शनिवार, ११ मे, २०२४

सुंबरान - चित्रकारांचे स्वप्नातील घर

सुंबरान -  चित्रकारांचे स्वप्नातील घर
🏛🏛🏛🏛🏛🏛🏛🏛🏛🏛
           खूप वर्षांपूर्वी म्हणजे करेक्ट आठवून वर्ष सांगायचं तर १९९९ साली मी पाचगणीच्या बिलिमोरीया स्कूलमध्ये कलाशिक्षक म्हणून काम करत होतो . ओरिजनल पारशी मालकमंडळी जाऊन ही शाळा गोराडीया मॅनेजमेंटकडे आली म्हणजे त्यांनी विकत घेतली होती . मी आणि स्वाती शाळेच्या परिसरात एका दहा बाय पंधराच्या खोलीत रहात होतो नाईलाज होता .कारण आयुष्याची वाईट वाट लागली होती . खूप निराशा मनात साचलेली होती . आमची एकुलती एक मुलगी डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे मरण पावली होती व आम्हाला परत नालासोपारा येथे स्वतःचे घर असूनही परत जायचे नव्हते . या शाळेच्या खोलीत बाथरूम , किचन , अटॅच्ड टॉयलेट , कपाट, फर्निचर काहीच नव्हते . फक्त एक रिकामी दोन लोखंडी पलंग असलेली खोली . बाथरूम अंघोळीसाठी इमारतीला वळसा घालून लाकडी जिन्याच्या पायऱ्या चढून दुसऱ्या मजल्यावर मुले सकाळी उठण्या अगोदर पहाटे पाच वाजता प्रचंड थंडी गारठ्यात उठून कॉमन बाथरूम वापरायला लागायची . शाळेच्या मालकांची अक्राळव्रिकाळ अल्सेशियन दोन कुत्री रात्री मोकाट सोडलेली असायची . अशावेळी भर पावसात कुडकुडत रात्री टॉयलेटला जायचे म्हणजे एक संकट वाटायचे . मग एक स्वप्नातील स्वतःचे हक्काचे घर असावे असे सतत वाटायचे. सतत अस्वस्थ वाटायचे .आपल्या डोक्यावर हक्काचे स्वतःचे छप्पर नसेल त्यावेळी समोर आलेली हलाखीची सर्व परिस्थिती स्विकारावी लागते .
           त्यावेळी 1999 च्या सुमारास रोहन बिल्डर्स पुणे यांनी एक चित्रकलेची स्पर्धा आयोजित केली होती . त्या स्पर्धेचा विषय होता 
" माझ्या स्वप्नातील घर " आणि त्याचे बक्षिस होते पाच हजार रुपये . मग आम्ही दोघे स्वप्नातील घर कसे असावे याचा विचार करून सतत चित्र रेखाटने काढायचो .  स्वप्नातील घर कसे असावे , याची सतत स्वप्ने पाहायचो . मग अनेक रेखाटने करून फुल साईज  माऊंटबोर्डवर एकदाचे फायनल चित्र काढून स्पर्धेसाठी पाठवले . आणि विशेष म्हणजे त्यावेळी महाराष्ट्रातील अनेक चित्रकारांनी त्या स्पर्धेत भाग घेतला होता . आम्हा दोघांनाही या स्पर्धेत पारितोषक मिळाले . बक्षिस तर मिळाले पण ....... प्रत्यक्ष स्वप्नातील घर मिळविण्यासाठी पुढे अनेक वर्ष जावी लागली .
           प्रत्येक माणसाचे व त्याच्या कुटूंबाचे एक स्वप्न असते , आपले स्वतःचे एक घर असावे .
तो माणूस त्या स्वप्नांतील घर पुर्ण करण्याचा अटोकाट प्रयत्न करत असतो . काहींची स्वप्ने लवकर पुर्ण होतात तर काही जणांच्या प्रयत्नाला लगेच यश मिळत नाही . नियती रुसून बसते आणि नशीब देखील साथ देत नाही . प्रयत्नांची शिकस्त करूनही घराची स्वप्नपूर्ती होत नाही . आणि त्यात एखादा कलावंत किंवा चित्रकार असेल तर त्या माणसांचे स्वप्नातील घराचे स्वप्न मोठे रोमांचक जरा भारी भारी कल्पनांनी व्यापलेले असते . आणि या कल्पना प्रत्यक्ष उतरविण्यासाठी मोठी जिद्द , चिकाटी, सतत प्रयत्नांची शिकस्त , व आर्थिक पाठबळही असावे लागते . माझे स्वप्नातील घर पुर्ण करण्याच्या ध्यासामुळे पुढे मी कधी बाहेर निवांतपणे फिरायला गेलोच नाही .
          आज खूप वर्षांनी एका स्वनातील घराला भेटायचा योग आला कारण मी जे स्वप्नातील घर पाहीले त्याच्यापेक्षाही ही घराची प्रत्यक्ष कलाकृती खूप खूप सुंदर आहे त्या घराचे नाव आहे 
" सुंबरान " .
         सुंबरानचे स्वप्न पाहीले ते प्रा .रावसाहेब गुरव सरांनी . ते आम्ही जिथे शिकलो त्या अभिनव कला महाविद्यालयात अनेक वर्ष प्राध्यापक होते आणि नंतर तेथे प्राचार्य म्हणून रिटायर्ड झाले . निवृत्त झाल्यानंतर माणसे मनाने आणि शरीरानेही थोडे थकतात . कारण बराच काळ मोठी नोकरी केल्यानंतर विसावा, शांततेची गरज असते . त्या घराचा निर्मितीचा प्रवास ऐकण्याची खरं तर त्याच्या मालकाकडूनच खूप मोठी इच्छा होती म्हणून सकाळीच प्रा . रावसाहेब गुरव सरानां फोन केला परंतू मुंबईला जहाँगीर आर्ट गॅलरीत चाललेल्या एका प्रदर्शनासाठी ते मुंबईला प्रवास करत होते . परंतु त्यांनी मला नाराज केले नाही .तु सुंबरानला जा तेथे केअरटेकर सर्व काही दाखवेल . असे खात्रीशीर आश्वासन मिळाल्यामूळे मी मुळशी भूगाव रस्त्याला प्रवास करू लागलो . 
            पुणे शहराचा चारी बाजूंनी इतका विकास चालला आहे की सगळीकडे उंचच उंच इमारती ,विस्कळीत झालेली वाहतुकीची कोंडी , अमाप गर्दी व नियमबाह्य बांधलेली शॉप्स , मॉल्स , टपऱ्या , दुकाने ,रस्त्यांच्या दुरावस्था पाहून हा नक्की कसला नियोजनशुन्य विकास आहे ?असा मला नेहमीच प्रश्न पडतो . त्या प्रश्नांची उत्तरे कोणाकडे असतील का ? असा विचार करत कितीतरी वर्षांनी मी हायवे पार करून अनोळखी मुळशीच्या रस्त्यावर ड्रायव्हींग करत जीपीएस लावून चाललो होतो . तो प्रवास सुरु असतानाच एक छोटासा सुंबरानचा बोर्ड उजव्या बाजूला दिसला . त्या ठिकाणी थोडा कच्चा रस्ता पार केल्यावर मी एका मोठ्या लाकडी गेट व दगडी बांधकाम असलेल्या प्रवेशद्वाराजवळ पोहचलो . आता उत्सुकता होती एका चित्रकाराचे स्वप्नातील घर पाहण्याची .
             आत प्रवेश करताच डाव्या बाजूला गेस्ट हाऊस आहे . तेथे फ्रेश झाल्यानंतर गार्डनमधला पॅलेट व ब्रशच्या आकारातील टिपॉय पाहूनच आपण चित्रकारांच्या एका वेगळ्या भूमीवर पाऊल टाकल्याची प्रचिती मिळते . या गेस्टहाऊसच्या बाहेरच्या बाजूला गणपतीची मूर्ती व बैठक आहे समोर हिरवळीचा गालीचा आहे . रात्रीची शेकोटी करून गप्पा मारण्याची सोय आहे . वेगवेगळी झाडे आहेत इथे प्रत्येक कोपरा सुनियोजित व विचारपूर्ण आहे . प्रत्येक दृश्य एक फ्रेम केलेले एक सुंदर चित्र आहे. अशा छोट्या रस्त्यातून मुख्य प्रवेशद्वारावर आल्यानंतर थक्क करणारा कारंजाचा नजारा पहाता येतो. सुंदर बुद्धाची मूर्ती व समोर वाहणारे पाणी , झाडे , पायवाट व मध्यभागी पाण्याच्या मधोमध असलेल्या गजीबोमध्ये पोहचल्यानंतर एक वेगळी अनोखी शांतता अंर्तमनात जाणवते . ह्या कारंज्यांच्या जलाशयात नारंगी रंगाचे मासे मुक्त प्रवास करत डुंबत असतात ते पाहिल्यानंतर मनाची कवाडे सताड खुली होतात व विचारांची , काळजीची वलये हवेत विरून जातात .
           या जलाशयाभोवती कोबी , कांदा , पालेभाज्याची लागवड केलेली आहेच पण सभोवताली वेगवेगळ्या  फुलांची , पानांची , नारळाची , पामची , आब्यांची झाडे लावून संपूर्ण परिसर हिरवागार केला आहे . दुपारचे बारा वाजलेले असूनही येथे उन्हाळा अजिबात जाणवत नाही .
          त्या जलाशयाच्या उजव्या बाजूला छोटे कलादालन आहे . तेथे भिंतीवर अनेक चित्रकार व कलावतांच्या कलाकृती मांडलेल्या आहेत , छोट्या आकाराची शिल्पे आहेत , हस्तकला व पेपरच्या कलाकृती आहेत . त्या गॅलरीतून समोरचा जलाशय सुंदर दिसतो .
         दगडी शहाबादी फरशीवर चालत जरा उजवीकडे गेलो की हिरव्यागार हिरवळीवर आमराई आहे . आब्यांची सुरेख झाडे आहेत . मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर चकीत व्हायला होते . कोकणातील लाल जांभ्या चिऱ्याचा वापर करून इतकी मोठी आर्च कशी केली असेल ?  हा प्रश्न पडतो . या आर्चच्या उंच गच्चीवर लहान मुलांची शिल्प अगदी हुबेहुब केलेली आहेत . वरच्या वर्तृळाकार ब्रम्हस्थानातून पडणारा प्रकाश व त्याच्याखाली सुरेख गजाननाची मुर्ती पाहीली की आपोआप हात जोडले जातात . या हॉलवजा भिंतीवर गुरवसरांची धनगर सिरीज मध्ये केलेली पेंटीग्ज व निसर्गचित्रे लावलेली आहेत . डाव्या बाजूला आरामखुर्च्या मांडून निवांतपणे मंद प्रकाशात प्रोजेक्टर लावून मिनिथिएटर केले आहे . त्याच्या समोरच वर्तुळाकार आकारातील बैठक व चित्रकारानां निवांत बसुन कलाविषयक गप्पा मारता येतील असा सुसज्ज हॉल आहे . त्याच्या मध्यावर गोल टेबल असून त्यावर नाजूक नक्षीकाम केलेली सुरई आहे . भितींवरच्या कोनाड्यात व सर्व परिसरात सुंदर शिल्पे , सिरॅमिकची मातीची भांडी ठेवलेली आहेत . हॉलच्या एका बाजुला रावसाहेबांचा ओपन स्टुडीओ आहे . नवनवी रेखाटलेली छोटी चित्रे भिंतीवर लावलेली आहेत. लोड तक्के लावलेला मोठा झोका निवांतपणे विचारांना सतत चालना देण्यासाठी सतत प्रोत्साहन देत आहे . एका चित्रकाराने पाहिलेले भव्यदिव्य स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी किती बारकाईने काम पूर्ण करून घेतले त्या आर्कीटेक्ट श्री . माळी व चित्रकार रावसाहेब गुरव सरानां मनातून सॅल्यूट केला व निवांतपणे पायऱ्यांवर बसून राहिलो .
        दुपारची वेळ असल्याने आता पोटात भूकेची जाणीव झाली . जवळपास कोठे हॉटेल आहे का याची चौकशी करत होतो . पण सरांचा केअरटेकर भारी होता . त्यांचे नाव किशोर मालुसरे . तो महाडचा आहे . त्याने लगेच घरी  सांगून मस्त उसळ चपाती व भात आमटीचे साधे जेवण तयार केले व त्या निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले भव्य चित्रकाराचे घर आणखी दिव्य वाटू लागले . मन , शरीर आणि आत्माही तृप्ततेने मनसोक्त भारावून गेला .
           स्वप्ने पाहिली पाहिजेत . स्वप्नानां पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली पाहीजे . त्या स्वप्नानां फक्त आपल्या उपभोगासाठी न ठेवता सर्व चित्रकार कलावंत मित्रांनाही त्यात सामावून घेतले पाहीजे . कलाप्रेमींना कलेचा आस्वाद घेण्यासाठी घराची द्वारे सतत उघडी ठेवली पाहीजेत ही नवी प्रेरणा , नवा विचार घेऊन मी सुंबरानचा प्रेमाने निरोप घेतला .
            स्वप्नातील घर प्रत्यक्षात साकारणाऱ्या प्रा.रावसाहेब गुरव सरानां निरोगी दिर्घायुष्य मिळो , त्याच्यां हातून अजून उत्तम कलाकृती निर्माण होऊन चित्रकारानां सतत प्रेरणा मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना ! व खूप खूप शुभेच्छा !
           पुण्यातील व महाराष्ट्रातील अनेक कलाप्रेमी मंडळीनी सुंबरानला नक्की एकदा तरी प्रत्यक्षात व्हिजीट दिलीच पाहीजे असे मनापासून वाटते .
      कारण अशी सुंबरानसारखी कलाकेंद्रे कलावंताच्या सध्याच्या सामाजिक व राजकीय उदासीन परिस्थितीतील निराश मनाला नवी उर्जितावस्था ,चेतना , मनात सकारात्मकता जागृत करतात आणि पुन्हा नवी क्षितिजे , नवी ध्येये साकारण्यासाठी बुद्धीला प्रेरणा देतात .
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
रावसाहेब गुरव (सर)
सुंबरान आर्ट फौंडेशन
मिस्टीक व्हिलेज
पौड रोड , ता . मुळशी , पौड ,पुणे
Mobile . 9822399873 . 
Phone No. : 020 -24481822
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
Location Map
Sumbaran Art Foundation
https://maps.app.goo.gl/p5yqByVmnBN6giXE6
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
सुनील काळे✍
9423966486

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड =Part 2

दूरदेशीची मैत्री - पार्ट 2 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝           24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम ...