रहिमानी किडा
🌟🌟🌟🌟🌟
2018 साली फेब्रुवारी महिन्यात आम्ही 1992 सालच्या अभिनव कला महाविद्यालयातील बॅचची सर्व मित्रमंडळी ठरवून सगळे पुण्यात भांडारकर रोडच्या हॉटेलमध्ये मिलिंद फडके सर व धनंजय सस्तकर सरांच्याबरोबर भेटलो होतो . खूप छान वाटले आणि बऱ्याच वर्षानंतर सर्वानां भेटून खूप मजा आली . आमचे अनुभव शेअर केले , जुन्या आठवणी जाग्या केल्या, एकमेकांना जाणून घेतले व भरपूर गप्पा झाल्या त्यानंतर ग्रूपचा एकत्र फोटो काढून झाला . सर्वात शेवटी जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला .
एका कोपऱ्यात मी आणि पंकज खेळकर नावाचा आमचा पत्रकार , रिपोर्टर मित्र जेवण करताना गप्पा मारत होतो .पंकज कमर्शियल आर्टचे , चित्रकलेचे शिक्षण घेऊनही आजतक सारख्या वाहीन्यांमध्ये ऑन द स्पॉट जावून रिपोर्टिंग करतो . त्याने केलेली कामे तो आमच्या ग्रूपवर लिंक पाठवायचा . त्या लिंकमुळे मी त्याला कधीतरी टिव्हीवर पहात असतो . मला खूप कौतुक वाटत असे त्याच्या या अनोख्या व्यावसायाचे व उत्साहाचे . मी त्याला गंभीरपणे विचारले पंकज, या आजतक सारख्या वाहिन्यांमध्ये जे वार्ताहर असतात त्यानां काय क्वालीफिकेशन लागते ?
असंख्य विषयांत तुम्ही तज्ञ पारंगत असल्यासारखे प्रश्न कसे विचारत असता ? त्यासाठी काय काय तयारी करावी लागते ?
हे सगळं नाट्य तुम्ही चित्रित कधी करता ?
घडणारा जिवंत प्रसंग तुम्ही लगेच टिव्हीवर दाखवताना तुमची मनःस्थिती कशी असते ?
प्रत्येक घटना नवी मग त्यावेळी नव नवे प्रश्न कसे सुचतात ?
पंकजने शांतपणे व गंभीरपणे मोठा .........पॉझ घेऊन सांगितले .
हो क्वालीफिकेशन लागते,
फार म्हणजे फार मोठे क्वालीफिकेशन लागते ,
त्याचे नाव आहे.......... " रहिमानी किडा " .
पत्रकारांकडे मनात प्रभावी रहिमानी किडा असावा लागतो .
मी जरा आश्चर्याने विचारले म्हणजे ?
हे कसलं नवीन क्वालीफिकेशन ?
मग पंकजने सविस्तर सांगितले, त्याचं असं आहे...की आपणाला कोणत्याही गोष्टीत प्राविण्य मिळवायचं असेल तर रहिमानी किडा माणसात असावाच लागतो . तो जितका जास्त डोक्यात वळवळणार तितका तो जास्त प्रयत्न करत राहणार , आणि मग हा रहिमानी किडा त्या व्यक्तीला समृद्धी व भरीव यशप्राप्ती करून देणार . मला फोटो, व्हिडीओ शुटींग करायची आवड आहे व कोठेही काय चाललयं , काय घडतंय याचा शोध, तपास घेण्याची सवय आहे . त्यामूळेच मी आज तक मध्ये काम करतो . समाजात जे काही नवीन घटना , पडसाद, सकारात्मक नकारात्मक गोष्टी, घडतात त्या वेळी मी गप्प बसूच शकत नाही ते लोकांपर्यंत पोहचवण्याचा मला ध्यासच लागतो . हा रहिमानी किडा मला गप्प बसूच देत नाही .
पंकज बरोबर गप्पा मारताना मला कॉलेजचे दिवस आठवू लागले . त्याचे फोटो, शुटींग, त्याचा ध्यास पाहील्यानंतर मला आता हळू हळू समजू लागलं त्याचा हे रहीमानी किडा प्रकरण काय आहे ते . हा किडा त्याच्याकडे पूर्वीपासूनच होता . त्याने तो जाणीवपूर्वक वाढविला , मोठा केला .त्यामूळेच त्याचे जीवन इतके छान, व्यस्ततेत असायचे आणि आनंदी मनाने तो त्या कार्यामध्ये सतत कार्यमग्न असायचा.
आपल्या सर्व जणांमध्ये असा रहीमानी किडा असतो, तो डोक्यात अनेक वेळा वळवळतो पण आपण त्याची वाढ नीट करत नाही. त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. काही जण तर भलत्याच विध्वंसक पद्धतीने त्याला वळण देतात व निराशेच्या गर्ततेत अडकून पडतात . काही जण दुसऱ्याची वाट लावण्यासाठी त्याचा वापर करतात .पण ह्या किड्याची सकारात्मक पद्धतीने वाढ केली की नवीन गोष्टी, नवी क्षितिजे , नवे प्रकल्प , नवा उन्मेष, सातत्याने आपल्याला उर्जा देणारा व प्रेरणादायी ठरतो , सर्वानां त्यांच्या कार्यात यश प्राप्त करून देतो . पण त्यासाठी मनःपूर्वक वैचारीक, प्रामाणिक तयारी व इच्छाशक्ती हवी .
पंकजचा हा रहिमानी किडा मला फार आवडला .काही दिवसांपूर्वी एका कलाक्षेत्रातील मित्राला सांगितला . तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा ,जर तुमच्यात हा प्रामाणिक कष्ट करण्याचा किडा असेल तर, त्याला जोपासा, तुम्ही तुमच्या क्षेत्रात नक्कीच यशस्वी व्हाल . त्यासाठी मग अगदी जीवाचे अकांड तांडव करा , त्याच्या सर्व अंगाचा, सर्व बाजूंनी सर्वकष शोध घ्या , संशोधकासारखे अगदी बारीक नगण्य गोष्टी ते संपूर्ण भव्य अवकाश शोधून, पिंजून काढा . सर्वोत्तमातले सर्वोत्तम सर्व शक्तीनीशी जाणीव पूर्वक मांडण्याचा ध्यास घ्या , समाधान होत नाही तोपर्यंत अविश्रांत प्रयत्न करत रहा. हार मानू नका .
चित्र किंवा शिल्प करत असाल तर डोळ्यांनी पाहणाऱ्या व्यक्तीला अविस्मरणीय अदभूत , अचंबित करणारे , रोमारोमांला भिनवून टाकणारे , विचार करायला लावणारे चित्र / शिल्प काढा . मग ते कोणत्याही माध्यमात, कोणत्याही साईजचे , कोणत्याही शैलीचे असो , चित्र पाहील्यानंतर त्यातील रंग , रेषा आकार व दृश्यानुभव यांनी पाहणारा माणूस अद्वितीय आनंदाने फुलून गेला पाहिजे, त्यामध्ये तो गुंतून गेला पाहीजे , स्वतःला विसरून गेला पाहीजे .
गायन, वादन, नर्तन, नाटय, संगीत, लेखन, क्रिडा वा इतर कोणत्याही आवडीच्या क्षेत्रात असा , तुम्ही हे सर्व मनाच्या गाभाऱ्यातून श्रध्दापूर्वक स्वत:लाच शरण जावून करणार असाल तर समोरचा प्रेक्षक प्रभावित होईलच . त्या अगोदर तुम्ही सर्वांगाने प्रभावित असले पाहीजे , तुम्ही त्या क्षेत्राचा कसून पुर्णपणे अभ्यास केलेला असला पाहीजे .तेथे मोठेपणाची, अतिज्ञानाची ,अहंपणाची, अविश्वासाची झुल बाजूला ठेवावी लागते . सर्व काही फक्त आपल्यालाच समजते हा गैरसमज काढून टाकावा लागतो . स्वअहंकारांसारख्या गोष्टी बाहेर काढून शरणागती पत्करावी लागते. स्वतःच स्वतःला सरेंडर करावे लागते . शुद्ध व्हावे लागते .फार कठीण आणि अवघड असते असे स्वतःला झुल फेकून देऊन जगण्यासाठी तयार व्हायला . पण ते जाणीवपूर्वक बदल केल्यास शक्य असते .
तुम्ही कोणत्याही वयाचे असा, कोणत्याही आर्थिक, सामाजिक स्थितीत असा , कोणत्याही ज्ञात ,अज्ञात ठिकाणी असा, असे स्वतःला विसरून प्रयत्न केले की यश मिळणारच. आणि ज्यांनी हा प्रयत्न केला तो त्यांच्या माध्यमातून , शब्दांतून , गाण्यातून, आचरणातून, कृतीतून व्यक्त होतोच , समोरच्या व्यक्तीला आनंदयात्रा करुन आणतो .
असा रहिमानी किडा तुमच्या डोक्यात कार्यरत असला तर तुम्हाला गप्प बसू देणार नाही . सतत सुप्त विचारानां प्रेरित करत राहणार, यश प्राप्ती व चिरंतन आनंद देणार .
काही रहिमानी किडे वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यात मग्न असतात . ते विद्वेश पसरवतात, समाजात, माणसात, जातीधर्माच्या, उच्च नीचतेच्या , अनितीच्या मार्गाने विचार करतात . अशा किड्यानां डोक्यात कधीही वळूवळू दयायचे नाही त्यानां डोक्यातून हाकलून दयायचे . अशा लोकांच्या रहिमानी किडयांपासून सावध राहायचे. त्यांची अदृश्य चाल वेळीच ओळखायची.
सर्वामध्ये या अशा चांगल्या, सृजनशील , सुविचारी असलेल्या अदृश्य रहिमानी किडयाची आणखी खूप जोमाने वाढ व्हावी , त्याला उत्तम खतपाणी मिळावे, निराशेची चादर दूर जावी .आपआपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रगतीची दिशा, नव्या चेतना मिळाव्यात यश मिळावे यासाठी खूप खूप शुभेच्छा ! पंकजचे हे शब्द लक्षात ठेवण्यासारखे होते .शेवटी या रहिमानी किडयाचा सारांश काय तर आपल्या मनात जे प्रचंड आवडणारे अव्यक्त साचलेलं आहे त्याला वाट करून द्यायची . आपण नेहमी स्वतःला व्यक्त करत राहायचं .
2018 सालातील फेब्रुवारीत मारलेल्या या पंकज खेळकरबरोबरच्या गप्पा आता यापुढेही माझ्या मनात , हृदयात कायम लक्षात राहतील .
काही वर्षांपूर्वी वाईतील काही दुष्ट मंडळीनी आमच्या त्यावेळी रहात असलेल्या घरावर हल्ला करून सामान बाहेर फेकून दिले . अतिशय वाईट प्रसंग होता . पकंजला संपर्क केला त्यावेळी तो खूप दूरवर शुटींगमध्ये व्यस्त होता . त्याने इम्तिहाज मुजावर नावाच्या मित्राला आमची घटना सांगितली व त्याला तातडीने संपर्क करावयास सांगितले .सतर्कता , चपळता , अवधान तत्परता , व संपर्कात राहणे हे पकंजचे गुण मला त्यावेळी जाणवले .
अमीर आणि किरणरावचे लग्न पाचगणीत होते . आजतकतर्फे बातमी कव्हर करायला पंकज आला होता . त्याची धावाधाव करणारी ऑन दी स्पॉट कार्यप्रणाली त्यावेळी मी प्रत्यक्ष पाहिली होती .
वाहिन्यांचे प्रतिनिधी भरपूर असतात पण पंकजसारखी सर्वस्व झोकून देऊन काम करणारी मंडळी मात्र मला कायम लक्षात राहतात .
पंकजसारखे मित्र नेहमी आठवत राहतील जे पक्के रहिमानी आहेत .
कॅमेऱ्यामन ......... साथ आजतक के लिए मै पंकज खेलकर हा आवाज आता परत येणार नाही . कारण दिनांक 11 मार्च 2024 च्या रात्री साडेनऊ दहाच्या सुमारास हा आमचा मित्र हार्टॲटकमुळे दुसऱ्या दुनियेत गेला . तेथेही तो इतक्या तत्परतेने गेला की त्याची बातमी सर्वदूर पसरली असेल . तेथील चॅनेलवर तो आता नवनव्या बातम्या कव्हर करत असेल . कारण त्याच्या मनामनात , रोमारोमांत , सर्व शरीरभर रहिमानी किडा पसरलेला होता . तो त्याला कधीच स्वस्थ बसून देणार नाही .
मै पंकज खेलकर आज तक से . . . . . . हा आवाज आता पुन्हा कधी आजतक चॅनेलवर ऐकता येणार नाही . अशी तरुण मित्रमंडळी साठीच्या आतील व्यक्तिमत्वे हरवली की हृदय फाटते , हृदयाला न भरून येणाऱ्या जखमा होतात .
पकंज तुला भावपूर्ण श्रध्दांजली !🙏🙏
सुनील काळे✍️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा