शनिवार, ११ मे, २०२४

स्टॅन्डर्ड - मायानगरी मुंबईचे अनुभव

स्टॅन्डर्ड
🌟🌟
मायानगरी मुंबईचे अनुभव
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
         मागच्या वर्षी प्रदर्शनाच्या वेळी मी पार्ल्याला गेलो होतो .कारण तेथे  अष्टपैलू चित्रकार , लेखक , कार्टूनिस्ट , गायक , मिमिक्रीकार , कलाशिक्षक असे बहुगुण संपन्न असणारे सी एस पंत [ चंद्रशेखर पंत] नावाच्या आमच्या मित्राने खास घरी येण्याचे निमंत्रण दिले होते . 
      चंद्रशेखर पंताचे व्यक्तीमत्व अतिशय प्रभावी आहे . झाकीर हुसेनसारखे लांब केस , मोठा काळ्या रंगाचा फ्रेमचा चष्मा , आणि कानाशेजारी खूप लांब मोठे कल्ले . त्यात आता वयामुळे केस पांढरे झालेले त्यात ते नेहमी झब्बा घालतात त्यामुळे त्यांना पाहताच हा माणूस ' कल्लाकार ' आहे हे लगेच लक्षात येते . मी मात्र साधा राहायचो . माझी पर्सनालाटी दाढी घोटून फक्त मिशा ठेवल्याने चित्रकार सोडा फार तर काय , धड कारकूनही मी शोभायचो नाही . एखाद्या कंपनीचा अंकौटंट वाटायचो . मग आपला काहीतरी बदल करून कायापालट करायचा मी ठरवले . मग दाढी वाढवली . पण माझ्या दाढीचे केस राठ असल्याने चेहऱ्यावर काटेरी गवत उगवल्याचा मलाच भास व्हायला लागला . मग मी सगळे आर्टिस्ट ठेवतात तशी बुल्गानीन दाढी ठेवली तर ओठांच्या खाली हनुवटीच्या भागावर सगळ्या भागात केसच उगवायचे नाहीत मग दोन्ही साईडला कट मारला व आताची स्टाईल केली . मग मी जरा थोडा चित्रकार दिसावा म्हणून अनेक कप्यांचे फोटोग्राफरचे जॅकेट घालायला लागलो . केस रंगवायचे पुर्ण सोडून दिले . आता मी चित्रकार दिसू लागलो . पण नुसता चित्रकार दिसून काय फायदा ? कारण चेहऱ्याने मी सुमार व्यक्तीमत्वाचा असल्याने गरीब बावळटच वाटायचो , माझी चित्रं  विकायची असतील तर जरा भारदस्तपणा वाटायचा नाही . मग एकदा पुण्याला गेलो होतो त्यावेळी अभिनव कॉलेजच्या समोर सिलाई नावाच्या दुकानातून एक जीन्सचा ब्लेझर घेऊन ठेवला . प्रदर्शनात शाईनिंग मारायला उपयोगी पडेल म्हणून आणि आता तो मी सात दिवस घालतोय .
         आता हे सगळे व्यक्तिमत्व विकासाचे पुराण का सांगतोय ? तर सविस्तर किस्साच सांगतो .
         2004 साली आमचे नेहरू सेंटरलाच प्रदर्शन होते . माणसे यायची व जायची . कोणी टाईबुट घालणारा , कोणी फॉरेनर , कोणी पारशासारखा दिसणारा , कोणी भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा , कोणी गोऱ्यापान बॉबकटवाल्या स्टाईलीश लिपस्टीक लावलेल्या उच्चभ्रू बायका , किंवा ऑफीसला जाताना अपटूडेट माणूस दिसला की आम्हाला वाटायचे क्लाएंट आला , हा माणूस स्टॅन्डर्ड दिसतोय म्हणजे चित्र घेणार असे वाटायचे . आम्ही लगेच छापलेले ब्रोशर घेऊन त्याला प्रभावित करण्यासाठी ॲटेन्ड करायला धावायचो पण बऱ्याचदा तो फुसका बार निघायचा . एखादा साधा माणूस दिसला की आम्ही दुर्लक्ष करायचो . कारण चित्राच्या किमती त्याला परवडतील असे वाटायचे नाही .
           त्या प्रदर्शनात एक साधा बुशशर्ट , पायात साधी बाटाची ब्राऊन कलरची सॅन्डल व पँट घातलेली व्यक्ती आली त्याच्याबरोबर एक जाडा माणूस सोबत होता . मी त्याला ॲटेन्ड करायला उठलोच नाही . हा काय चित्र घेणार ? हा विचार मनात येऊन मी न्यूजपेपर वाचत बसलो . ते गृहस्थ शांतपणे गॅलरीत प्रत्येक चित्र पहात होते . मी निवांत बसलो होतो इतक्यात सद्गृहस्थ माझ्याकडे आले व शांतपणे म्हणाले एक्स्कूज मी , मला ह्या एका भिंतीवर लावलेली सगळी चौदा चित्र घ्यायची आहेत . कॅन यू बुक फॉर मी .
          मी त्यांच्या चेहऱ्याकडे पहात म्हणालो यु वॉन्ट फोरटीन पेंटींग्ज ? एकदम चौदा चित्र मागतोय म्हणजे काय आपली गंमत करतोय का काय ? कदाचित टाईमपाससाठी हा माणूस आला असणार . मी म्हणालो ही प्राईजलिस्ट घ्या त्याच्या किंमती बघा व त्यानंतर ठरवा . तर हे गृहस्थ म्हणाले नो प्रोब्लेम फॉर मी , व्हाटेवेअर प्राईज इज देअर आय एम रेडी टू पे . 
आता मी चक्रावलो . 
मग त्यानां सांगितले ही चौदा चित्रे घेतलीत तर एक मोठी अमाऊंट होईल प्लीज चेक द प्राइजेस . 
तर गृहस्थ म्हणाले आय टोन्ड हॅव एनी प्रॉब्लेम . मग मीच कॅल्क्युलेशन करून सांगितले या चौदा चित्रांची तीन लाख चाळीस हजार एवढी मोठी अमाऊंट आहे . तुम्हाला परवडेल का ? तर म्हणाले ओके , नो प्रोब्लेम , पुट रेड टॅग ऑन द पेंटींग्ज . 
आता माझे डोके विचित्र अनुभवाने गरागरा फिरू लागले .
 
मग मी त्यांना सांगितले मी मुंबईत राहत नाही . मी व माझी पत्नी स्वाती दोघेही पाचगणीला राहतो जर तुम्ही चित्रे बुक करत असाल तर तुम्हाला थोडे पैसे ॲडव्हान्स द्यावे लागतील . कारण तुम्ही चित्रे घ्यायला आला नाहीत तर आमचे नुकसान होईल . मग सदगृहस्थ गालात छान हसले , ओके नाऊ आय अंडरस्टुड युवर प्रॉब्लेम . आणि मग त्यांनी शेजारी उभ्या असलेल्या माणसाला काहीतरी कानात सांगितले . तो माणूस बाहेर गेला व दोनच मिनिटात प्लास्टीकच्या बॅगेत संपूर्ण रक्कम रोख घेऊन आला . सदगृहस्थानी सगळी रक्कम टेबलवर ठेवली व सांगितले आता आशा करतो की तुझे सर्व प्रश्न संपले असतील .
 मी तर भारावलेल्या अवस्थेत त्या नोटांच्या बंडलाकडे  दोन मिनिटे बघतच राहीलो . काय सुधरेनाच . इतके पैसे एकावेळी बघायची सवयच नव्हती . त्यावेळी ज्या सेंट पीटर्स शाळेत कलाशिक्षक म्हणून नोकरी करायचो . तेथे माझा दर महिन्याचा पगार सात हजार सातशे होता त्यात कंटींग होऊन जो पगार मिळायचा त्यात महिना भागवायला लागायचा . माझ्या मनात असंख्य विचार येत होते . मी जणू ट्रान्समध्ये वेगळ्या स्वप्नातच विहार करत गेलो होतो . हे सत्य आहे का स्वप्नात आहोत असे क्षणभर वाटले .
त्या सदगृहस्थानी मला स्वप्नातून भानावर आणले .
प्लीज पॅक द पेटींग्ज ,आय विल टेकिंग एव्हरीथिंग टुडे ओन्ली .
मग चित्रांचे पॅकिंग करताना मी त्यांना विचारले आपण काय करता ?
तर म्हणाले एक कंपनी चालवतो .
कसली कंपनी ? नाव काय कंपनीचे ?
मग सद्गृहस्थ म्हणाले  'अंबूजा सिमेंट ' .
मी आश्चर्याने विचारले वो टिव्ही पे ॲड आती है विराट स्ट्रेन्थ , छोटा हत्ती , अंबूजा सिंमेटकी दिवार टुटेगी नही भाई वो वाली अंबूजा सिमेंट  .
मग सदगृहस्थ खूष झाले म्हणाले हा वही अंबूजा सिंमेट . 
आय एम मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ अम्बूजा सिमेंट मिस्टर नरोत्तम सेकसारीया .
       नरोत्तमभाईंचा हा सरळसाधेपणा पाहून मी थक्कच झालो .
       आम्ही माणसांची पारख कपड्यावरून , त्याच्या गाडीकडे पाहून , त्याच्या घराकडे पाहून , त्याच्या राहणीमानावरून करतो व लगेच अनुमान काढतो . गरीब ,सामान्य परिस्थितीतला मित्र , नातेवाईक , पाहूणा असला की दुर्लक्ष करतो . खोटा दिखावा तर खूप करतो . जो मी आहे तसा न दाखवता खोटेपणाची झूल पांघरून मी बघा किती 
" स्टॅन्डर्ड " माणूस आहे उच्च रहाणीमानाचा उच्चभ्रू आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो . पण जी माणसे खरी असतात ती वेगळी असतात .त्यानां दिखावा करायची कधी गरज पडत नाही कारण ती विराट स्ट्रेन्थ  असलेली भरभक्कम मजबुतीची अंबुजा सिमेंटसारखी असतात .
         मी व स्वातीने त्यांची सर्व पेंटीग्जची व्यवस्थित नीट पॅकिंग केली व त्यांच्या गाडीत ठेवली . पाचगणी वाईसारख्या छोट्या गावातून एक तरुण जोडपे फक्त पेंटींग्ज करून जगते व सर्वांनां चित्रातून आनंद देते हे ऐकून त्यांनी आमचे कौतुक केले . दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी खास जेवणाचे आमंत्रण दिले . आमच्यासाठी खास पर्सनल सेक्रेटरी गाडी घेऊन पाठवली . 
मेकर्स टॉवर्सच्याजवळ ती इमारत होती . कफ परेडसारख्या एरियात सर्वात महाग जागेतील ती संपूर्ण इमारतच त्यांच्या मालकीची होती . घरातच डायरेक्ट लिफ्ट होती . त्या घरात भारतातील सर्वात प्रसिद्ध असलेल्या  सर्व मान्यवर चित्रकारांची चित्रे होती . ती सर्व चित्र आम्हाला त्यांनी फिरून दाखवली . घरात साधा सफेत कुर्ता पायजमा स्लीपर घातलेले नरोत्तमभाई मला खूप मोठी शिकवण देऊन गेले . 
माणसे साधी  दिसतात म्हणून दुर्लक्ष करायचे नाही . ते माणसे जशी असतील तशी स्विकारायची .त्यांची कपडे साधी असतात म्हणून किंवा त्यांचे राहणीमान पाहून त्यांनां कधीच दूर लोटू नये . सर्वांनां सन्मानाने वागवावे . 
त्यादिवशी त्यांनी आणखी पन्नास हजार रुपये स्वातीच्या हातात देत म्हणाले खूप आनंद झाला मला तुमची चित्रं पाहून , या आनंदाची किमंत म्हणून हे पैसे देत आहे . आम्ही अर्थात नकार दिला . मग म्हणाले ठिक आहे तुम्ही पैसे घेत नाही तर माझ्यासाठी एक मोठे चार फूट बाय सहाफुटाचे वेळ मिळाला की सुर्यफुलांचे पेंटींग करा . स्वातीने ते पेंटींग करून दिले अशी खरी माणसे त्यांचे खरे  " स्टॅन्डर्ड " दर्शवतात .
          तो दिवस आज पुन्हा आठवला .
आज अशीच एक वयस्कर साधी कपडे घातलेली मराठी व्यक्ती गॅलरीत आली होती . त्यांच्या तर हाताच्या शर्टची बटनेपण लावलेली नव्हती . 
पण आता मला शहाणपणाचा अनुभव होता . अनुभव खूप शिकवतो .
 मी लगेच उठून त्यांचे स्वागत केले . त्यानां सोबत घेऊन सर्व चित्रे दाखवली तर आम्ही वाईचे आहोत हे ऐकून खूष झाले . म्हणाले आहो आम्हीपण पूर्वी वाईचे होतो . गोखले , रास्ते यांच्या घरातले . वाईच्या महागणपती मंदिराचा मी ट्रस्टी आहे . मग हातात हात घेऊन सगळीकडे फिरले .भरपूर फोटो काढा म्हणाले . शेवटी सगळी चित्रे बघून एक सर्वात उत्तम चित्र त्यांनी पसंद केले मला हे चित्र खूप आवडले म्हणत बऱ्यापैकी घासाघीस करून म्हणाले अहो चित्रातले मला काय कळत नाही .आपला थोडा थोडा संग्रह करत असतो . 
      मग पैसे देण्याची वेळ आली तर म्हणाले मला गुगल पे ,ऑन लाईन पेमेंट काय कळत नाय वो . मग मी म्हणालो ATM ने पैसे दया ,तर म्हणाले अहो माझ्याकडे कार्डबिर्ड काहीच नाही . मी आपला साधा माणूस .मग सर्वात शेवटी चेकने पैसे देतो म्हणाले .ड्रायव्हरजवळ चेक पाठवून देतो तोपर्यंत पेंटिंग पॅक करून ठेवा आमचा निरोप घेऊन घेऊन बाहेर चालत हळूहळू निघून गेले .
पाच मिनिटांनी ड्रायव्हर चेक घेऊन आला . 
हातात एक व्हिजिटिंग कार्ड दिले . 
त्या कार्डावर लिहिले होते . 
पार्टनर - वामन हरी पेठे ज्वेलर्स .
ड्रायव्हरला म्हणालो पेंटींगची साईज जरा मोठी आहे , गाडीत बसेल का ?
तर म्हणाला का नाही बसणार ? लई मोठ्ठी BMW आणली आहे .

        समर्थ रामदासांनी सांगितलेच आहे की, 'वेष असावा बावळा। परि अंतरी नाना कळा। तुमचा रुबाबदार पोशाख लोकांच्या मनावर काही काळ छाप पाडू शकेल, पण तुमच्या अंगी काहीच कार्य- कौशल्य नसेल वर तुमचे रुबाबदार कपडे कवडीमोलाचे ठरतात. मात्र, तुमच्याकडे विविध कला असल्या तर तुमच्या अंगावरच्या फाटक्या कपड्यांकडे कोणीही पाहणार नाही. तुमच्या कलांचेच कौतुक केले जाते व गोडवे गाईले जातील . गाडगेबाबांच्या अंगावर कायम फाटके कपडे असायचे, पण त्यांच्या कीर्तनाला असंख्य लोक जमायचे. रस्त्यावर एखादे सुंदर चित्र काढणारा फाटक्या कपड्यांत असला तरी लोक त्याच्याकडे पाहत नाहीत. त्याच्या चित्राची वाहवा करून त्याला बक्षिसी देतात. उघड्या अंगाने खेळ करणान्या डोंबाऱ्याचा खेळ पाहायलाही गर्दी होते. का? तर त्याच्या अंगी असलेल्या नाना कळा आपणांस मोहवतात.​

आता तर मी कपड्यावरून कधीच कोणाचे स्टॅन्डर्ड ठरवत नाही . पण अशा शाळेतील भारी स्टॅन्डर्डची एक भारी गोष्ट मी तुम्हाला नंतर नक्की निवांत झालो की सांगेन .

माझा मित्र म्हणाला ब्लेझर घातल्याचा नक्की फायदा होईल .मी म्हणालो चित्रकाराने , कलाकाराने सुटबुट घातला काय किंवा नाय .
चित्रातील रंग , आकार , मांडणी , अभिव्यक्ती बोलते . चांगल्या कामाला मरण नाही . तुम्ही कोणत्याही ग्राहकाला इंप्रेस करून फार टेंबा मिरवू नका तुमची कला तुमचे काम सर्व काही नजरेत सांगत असते .
        आज मुंबई आर्ट फेस्टीव्हलचा अखेरचा दिवस त्यात रविवार  त्यामुळे गॅलरीत तुफान गर्दी होती . हौसे , नवसे व गवसे सगळीच मंडळी होती त्यात आता मोबाईलमुळे चित्र बघण्यापेक्षा व्हिडीओ शुटींग करणे , चित्रांपुढे स्टाईलने उभे राहून फोटो काढणे , सेल्फी काढणे हेच उदयोग जास्त चालले होते .भरमसाठ गर्दी होती . 

पण जिथे खूप गर्दी असते तेथे दर्दी माणसे खूप कमी असतात .

       आज भोरवरून दूरचा प्रवास करून कलाशिक्षक व चित्रकार चंद्रकांत जाधव आले होते . सोलापुरातील प्रसिद्ध कलाकार सचीन खरात सहकुटूंब आले होते . काही दिवसांपूर्वीच त्यांची वाईला स्टुडीओला भेट झाली होती . आर्टबीट फौंडेशनचे संतोष पांचाळ , आर्किटेक्ट श्री .राजीव साठे , प्रा .संजय कुरवाडे सर नागपुरचे वयोवृद्ध चित्रकार रामटेकेसरांना घेऊन आले होते . आमची मैत्रिण योगिता राणे , मित्राचे भाऊ वसंत घोलप , चित्रकार मित्र दिनकर जाधव , चित्रकार उमाकांत कानडे , चित्रकार सुनील व स्नेहा जाधव [पुणे] . आमच्या संजीवन शाळेचे माजी विद्यार्थी अरुण साळी खास चित्र प्रदर्शन पाहायला खूप दूरचा प्रवास करून आले होते . आमचे कलासंग्राहक मित्र श्री . व सौ .नरेन्द्र कलापि खास दुपारचे लंच घेऊन आले . ते स्वातीला मुलीसमान मानतात . त्यांची मिसेस स्वातीवर आईच्या मायेची पाखरण करते . अशी माणसे खरीखुरी " स्टॅन्डर्ड " असतात . त्यांचे प्रेम त्यांच्या कृतीतून व्यक्त होते .बोलायचीच गरज पडत नाही .
         सुप्रसिद्ध सुलेखनकार व मित्र अच्युत पालवांची भेट झाली . खूप आठवणी जाग्या करून केली त्यासाठी एक वेगळा लेख लिहावा लागेल .
अनुभवाने माणूस समृद्ध होत जातो .
        ईंडीया आर्ट फेअरच्या निमित्ताने एक अनुभव किंवा शिकवण नव्याने शिकलो . खूप माणसे आली प्रचंड गर्दी झाली तर प्रदर्शन सक्सेस होत नाही त्यासाठी समज असणारी , जाणकार , रसिक माणसे थोडीच म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच असतात . 

आणि तीच माणसे खरी " स्टॅन्डर्ड " असतात .

आज प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे .
जरूर भेट द्या🙏

व्हॅलीज ॲन्ड फ्लॉवर्स
नेहरु सेंटर आर्ट गॅलरी
वरळी , मुंबई .

✍️सुनील काळे [ चित्रकार]9423966486

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड =Part 2

दूरदेशीची मैत्री - पार्ट 2 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝           24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम ...