिंग करण्याची तीची ओढ आजही नव्वदाव्या वर्षी कायम आहे. 

ती फक्त करोना संपण्याची वाट पाहतेय ..........

            एकदा भारतातील प्रवास संपवून ती परत जर्मनीला जाण्यासाठी निघाली होती . कारण ग्वीन्टर ख्रिस्तवासी झाल्यामूळे ती आता एकटीच प्रवास करत होती . मी आणि स्वाती तिला शेवटचे भेटण्यासाठी महाबळेश्वरला हॉटेलवर गेलो होतो . तिच्या हातामध्ये छोटी चाके असलेली सुटकेस व पाठीमागे तिची फेव्हरेट छोटी चित्रांची सॅक होतीच . बाकी काही सामान नाही . मग मी तिला विचारले , असे परक्या देशात भटक्या विमुक्त जमातीसारखे फिरताना तुला भिती नाही का वाटत ?

त्यावेळी तिने दिलेले उत्तर आजही माझ्या कायम लक्षात आहे .

मित्रा , प्रवास खूप लांबचा आहे , 

मजेशीर आहे, 

आनंदाचा आहे , 

पण आपल्या प्रत्येकाचा प्रवास अचानकपणे कधीही संपू शकतो याची सतत जाणीव ठेवली पाहीजे . 

आपल्या या जीवनाच्या प्रवासात अनेक अडचणी येणार आहेत , अनेक कडू गोड अनुभव पाठीशी मिळणार आहेत. पण प्रवासात खूप मोठ्या अपेक्षा बाळगून, खूप नात्यांची गुंतागुंत वाढवण्यापेक्षा कमीत कमी सामान घेऊन मनाची आणि शरीरावरचीही जड ओझी टाळली पाहीजेत .


" शेवटच्या प्रवासात सामान खूप  कमी असले पाहीजे ". 


शेवटी आपले दोन्ही हात व मनही पक्षांप्रमाणे मोकळे असायला हवे मग झटपट कोठेही जाण्यासाठी आपण सदैव तयार असू .

जीवन प्रवासासाठी कसलीही जटील बंधने असू नयेत . 


" शेवटच्या प्रवासात सामान खूप कमी असले पाहीजे ". 


माझ्या वाई -पाचगणीच्या साध्या दोन दिवसाच्या प्रवासात गाडीतील डिकीत व पाठीमागच्या सीटवरील खच्चून भरलेल्या सामानाकडे सहज नजर टाकली की  मला या 

दुरदेशीच्या मैत्रीणीची आठवण येते व कानात शब्दही ऐकू येतात .


" प्रवासात सामान खूप कमी असले पाहीजे "

"प्रवासात सामान खूप कमी असले पाहीजे " 

🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳


सुनील काळे✍️

9423966486

sunilkaleartist@gmail.com

चित्रकार सदानंद बाकरे यांची आठवण

*चित्रकार सदानंद बाकरे यांची आठवण*
  🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭
                     आयुष्यामध्ये काही प्रसंग काही आठवणी अशा असतात की आपण किती जरी ठरवले की त्या विसरायच्या तरी ते शक्य होत नाही .काहीतरी प्रसंग असे येतात आणि त्या आठवणी परत नव्याने जागे होतात .आज संध्याकाळी सात वाजता आमच्या निसर्ग आर्ट गॅलरीच्या नेहमीच्या सकाळी १० ते ६ या वेळेनंतर अचानक एक कुटूंब चित्रप्रदर्शन पहायला आले . आमचा कामगार लगेच म्हणाला वेळ संपली , म्हणून ते परत जात होते इतक्यात मी माझा वॉक संपवून परतलो होतो . गेटच्या दारात त्यांची भेट झाली ते तरुण जोडपे दुचाकीवरून आले होते . रेनसूट घातला होता तरी पावसात भिजत आल्याने ओलेचिंब झाले होते . साताऱ्यावरून प्रवास करून आले होते रस्त्यात जाताना त्यानां निसर्ग आर्ट गॅलरीचा बोर्ड दिसला म्हणून त्यांनी विचारले होते . अचानक मला सदानंद बाकरे या मोठ्या चित्रकाराची आठवण झाली . मी त्यानां आमचे प्रदर्शन दाखवले थोड्या गप्पा मारल्या . दोघे तरुण जोडपे फारच खूष झाले . जाताना त्यांनी अनेकवेळा कृतज्ञता व्यक्त केली . त्या तरुण मुलाने माझ्यासोबत एक फोटो काढला. ते आनंदाने धन्यवाद देत गेले आणि माझी आठवणीची लेखणी सुरु झाली .
            कोकण हे सगळ्यांनाच आवडणारे ठिकाण आहे . कोकणातल्या बोटी समुद्र आणि नारळाच्या बागा ,जलदुर्ग , सागरकिनारे , बोटी हे रंगवणे हे मला आजही सर्वात आवडते काम वाटते . कारण कोकण व तेथील निसर्ग हा विषयच भारी आहे .  
            असेच एकदा कोकणाच्या दौऱ्यात चित्र काढायला गेलो असताना दापोली येथे गेलो होतो . दापोलीला छान कृषी महाविद्यालयामध्ये मुक्काम केला होता आणि जवळपास कोणकोणती ठिकाणे पाहण्यासाठी आहेत याचा शोध घेत होतो . त्यावेळी मुरुड ,अंजरले ,दिवेआगार ,बोर्डी , हरिहरेश्वर , श्रीवर्धन त्याच्याजवळ असणारे जीवनेबंदर या ठिकाणी चित्र काढण्यासाठी फिरत होतो . मुरुड मध्ये असताना आम्ही एका प्रायव्हेट बंगल्यामध्ये रहात होतो या बंगल्याचे मालक अतिशय बोलके आणि उत्साही गृहस्थ होते . त्यांचे आडनाव श्री .मुरुडकर . त्यादिवशी मी परिसरातील चित्र काढून आल्यानंतर रात्री जेवत असताना मी चित्रकार आहे हे सांगितले .  माझी चित्रे पाहिल्यानंतर त्यांनी सांगितले की मुरूडमध्ये आमच्या येथे एक वयस्कर प्रसिद्ध चित्रकार राहतात त्यांचे नाव सदानंद बाकरे आहे . परंतु हे चित्रकार अतिशय लहरी एककल्ली व विचित्र वागतात पूर्वी मी त्यांना जेवणाचा डबा पुरवायचो . परंतु त्यांच्या जेवणासाठी इतक्या तक्रारी असायच्या की आता संपूर्ण गावामध्ये त्यांना जेवण देण्यासाठी कोणीही जात नाही .हे चित्रकार मोठे असून पूर्वी परदेशातही राहत होते असे आम्हा गाववाल्यानां माहिती आहे . तुम्ही त्यांना जरूर भेटा. 
         त्यांनी आवर्जून सांगितल्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांना सोबत घेतले व तिघेजण  बाकरेसरांच्या बंगल्यावर गाडी घेऊन गेलो .
          आम्ही बंगल्यात प्रवेश करण्यापूर्वीच आतून एका वयस्कर व्यक्तीचा मोठ्याने आवाज आला . कोण आहे रे तिकडे ? त्याबरोबर आम्ही लगेच थांबलो .आमच्या बरोबरचे श्री . मुरुडकर मालक यांनी लगेच पुढे जाऊन बाकरेसाहेबानां नमस्कार केला .पाचगणीवरून  निसर्गचित्रकार नवराबायको तुम्हाला भेटायला आलेले आहेत तर त्यांना भेटता येईल का ? असे विचारले . त्यांनी आतूनच विचारले अपॉईंटमेंट घेतलेली आहे का ? आम्ही त्यांना सांगितले की नाही .  त्यांना सांगा , पहिले आपण माझी अपॉईमेंट घ्या आणि मग भेटायला या . त्यांचे संभाषण चालू असतानाच मी त्यांना सांगितले की मी आता मुरुड सोडून दुसऱ्या गावाला चाललो आहे त्यामुळे मला नंतर भेटायला वेळ मिळणार नाही . त्यांनी आतूनच उत्तर दिले येथून 3km अंतरावर एसटी स्टॅन्डजवळ एक सार्वजनिक टेलीफोन आहे तेथे जा . तेथून मला फोन करून माझी अपॉईमेंट घ्या त्यानंतर मी फोनवर तुम्हाला वेळ देईन व त्यानंतर आपण भेटू .अपॉईमेंट घेतल्याशिवाय मी कोणालाच भेटत नाही . त्यामुळे येथून लगेच चला , चालू पडा . थांबू नका ? असे सडेतोडे उत्तर आल्यामुळे मी आणि स्वाती निराशेने बाहेर पडलो . प्रत्यक्ष माणूस समोर असताना टेलीफोन करून अपॉईमेंट का घ्यायची ? हे तंत्र मला कधीच समजले नाही . पुढे मी माझ्या व्यापात सदानंद बाकरे यांना विसरूनही गेलो
         2002 साली माझे जहांगीर आर्ट गॅलरी येथे ऑडिटोरियम हॉल येथे भव्य प्रदर्शन भरलेले होते . जहाँगीर आर्ट गॅलरीबद्दल बाकीचे लोक काहीही म्हणोत परंतु माझ्यासाठी चित्रविक्रीचे ते उत्तम ठिकाण आहे . त्यामुळे जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन करताना मी जास्तीत जास्त चित्रे घेऊन जात असतो . चित्र चालू असताना चित्रप्रदर्शन चालू असताना जी चित्रे विकली जातात ती मी ताबडतोब काढून ठेवतो आणि भरपूर स्टॉक सोबत असल्यामुळे नवनवीन चित्रे प्रत्येक वेळी डिस्प्ले करत असायचो . अशा या प्रदर्शनांमध्ये चित्रप्रेमी लोकांची खूपच प्रचंड गर्दी असायची आणि प्रत्येकाकडे बोलायला वेळ द्यायला लक्ष द्यायला पुरेसा वेळही नसायचा . प्रदर्शनात खूप कामे व भेटाभेटी असल्याने दिवस व्यस्ततेतच संपायचा .
            त्यावेळी एकदा दुपारच्या वेळी गॅलरीमध्ये एक अर्धा  बाह्याचा पांढरा झब्बा घातलेले ,निळी लुंगी खांद्यावर , सोबत एक पांढरी शबनम घेऊन एक वयस्कर गृहस्थ लंगडत लंगडत एका तरुण माणसाच्या हाताला धरून आत आले . त्यांच्याबरोबर आमच्या ओळखीचे प्रशांत शहा व आशुतोष आपटे , ज्ञानेश्वर ढवळे हे चित्रकार मित्र होते . या गृहस्थांना नीट चालता येत नव्हते तरीही ते कष्टाने लंगडत लंगडत चाललेले होते . त्यांच्या उजव्या पायाला मोठी जखम झालेली होती त्या पांढऱ्या बँडेजवर त्यांनी पॉलिथिनची साधी प्लास्टिकची पिशवी बांधलेली होती . आत येताच आशुतोष आपटे यांनी त्यांची ओळख  सांगितली सुनील हे प्रसिद्ध चित्रकार सदानंद बाकरे ते तुमचे प्रदर्शन पाहायला खास टॅक्सीने तब्बेत बरी नसताना हॉस्पीटलमधून आलेत .
         एका क्षणार्धात मी बाकरेंच्या मुरूडच्या आठवणीमध्ये  गेलो . मला लगेच आठवले  त्यांनी मला त्यांच्या घरी भेट घेऊन दिली नव्हती , त्यामुळे मी थोडासा रागाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले . बाकरेसाहेबांनी आशुतोष आपटे , ज्ञानेश्वर ढवळे , प्रशांत शहा यांच्याबरोबर माझे चित्र प्रदर्शन पाहिले स्वातीच्या फुलांची चित्रे व माझी पाचगणी महाबळेश्वर येथील निसर्गचित्रे पाहून ते खूप भारावले नंतर टेबलापाशी आल्यानंतर त्यांनी माझी गळाभेट घेतली .
        त्यावेळी मी त्यानां म्हणालो  मुरुडला तुमच्या घरी आलो होतो परंतु आपली भेट त्यावेळी झाली नाही ती भेट आज होणार होती . त्यावेळी माझ्याकडे मोबाईल फोन नव्हता , आता आहे .कोकणात पुन्हा कधी आलो की तुमची अपॉईमेंट घेऊनच येईन . त्यावेळी ते मला निराश स्वरात म्हणाले अहो ती माझी चूकच होती . कशाला आठवण काढलीत ?  आता म्हातारपणात हातपाय थकलेत . कोणाचा आधार नाही . त्यावेळचा जोष व हुशारी आता राहीली नाही . आता तर शरीरही साथ देत नाही . तुम्ही त्यावेळी आला होता त्यावेळी भेटलो असतो तर बरे झाले असते . आता काय शेवटचे दिवस उरलेत . येणारा दिवस ढकलतोय .
          आज कितीतरी दिवसांनी हॉस्पिटलमध्ये असताना मला तुमच्या दोघांविषयी टाईम्स ऑफ इंडियात आलेले " कलर्स ऑफ लाईफ " हे  आर्टिकल वाचायला मिळाले . मग मी हॉस्पिटलमधून तडक तुमचे चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी आलो आहे . खरे सांगतो , तुमच्या दोघांचे प्रदर्शन खूप छान , अप्रतिम आहे . मला खूप आवडले . त्यांनी पाठीवर हात ठेऊन कौतुकही केले . थोडा वेळ खुर्चीवर बसले व त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा प्रदर्शन पाहण्याची इच्छा व्यक्त केली त्यावेळी आमचे मित्र प्रशांत शहा मला  म्हणाले अरे मित्रा ,  
' काय नशीबवान आहेस ' अशी मोठी माणसे तुमच्या प्रदर्शनाला दाद देत आहेत . त्यांचा अभिप्राय घे व फोटो घे . त्यावेळी बाकरेसाहेबांनी आमच्या अभिप्राय वहीमध्ये त्यांची सही  करून थरथरत्या हाताने एक छोटासा अभिप्रायही लिहिला . त्यांच्या हाताला झालेला कंप जाणवत होता , थरथरत्या हाताने त्यांनी शेवटचा अभिप्राय लिहिला .त्यावेळी त्यांनी सांगितले मुरूडच्या घराबाहेर फिरत असताना त्यांच्या पायाला विषारी साप चावला .त्या दंशामुळे पायाला मोठी इजा झालेली आहे . स्वतःचे जवळचे कोणी नातेवाईक माणसे मदतीला नव्हती त्यामुळे योग्य उपचार झाले नाहीत . त्यासाठी ते मुंबईमध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते . आता जखम बरी झाली आहे . थोडेफार चालू शकत होते .
           त्यांनी प्रेमाने निरोप घेतला व आता फोन करू नको डायरेक्ट मुरुडला या असे आमंत्रणही दिले होते , परंतु नंतर मी त्यांच्याकडे परत गेलो नाही .आज कितीतरी वर्षानंतर  आलेल्या एका तरुण जोडप्यामुळे मला  त्यांची परत एकदा आठवण झाली . 
          केकू गांधी यांच्या गॅलरी केमोल्डमध्ये मी तीन वर्ष फ्रेमिंग सेक्शनमध्ये होतो . तेथे प्रोगेसिव्ह आर्ट ग्रुप स्थापन केलेले हुसेन , रझा , आरा , गाडे , सुझा , बाकरे यासारख्या जगप्रसिद्ध कलाकारांची चित्रे गॅलरी मधून फ्रेमिंगसाठी येत असत . त्यांच्या चित्रांच्या किमंतीचे आकडे ऐकले तरी कानाला शॉक लागल्यासारखे वाटायचे . त्यांची नावे चित्रकला क्षेत्रात मोठी दबदबा करणारी व आदराने घेतली जातात . त्यानंतर या ग्रूपमधले पांढरा झब्बा लुंगी घालून आलेले हताश चित्रकार सदानंद बाकरे जहाँगीर आर्ट गॅलरीत प्रत्यक्ष समोर पाहीले . त्यांची छबी कायम लक्षात राहीली . 
        एकदा सह्याद्री स्कूल ऑफ आर्टचे प्रकाश राजेशिर्के भेटले होते ते त्यांच्या संपर्कात होते . त्यांनी त्यांची दुर्देवी कैफियत थोडक्यात सांगितली . एका मोठ्या कलावंत चित्रकारांच्या उतारवयात काय उपेक्षा होवू शकते याची मला कहाणी त्यांना ऐकवली . मला बाकरेंच्या स्वभावाची प्रचिती आलेली होती त्यामुळे पुढे त्यांचे काय झाले याची मला आता पूर्ण माहिती नाही .
           गेटच्या दारात आलेला पाहूणा , मित्र किंवा अनोळखी व्यक्ती असो , तो गरीब असो वा श्रीमंत असो , चित्रकार असो वा सामान्य माणूस असो . मी त्याच्यासाठी प्रत्यक्ष गेटवर जावून त्याची दखल घेतो . दोन शब्द बोलतोच . कारण तो एक माणूस आहे आणि " माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहीजे " असे मला मनापासून वाटते .
       आपण माणुसकी जपणारे नसलो तर तुमच्या छोटेमोठेपणाला काहीही अर्थ नाही याची आठवण मला सदानंद बाकरे प्रसंगातून कायमची लक्षात राहीली आहे . आपण माणुसकीसाठी कायम सतर्क राहीले पाहिजे असे मला वाटते .
        मोठेपणाची झूल तारुण्यात जोर दाखवते , उतारवयात सर्वांचाच जोष उतरलेला असतो . मग उतारवयात पश्चाताप होतो पण  त्यावेळी खूप उशीर झालेला असतो . 
आज असलेले यश कधी पलायन करेल ? व अपयशाचा कधी सामना करावा लागेल ? हे कोणालाच माहिती नसते . आयुष्याचा खेळ कधी कोणाचा पलटेल याची खात्री कोणी देऊ नये . 

" समय बडा बलवान होता है " .
 
" माणूसकी " नेहमी जागृत ठेवण्यासाठी सर्वानां शुभेच्छा !
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सुनील काळे✍️ 9423966486
निसर्ग आर्ट गॅलरी [वाई ]

पानगळ

पानगळ .................. 🍃🍃🍃🍃🍃🍃🍃       माणूस नावाचा जो प्राणी आहे त्याचा मेंदू , त्याचे विचार ,त्याच्या अपेक्षा किती वेगाने वाढत राहत...