ब्लॉग संग्रहण

बुधवार, १ नोव्हेंबर, २०२३

शुटींग - एक वेगळी दुनिया

शुटींग - वेगळी ती दुनिया .
🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭
🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬

           वाई जरी मंदिरांचे गाव , विश्वकोश , सांस्कृतिक तीर्थक्षेत्र म्हणून जरी प्रसिद्ध असले तरी आणखी एका गोष्टीसाठी खूप प्रसिद्ध झालेले आहे आणि ते म्हणजे चित्रपटांच्या शुटींगचे मुख्य केन्द्र . काही वर्षांपूर्वी वाईला सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांनी व दिग्दर्शकांनी हजेरी लावलेली होती . मोठमोठ्या बॅनर्सचे चित्रपट आवर्जून वाईची निवड करत होते . त्यामूळे मेणवलीघाट , गंगापूरीचा घाट , वाईचा गणपती घाटाचा परिसर अनेक चित्रपटांमध्ये चित्रित झालेला आहे . या मंदिराच्या सुबक घाटाबरोबरच आजूबाजूचा धोमधरणाचा परिसर व जवळची छोटी छोटी गावे निसर्गरम्य असल्याने चित्रपट व्यावसाय करणाऱ्यांचे लक्ष वाईला मुख्य केंन्द्रस्थानी नेण्यास आकर्षित करत आहेत . त्याची दोन मुख्य कारणे म्हणजे वाई हे पाचगणी - महाबळेश्वर या पर्यटनस्थळांच्या अगदी जवळ आहे शिवाय पाचगणीत टेबललॅन्ड या मुख्य पठारावर गाडी नेण्यासाठी बंदी आहे दुसरे कारण महाबळेश्वरला हॉटेलच्या अतोनात भाडेवाढीमुळे शुटींग करणे परवडत नाही म्हणून वाईला महत्व प्राप्त झालेले आहे .
            त्यामूळे या परिसरातील अनेक छोटेमोटे हॉटेल व्यावसायिक , स्थानिक शेतकरी , त्यांच्या बैलजोड्या, खानावळवाले , अनेक छोटेमोठ्या मॉबसीनसाठी लागणारी गर्दी यामूळे स्थानिकानां शुटींग आले की थोडेफार पैसे मिळण्यास सुरुवात झाली होती .पण या सगळ्या गोष्टींना थोडे गालबोट लागले ते शुटींगसाठी लागणाऱ्या अनेक गोष्टींचे सप्लाय करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर पद्धतीच्या गब्बर गावनेत्यांमूळे . त्यांच्या आपआपसातील हेवेदावे, कुरघोड्यांचे राजकारण , 'मी म्हणेल तो कायदा व माझाच झाला पाहिजे फायदा ' या प्रवृत्तीमुळे अनेक गट तयार झाले . या गटांमध्ये मारामारी होऊ लागली ती अगदी एकमेकांच्यावर पिस्तुल तलवारबाजीपर्यंत मजल गेली . त्याच्यां भांडणाचा परिणाम चित्रपटनिर्मितीसाठी बाधा ठरू लागला . या स्थानिक असहकार्याच्या भुमिकेमूळे हळूहळू वाईला शुटींगला प्राधान्य देण्याचे प्रमाण कमी झाले . आता हळूहळू हा हस्तक्षेप थांबला असावा म्हणून पुन्हा वाई चित्रपटसृष्टीची आवडती झाली आहे .
           ही सर्व पार्श्वभूमी आठवायचे कारण म्हणजे आज सकाळी मेणवलीघाटावर नेहमीच्या मॉर्निंग वॉकसाठी गेलो तर सकाळपासूनच घाटावर शुटींगची मोठी तयारी चालू होती . घाटावर पायऱ्या उतरत असतानाच वाईच्या सोनवले मंडपवाल्यांचा मोठा जनरेटरचा ट्रक लाइटींगची व्यवस्था करण्यात मग्न होता . मेणवली घाटावर नेहमीचे वॉचमनदादा निवांतपणे सकाळी पोहण्यासाठी येणाऱ्या स्थानिक गावकर्यांसोबत मस्तपैकी गप्पा मारत बसलेले होते . शुटींगचा आणि येणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीचा व त्यांचा काही संबंध नसल्यामूळे मला काहीच माहीती मिळाली नाही .
            मुख्य घाटावर मेणवलीच्या स्थानिक बायका निवांतपणे कपडे धुण्याचा कार्यक्रम व गप्पांमध्ये मग्न होत सकाळचा प्रहर एन्जॉय करत होत्या .त्रिकोणी आकाराच्या दगडाच्या मध्यावर आर्ट डिपार्टमेंटमधला मुख्य डायरेक्टर एक चौकोनी दहा बाय दहाचा चौथरा बनविण्याच्या सूचना देत होता . एक पेंटर , एक सुतार प्लायवूडचा तो चौथरा दगडासारखा ग्रे रंग लावून पटापट हाताने काम उरकत होता . कारण शुटींगचा मुख्य काफीला आता घाटावर येणार होता . वाड्याच्या दक्षिणेच्या प्रवेशदाराजवळ तर जत्रेचेच स्वरूप आलेले होते . सकाळचा नाश्ता तयार करणारे कॉन्ट्रक्टर एका मोठ्या ट्रकमधून गरमागरम इडली , चहा , पोहे आग्रहाने वाढत होते . त्याच्याबाजूला कपडेपट सांभाळणारी मंडळी ट्रकशेजारी कापडाच्या मंडपात हिरोच्या कपड्यावर इस्त्री करत होते . त्याच्याजवळ लाईटींगचे सामान भरलेला मोठा ट्रक पाठीमागून उघडा केला होता . त्यामध्ये लहान लहान स्पॉटलाईट ते अवाढव्य जनसेट व साऊंडयंत्रणेचे सामान तुडूंब भरलेले होते . रिफ्लेकर्स तर ठिकठिकाणी लावलेले दिसत होते .सगळे छोटेमोठे कलाकार आपआपला ड्रेस , दाढी मिशा चिकटवून , काही जण भगवी कपडे परिधान करून शॉटची वाट पहात निवांतपणे बाओबाबच्या विशाल वृक्षाखाली खूर्च्यांवर निवांत बसलेले होते . सुमो , इनोव्हा अशाप्रकारच्या मोठ्या वीसपंचवीस गाड्यांच्या काचांवर नंबर लावून शुटींगच्या ठिकाणी ही मंडळी आली होती .
मेकअपमन , छोटे छोटे असिस्टंट , डायरेक्टर्स , त्यांचे सहकारी , झेंडेवाले , बॅनर्सवाले हातात मोबाईल फोन घेऊन सगळीकडे फिरत होते.गार्डनच्या छत्र्या लावल्याने शुटींगच्या या जत्रेत खऱ्या जत्रेप्रमाणेच भरगच्चपणा आलेला होता .
            मग काही जणांशी चर्चा केल्यावर ही एका सिरियलची शुटींग असल्याचे कळाले . बिहार राज्याच्या पार्श्वभूमीवर आधारीत वेशभूषा असलेल्या व नेहमीचाच मसाला असलेल्या त्या सिरियलचे नाव आहे " तोसे नैना मिलाई के " मेणवलीच्या वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच्या रस्त्यावर शुटींग सुरु असल्याची माहीती मिळताच मी तिकडे पोहचलो .
           वाई मेणवली रस्त्यावर मोठा कॅमेरा लावलेला होता . फेल्टहॅट घालून दाढीवाला डायरेक्टर अँक्टर्स मंडळीना शुटींगचा सीन नीटपणे समजावून सांगत होता . कॅमेरामनला नीट फोकसिंग करण्याच्या सूचना देत होता .व्हिलन गळ्यात सोन्याची चेन , हातात लॉकेट , पांढरीशुभ्र धोती , व अधूनमधून मिशानां पीळ देत प्लास्टीकच्या खूर्चीवर उजवा पाय रेलून उभा होता . हिरॉईन आता वाड्याच्या प्रवेशद्वाराच्या रस्त्यातून वेगाने पळत येणार असते " नही करने हमे ये शादी "असे मोठमोठ्याने म्हणत रडवेला चेहरा करून व्हिलनच्या दिशेने येणार असते . एक सायकलवाला भय्या दुधाच्या 
किटल्या भरून निवांतपणे जाणार असतो . वाईतून जरा नीटनेटक्या कपड्यातील एक दिवसाच्या कामासाठी आलेल्या स्थानिक महिला हातात रिकामी पिशव्या घेऊन मॉबसीनसाठी ये जा करणार असतात . एवढासा छोटा सीन पण त्यात वास्तवतेचा स्पर्श होण्यासाठी ,दृश्य जिवंत दिसण्यासाठी किती आटोकाठ प्रयत्नाची शिकस्त करावी लागत होती . मध्येच मुख्य रस्त्यांवर वाहतूकीची कोंडी थांबवावी लागत होती . तीन वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठे कॅमेरा लावून चित्रिकरण केले जात होते . सिरीयलमध्ये प्रसंगाची कंटीन्यूटी येण्यासाठी लेखकाचे स्क्रीप्ट वारंवार सर्वानां ऐकवले जात होते . गाड्यांच्या नंबरप्लेटवर बिहारची गाडी वाटावी म्हणून नकली प्लेट लावल्या जात होत्या . अधूनमधून बिहारीभाषेत बोलण्यासाठी जाणीवपूर्वक माणसे चालत जात येत होती . दिडशे ते दोनशे माणसे एक शॉट यशस्वी होण्यासाठी जीवापाड प्रयत्न करत होती . लाईट , साऊंड ,ॲक्शन व कॅमेरा असा आरडाओरडा होत होता , एकवेळ रिअर्सल व तीनदा रिटेक घेऊन एकदाचा शॉट ओके झाला व लगेच दुसऱ्या शॉटची तयारी सुरु झाली .
           परत जाताना पाहतो तर घाटावरचा चौथरा आता पूर्ण झाला होता . नकली प्लायच्या फळ्या लावून असली दगडाचा वाटावा असा चौथरा पूर्ण झाला होता . आता त्यावर दहा फूटांची शंकराची मूर्ती विराजमान झालेली होती . त्यासाठी लागणाऱ्या मोठ्या आकाराच्या समया , हार , नारळ , पुजेचे सामान , त्रिशूळ , भगवे झेंडे सगळीकडे लावलेले होते . स्थानिक कलाकार दगडी भिंतीवरच्या डिझाईनला पुन्हा रंग भरत होते . फुलांच्या माळा मंदिराच्या घंटा असलेल्या कमानीवर लावल्या जात होत्या . एकंदर बिहारी छटपूजेच्या कार्यक्रमाचा देखावा उभा करण्यात आर्ट डायरेक्टर कमालीची मेहनत घेत होता .
           सिरियलचा स्मार्ट हिरो एका फोटोग्राफरकडून पिंपळाच्या मोठ्या गोल दगडी चौथऱ्यावरून स्वतःचे फोटो काढून घेत होता . त्याला फोटोसाठी विचारले तर त्याने प्रेमाने घट्टपणे हात हातात घेऊन माझी चौकशी करत चार पाच फोटो काढले . एकंदर शुटींगचा कार्यक्रम नकली असला तरी माणुसकीचे असलीपण टिकवून वाटचाल करीत असल्याची मला जाणीव होत होती.
           सिनेसृष्टी एक भारतातील मोठी इंडस्ट्री आहे . हजारो कलाकार ,लेखक , गायक , वादक , चित्रकार , डायरेक्टर्स , अभिनेते , अभिनेत्री यांचा भरणा असणारी मंडळी आपले नशीब रोज आजमावत असतात . कित्येक जणांना यश मिळते किंवा काही जणानां अपयशाच्या गर्ततेच्या वादळात करियरचा अंत पहावा लागतो . अपयशी झालेले कोणाच्या स्मरणातही राहत नाहीत . काही जण दुय्यम दर्जाचे म्हणून आयुष्यभर कष्ट करत राहतात .
           स्पॉटबॉय पासून ते चतुर्थ श्रेणीतील हेल्परसारखी कामे करणारी असंख्य माणसे पोटाची खळगी भरण्यासाठी या इंडस्ट्रीवर अवलंबून असतात . त्यानां काम मिळाले तरच त्यांच्यां कुटूंबाचा उदरनिर्वाह होणार असतो . त्यांच्या मुलानां शाळेची फी भरण्यासाठी यानां काबाडकष्ट करावे लागणार असतात . हा एक मोठा चालताफिरता काफीला असतो . आज एका ठिकाणी तर उदया दुसऱ्या लोकेशनवर भटकंती सुरु असते . सिरियल किंवा सिनेमा चालला तर त्यांच्या जीवनाचे रहाटगाडगे सुरु राहणार असते . अन्यथा कामावरून काढून टाकण्याची टांगती तलवार घेऊनच हातावर पोट असलेली ही मंडळी सतत अस्थीर जीवन जगत असतात . त्यानां कसले पेन्शन नसते ,भवितव्य नसते, म्हातारपणातील आरोग्याच्या सुखसुविधा नसतात . आणि त्यांच्यामागे कसल्याही प्रकारचा आशावाद , किंवा त्यांच्या स्वप्नानां आकार देणारा राजकीय वरदहस्त नसतो . सगळे भविष्य खोल अंधांतरी डुबलेले असते .
            आम्ही किती सहजपणे एखादा चित्रपट , सिरियल फालतू आहे असे समजून चॅनेल बदलतो पण त्या प्रत्येक शॉटच्या प्रसंगासाठी किती दिव्यातून जावे लागत असते हे त्या डायरेक्टरलाच माहीत असते .तो त्या अवाढव्य जहाजाचा कप्तान असतो . सगळ्या यश अपयशाची जबाबदारी त्याची असते .
           सामान्य माणसांच्या रोजच्या जगण्यापेक्षा शुटींगच्या या वेगळ्या जीवनपध्दतीचा थोडा काळ अनुभव घेऊन मी परत माझ्या दुनियेत परत आलो .
          येताना पारावर निवांत गप्पा मारत बसलेली माणसे पाहीली, दुकानात व घरात दोनशे रुपयाने गॅस स्वस्त झाला म्हणुन सुखावलेली माणसे पाहीली .शेतात नेहमीप्रमाणे कष्ट करणारे शेतकरी पाहीले , दुकानातून राजकारण्यानां नेहमीच्या शिव्या घालत रस्त्यावर पचापच पान तंबाखू खावून थुंकणारी माणसे पाहीली , घरातील सगळा कचरा बाहेर रस्त्यांवर , ओढ्यामध्ये , छोट्या पुलांवर  टाकून घाण करणारी नेहमीची गावातील माणसे पाहीली . शिवाय पहाटेची , दिवसभर वेळी अवेळी डिजे लावून मोठमोठ्याने लाऊडस्पीकरवर भेसूर आवाजातील गाणी व भजने ऐकत ऐकत माझा रोजचा दिनक्रम सुरळीत चालला आहे याची मला खात्री पटत जाते . आमच्या दुनियेत , रोजच्या  दिनचर्येत फार मोठा फरक नसतो
मात्र शुटींगची ही दुनिया वेगळीच असते . एका भ्रमनिरास , नकलीपणातील जीवनाला काही तास असलीपणाकडे घेऊन जाणारी . प्रत्येक दृश्याचे लोकेशन वेगवेगळे , प्रत्येक नवा दिवस निराळा , प्रत्येक शॉट वेगळा , प्रत्येक घटना वेगवेगळी . 
सायलेन्स ,
लाईट ,
साऊंड ,
ॲन्ड
ॲक्शन ............

शुटींग - वेगळी ती दुनिया .
🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭
🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬

सुनील काळे
9423966486

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड =Part 2

दूरदेशीची मैत्री - पार्ट 2 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝           24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम ...