* जॉय चिल्ड्रन्स ॲकडमी - वाई *
🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️
जया अंगी मोठेपण तया यातना कठीण . हे वाक्य मला मनापासून पटते कारण कोणतेही मोठ्ठ काम करायचं तर मोठ्या यातना सहन कराव्या लागतात . त्याग करावा लागतो .आता अगदी साधं उदाहरण म्हणजे एक छोटीशी खोली एकट्या माणसाला नीटनेटकी ठेवणे सहज शक्य असते पण पाच हजार स्केअर फूटांच्या बंगल्याची व अर्धा एकर बागेची निगा राखायची , परिसर नेहमी सतत स्वच्छ ठेवायचा म्हणजे तुम्हाला रोजचा वेळ द्यावा लागतो . आणि मग हा वेळ रोजच्या दैनंदिन अनेक कामातून कसा काढायचा कसा ? हा एक भलामोठा प्रश्न असतो . त्यामूळे मोठे काम करणाऱ्या सतत व्यस्त असणाऱ्या मोठ्या मंडळीचे मला नेहमीच कौतुक वाटते .
आमचा वाईतील मित्र वसिम पिंजारी असाच एक हुरहुन्नरी माणूस . सतत कामात मग्न व शोधक वृत्तीचा . अनेक प्रसिध्द राजकीय , सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना सतत पत्रलेखन करणारा मित्र . खूप दिवसांपूर्वी एक दिवस त्याचा मला फोन आला , आमच्या शाळेचे संस्थापक श्री . मनिंद्र कारंडे सर यानां घेऊन तुमच्याकडे येतोय . ते आले आणि मला लगेच जाणवले जया अंगी मोठपण तया यातना कठीण .
या पहिल्या भेटीतच कारंडे सरांचे व्यक्तिमत्व लक्षात आले . काही माणसे ध्येयाने झपाटून आपआपल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करत असतात . वाईसारख्या ग्रामीण तालुक्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढून या आजूबाजूच्या परिसरातील मुलानां ज्ञानाची कवाडे उघडी करून शिक्षणक्षेत्रात भरीव काम करून नवनव्या संस्था काढून मुलानां घडवणे ह्या एकाच उद्देशाने त्यांनी स्वतःला झोकून दिलेले आहे. जॉय चिल्ड्रन्स ॲकडमी वाई, नॅशनल पब्लिक स्कूल वाई, जॉय जुनियर कॉलेज वाई , डायनॅमिक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट वाई , जॉय किडस पब्लिकेशन्स -वाई , यासारख्या संस्था सुरु करून नेटाने हे ज्ञानदानाचे अनमोल ,अखंड कार्य पूर्ण दिवसभर चिकाटीने ते करत असतात . मुलांच्या मानसशास्त्राचा त्यांचा सखोल अभ्यास आहे . आपल्याला एखादे छोटे ऑफीस सांभाळताना त्रेधातिरपीट उडते . कारण इतक्या संस्था सुलभपणे सुरु ठेवताना वेगवेगळ्या स्वभावाची अनेक माणसे सांभाळावी लागतात . त्यांना सांभाळताना त्यांच्या व्यक्तिगत अडचणी , त्यांचे व्यक्तिगत सुखदुःखाचे क्षण , भावभावना व प्रत्यक्ष रोजचे मूडस , हेवेदावे व जगण्याचे व्यवहार कुशलतेने पार पाडणे हे सोपे काम नाही .
अशा या चतुरस्त्र कार्यमग्न मनिंद्र कारंडे सरांचा मला फोन आला की त्यांच्या संस्थेत वार्षिक सायन्स व चित्रकला हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन आहे त्यासाठी तुम्ही दोघांनी उदघाटन करावे व तुमचे अनुभव मार्गदर्शन करावे त्यातून विद्यार्थ्यानां प्रेरणा मिळेल .
खरं सांगायचं तर चित्र काढणे मला सोपे वाटते पण भाषण करणे , हजारो लोकांसमोर बोलणे ते ही इंग्रजीत बोलणे म्हणजे सकंट आल्यासारखे वाटले . मी लगेच प्रतिसाद दिला नाही पण कारंडे सर हार मानणारे नाहीत त्यांनी व त्यांच्या सहकारी मंडळीनी माझ्याकडून होकार मिळवलाच .
पाचगणीच्या बिलिमोरीया स्कूलमध्ये एक वर्ष व ब्रिटीशकालीन सेंट पीटर्स स्कूलमध्ये चार वर्षांचा शैक्षणिक कडक अनुभव घेऊन बरीच वर्ष होऊन गेली होती . शाळांचा नंतर खास सबंध आला नाही . म्हणून एक दिवस जॉय स्कूल पाहून आलो . आमच्या ओळखीच्या सौ प्रमिला झांबरे मॅडम तेथे उपप्राचार्या म्हणून कार्यरत आहेत . शाळा , तेथील विद्यार्थी , शिक्षकवर्ग , सर्व सहकारीवर्ग छान एकमेकाला सोबत घेऊन खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थी घडवत होते . ब्रिटीशांची इंग्रजी भाषा शिकवताना आपली मराठी संस्कृती , सण, संस्कार ,टिकवून वाटचाल करत असलेले दिसले .
२ मार्चला बरोबर नऊ वाजता आम्ही तेथे पोहचलो . मुद्दाम टायसुट बूट घातले नाही . उगाच दडपण नको म्हणून . तेथे मराठी संस्कृती जोपासत कुंकूम टिळा लावून पुष्पगुच्छ देऊन आमचे जोरदार स्वागत केले गेले . डॉ. ओ.पी.जी अब्दुल कलाम व थोर शास्त्रज्ञ व्यंकटरमण यांच्या तसबिरानां हार घातले व नमस्कार केला . समोर जॉय स्कूलच्या उत्साही विद्यार्थीवर्ग पाहून खुर्चीवर बसलो . माझा व स्वातीचा इंग्रजीतून परिचय करून दिला आणि मग मी भाषण सुरु केले . खरं तर सगळ्याच कलावंताचा त्यात चित्रकलेसारख्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रयत्न करताना आलेले अनुभव इतके मोठे व इंटरेस्टींग होते की मुले टाळ्या वाजवत प्रतिसाद देत होती . इंग्रजी भाषा असो की इतर कोणतीही भाषा असो मनापासून संवाद साधला तर एकमेकांचे सुर व ताल देखील जुळतात . मग भाषा ही व्याकरणाच्या चुका काढण्यापेक्षा संवादाचे प्रभावी साधन बनते .
मी फक्त मुलानां एवढेच सांगत होतो की तुम्ही स्वतःलाच विचारा व शोध घ्या की तुम्हाला कोणते क्षेत्र मनापासून आवडते . पूर्ण मनापासून आवडणारे क्षेत्र निवडले की मग कष्ट करताना तडजोड करू नका , त्या क्षेत्रातील सर्व गोष्टींचा अभ्यास करून प्रचंड मेहनत करा . अनेक अडचणी येणारच आहेत पण ध्यास घेऊन उत्तुंग यश मिळवताना अपयशाचाही सामना करावा लागणार आहे तर तेथे थांबू नका . अपयशाचेही संशोधन करा त्या चुका सुधारून पुन्हा जोमाने वाटचाल करा . दरवेळी प्रयत्न करताना नव्या चुका करा त्या परत सुधारायला मार्ग काढा .निगेटिव्ह व पॉझिटीव्ह दोन्ही शक्यता सतत पडताळून पहा . मग यश मिळणारच . यशस्वी होण्यासाठी ध्यास महत्वाचा असतो. मला आलेले काही अनुभव सांगत भाषण संपवले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला त्यावेळी एक अनोखा उत्साह प्रत्येक विद्यार्थी मित्रांच्या चेहर्यावर दिसून येत होता .
गणित , जीवशास्त्र , भौतिकशास्त्र , इतिहास , भूगोल , मराठी, हिंदी , इंग्रजी भाषा , पर्यावरण , कॉम्पुटर चित्रकला हस्तकला , या अनेक विषयांचे व नवनव्या गोष्टींचे विभागवार सुंदर प्रदर्शन मांडले होते .त्या विषयातील प्रयोग कसा केला ? मॉडेल कसे बनवले ? हे कसे कार्यरत आहे ? त्याचा उद्देश काय हे सांगतानाचे त्या छोट्या छोट्या विद्यार्थ्याचा उत्साह , जिज्ञासा , आत्मविश्वास पाहून नवीन पिढी वाया चालली आहे असे बिलकूल वाटले नाही . उलट आपणच नवे तंत्रज्ञान समजून घ्यायला कमी पडतोय की काय ? याची जाणीव मला होत होती .
नेमक्या त्यादिवशीच रात्री श्री .मनिंद्र कारंडे सरांच्या आई देवाघरी गेल्या . त्यामूळे ते आले नव्हते . पण शो मस्ट गो ऑन या तत्वानुसार त्यांनी कार्यक्रमात बदल केला नाही . शाळेच्या प्राचार्या सौ . फरांदे मॅडम , उपप्राचार्या सौ . झांबरे मॅडम व त्यांचे सर्व शिक्षक सहकारी यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला . वसिम पिंजारीने कार्यक्रमाचे व उद्घाटनाचे फोटो काढले .
२ मार्च २०२३ हा जीवनातील एक दिवस जॉयस्कूलच्या प्रदर्शनामूळे , प्रेरणा देणारा , शाळेच्या जुन्या आठवणी जागृत करणारा व सळसळत्या नव्या पिढीचा उत्साह पहात कायम लक्षात राहणारा ठरला .
ग्रामीण भागात कमी फी आकारत अनेक अडचणींना तोंड देत शिक्षण क्षेत्रात सतत कार्यरत असणाऱ्या व नवी विद्यार्थी पिढी घडवण्याचा , सर्वानां उच्च ध्येयांनीं प्रेरीत करण्याचा ध्यास घेतलेल्या ऋषितुल्य मनिंद्र कारंडे सर , सौ .मीना कारंडे मॅडम व त्यांचे सर्व सहकारी स्टाफ मेंबर्स , प्राचार्या , उपप्राचार्या व सर्व शिक्षकानां मनापासून प्रणाम व सर्व विद्यार्थीवर्गाला उज्वल भवितव्यासाठी ... . . . . . . .
खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा !
💐💐💐💐💐💐💐💐
सुनील काळे✍️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा