मी ' वाडा ' बोलतोय .....
पाचगणी सोडून आता सात आठ वर्षे झाली . वाईपासून 3 km अंतरावर मेणवली वाड्याजवळच राहण्यासाठी घर आणि स्टुडिओचे बांधकाम पूर्ण केले आणि रोज सकाळी घाटावर फिरायचा छंद लागला. एक छोटेसे स्केचबुक दोनतीन पेनपेन्सीली खिशात टाकून सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घाटावर फिरताना जो आनंद मिळतो तो खरं सांगायचे म्हणजे शब्दात व्यक्तच करता येत नाही .
आजही नेहमीप्रमाणे मी वाड्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली . आज गुढीपाडवा त्यामूळे प्रत्येक घरासमोर गुढी उभारण्याची तयारी करण्यात गावकरी डूबून गेले होते . मी देखील तो आनंदोत्सव पहात पहात नाना फडणवीस वाड्यापर्यंत पोहचलो . वाड्याच्या मुख्य प्रवेशदाराला विशेष नक्षीदार तोरण बांधलेले दिसत होते. भगवा झेंडा दिमाखाने डौलत होता . वाड्याची देखभाल करणारे मॅनेजर देशपांडे व सहकारी जगताप यांची फडणवीस वाड्याची गुढी उभारण्याची जय्यत तयारी चालली होती .
इतक्यात आमचे दै .प्रभातचे पत्रकार मित्र श्रीनिवास वारुंजीकर यांचा फोन आला . आज मेणवलीत सातारचे कलेक्टर श्री.शेखर सिंग व इतिहासाचार्य पांडुरंग बलकवडे येणार आहेत . आम्ही कार्यक्रमासाठी मेणवलीत वाड्याजवळ आलो आहोत . त्यावेळी नेहमीप्रमाणे मी घाटावर मोठ्या गोल चौथऱ्यावर पाय पसरून निवांत स्केचेस करत होतो. थोड्याच वेळात पत्रकार मित्रांचे घाटावर आगमन झाले आणि मग आमची फडणीस वाड्याच्या कार्यक्रमाविषयी चर्चा सुरु झाली , त्या कार्यक्रमाचे नाव होते
मी ' वाडा ' बोलतोय .....
खरंतर आज वाडा सर्वांबरोबर बोलणार होता . पण मला मात्र आठवतेय गेल्या कित्येक वर्षांपासून वाडा माझ्याशी कितीतरी वेळा बोलला होता . तुम्ही म्हणाल कसे शक्य आहे ? वाडा कसा बोलेल? पुतळे , वाडा , किल्ले , गढ्या, डोंगर , झाडे ,झुडपे , पशू , पक्षी , प्राणी आपल्या बरोबर संवाद साधण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात . डोंगरानां वणवे पेटवले की डोंगर होरपळतात , कितीतरी पक्षीप्राणी त्या वणव्यामूळे बेघर होतात . कोंबड्या , बकरे यांच्या मानेवर सुरी फिरली की जिवाच्या आकांताने ते ओरडतात पण माणसाने क्रूरपणाची परिसिमा गाठली आहे . माणूस स्वार्थी व जाणूनबूजून बहिरा झाल्यामूळे त्याला या पर्यावरणाच्या संवेदनाचे मूक आक्रदंन मनापर्यंत पोहचत नाहीत .
आमचे मूळ गाव पांडवगडाच्या पायथ्याशी असलेले पांडेवाडी . भोगाव , मेणवली व पांडेवाडीच्या जत्रा एकापाठोपाठ एक दिवसानंतर असतात . त्यामूळे लहान असल्यापासून खूप वेळा या जत्रेच्या वेळी मेणवली घाटावर यायचो . पुढे चित्रांची आवड निर्माण झाली त्यावेळी वाड्यात नेहमी यायचो . त्यावेळी वाडा सताड मोकळा व उघडा असायचा . वाड्याच्या भिंती पडलेल्या असायच्या , सागवानी लाकडाला वाळवी लागलेली असायची , कोनाड्यानां कोळीष्टके लागलेली असायची ,वाड्याच्या आत काही मुस्लीम शेतकामगारांची कुटूंबे राहायची . पत्र्याच्या व प्लायवूडच्या रंगीत तुकड्यांनी खिळे ठोकून तयार केलेल्या छोट्या छोट्या खोल्या मला अमूर्त चित्रांची आठवण करून द्यायच्या . वाड्याला कोणी वारसदार नसल्यासारखे त्याचे पडीक हाल पाहुन मनाला वेदना व्हायच्या . वाड्यात मराठेशाहीतील भित्तीचित्रे होती पण त्यावर पर्यटकांनी रेघोटया मारून , खरवडून स्वतःची व प्रेमिकेचे नावे टाकून आपली संस्कृती दाखवली होती . मग त्या भित्तीचित्रांच्या खोल्यानां कायमस्वरूपी कुलूपे लावून , पर्यटकांना दाखवण्यासाठी कायमची पूर्ण बंदी केली गेली .
आतले सागवानी लाकडांचे नक्षीकाम , मस्तानीचा पलंग , खिडक्या , चौथरे , वाड्याची काळी कौले पूर्णपणे ढासळून विस्कळीतपणे पडलेली असायची . मग वाडा माझ्या त्याच्या या वाईट अवस्थेबद्दल माझ्याशी बोलायचा . तक्रारी करायचा . त्याच्या तक्रारी व झालेली पडझड पाहून मन दुःखी व्हायचे . वाटायचे या वाड्याचे नशीबच वाईट . मग मी त्याला समजावयाचो की बाबारे भारतामध्ये जुन्या वास्तूंचे संवर्धन करायची परंपरा व सवय नाही . तुझ्या भावना समजतात मला . पण मी एकटा काय करू शकतो ? ज्या राजकारणी लोकानां आम्ही निवडून दिले , ज्यांच्या हातात सत्ता दिली अशी सर्व मंडळी आपआपल्या पक्षांचा झेंडा घेऊन एकमेकांशी इतके जोरदारपणे भांडंत बसतात , त्यांच्या एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात किल्ल्यांच्या ,गडाच्या , जलदुर्गांच्या , जुन्या वाड्याच्या वास्तूंच्या सुधारणा करण्याची जबाबदारी ते विसरूनच गेलेत .
महाराष्ट्रात कितीतरी चांगली ठिकाणे माणसांच्या दुर्लक्षितेमुळे , राजकारण्यांच्या उदासीनतेमूळे दुर्देवी आणि अविकसित राहीली . कित्येक जुन्या वास्तूंचा अंत झाला .त्या अंत होणाऱ्या वाड्यांपैकीच हा मेणवलीचा फडणवीस वाडा देखील असावा .
पण कधीतरी खऱ्या प्रार्थनेतून खऱ्या अस्थेमधून , खऱ्या श्रध्देतून मोठा चमत्कार होतो असे म्हणतात , तसाच चमत्कार मी गेल्या चारपाच वर्षांपासून पाहतोय .
एकदा सकाळी घाटावर फिरत असताना वाड्यात अनेक कारागीर काम करत असताना पाहीले . संपूर्ण छतावरची कुजलेली फुटलेली कौले काढून नवा पत्रा बसवायचे काम सुरू झाले होते . प्रवेशद्वाराच्या दरवाजानां दुरुस्त करून लाकडी पॉलीश केले जात होते . सदरेचा भाग पूर्णपणे काढून सागवानाच्या जुन्या लाकडांचा उपयोग करून नवी सदर दिमाखाने उभी राहत होती . पायाला अडथळा ठरणाऱ्या पाण्याच्या गटारांवर लादी बसवण्याचे काम सुरु झाले होते . नक्षीदार छत , महिरिपी मराठेशाहीतील तुळ्या , खांब यांची योग्य ती दुरुस्ती करून चकाकी आणली जात होती . अंधारात धडपडत वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असलेल्या पायऱ्यांची दुरुस्ती करून लाईटची सोय केलेली होती . मुख्य चौकातील तुटलेले छोटे वर्तृळाकार सागवानी घुमट नव्या आकारात पुन्हा बांधले गेले होते . आता दररोज सकाळी फिरताना वाड्याची होणारी प्रगती कळत होती .सकाळी सहा वाजल्यापासून कामगार निष्ठेने वाड्याच्या जिर्णोद्धार करण्याच्या कामाला लागलेले असायचे . त्या होत असलेल्या या सुधारणांमूळे मग वाड्याच्या बोलण्याचे ' तथास्तू ' असे समाधानाने तृप्त झालेले आशिर्वादाचे शब्द मला स्पष्ट ऐकू येऊ लागले . वाडा आता प्रेमाने सगळ्यानां सांगू लागला . या सर्वजण आणि इयरफोन लावून ऐका खरंच
मी ' वाडा ' बोलतोय .........
हळूहळू वाडा , त्याच्या तटबंदी , बुरुज , नगारखान्याचे छत , प्रवेशद्वार नव्या तेजाने चमकू लागली . आतली प्रत्येक खोली नीटनीटकेपणाने सजवली जात होती . प्रत्येक जागेचे महत्व शोधून त्या खोल्यानां नावे दिली गेली . माहीती नकाशा फोटोंचे फ्लेक्स लावले जात होते . वाड्यात चार पाच स्थानिक पूर्ण ट्रेनिंग दिलेले गाईडस आता पर्यटकांबरोबर फिरून वाड्याचा इतिहास व पेशवाईतील महत्वाच्या जुन्या गोष्टीनां उजाळा देऊ लागले . पोवाडे वाजू लागले . वाडा आता झाडून पुसून पर्यटकांसाठी खुला केला आणि इतक्यात कोव्हीडचे संकट सुरु झाले . त्यात दोन वर्ष त्या महामारीत निघून गेली . आज नव वर्षाच्या सुरुवातीस संपूर्णपणे करोनामूक्त झालेच्या शासकीय घोषणेमूळे महाराष्ट्रातील पर्यटक पुन्हा नव्याने मोकळा श्वास घेऊ लागला . फिरू लागला . सगळ्या वाड्याचा जणू कायापालटच झाला .वाडा पुन्हा सजून सज्ज झाला व सर्वानां म्हणू लागला या ऐका
मी ' वाडा ' बोलतोय .......
आज सातारा जिल्ह्याचे कलेक्टर श्री . शेखर सिंग व इतिहासकार पांडूरंग बलकवडे यांच्या उपस्थितीत वाडा नव्याने बोलू लागला . आता आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून असे एक ॲप तयार केले आहे की वाड्यातील प्रत्येक जागेचा , बुरुजाचा , कोनाड्याचा इतिहास आता कानाला इयरफोन ऐकत जोपसला जाणार आहे . खऱ्या अर्थाने एका जुन्या पण नव्या तेजस्वी रुपात पर्यटनस्थळाचा कायापालट केला गेला . मला त्याचा साक्षीदार म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळत होती म्हणून मुद्दाम कार्यक्रमाला उपस्थित राहीलो .
वाड्याचे आत्मवृत्त ऐकताना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे सध्या वारसदार असलेल्या अनिरुध्द , नितिन , अविनाश , संदीप या मेणवलीकर फडणवीस बंधू ,त्यांच्या बायका व नवीन पिढीतील संपूर्ण कुटूंबच या कार्याने भारावलेले आहेत . हे कार्य आपले एकट्याच्या स्वार्थासाठी नसून पुढील भावी पिढीसाठी आणखी पुढची अडीचशे वर्षे तरी ही वास्तूरुपाने सतत नव्याने आपला गौरवशाली इतिहास जोपासला जावा या साठी तनमनधनाने झटत होती . त्यांचा आदर्श नव्याने तरुणाईला प्रेरीत करणारा आहे . अशा श्रध्देने , निष्ठेने व भारावलेल्या परंपरेने इतिहास जपणारी माणसे पाहून कौतूक वाटत आहे.
अतिशय उत्तम लेखन करणारे व भारदस्त धारधार आवाजात हा इतिहास ऑडीयो रुपात साकार करणारे किरण यज्ञोपावित यांची भेट झाली . इतिहासाचा मागोवा घेत जुन्या गोष्टीनां धक्का न लावता जिर्णोद्धार करणारे आर्कीटेक्ट राहूल चेंबूरकर यांचे काम वाखाणण्याजोगेच आहे . शिवरायांचे स्वराज्य व्यवस्थापन या विषयावर पी . एच .डी करणारे डॉ.अजित आपटे व इतर स्क्रिप्ट रायटींगसाठी मदत करणाऱ्या अनेकजणांची भेट घेता आली .
जिल्हाधिकारी श्री. शेखर सिंग यांनी आपल्या मराठी भाषणात या वाड्याचे नव्याने जिर्णोद्धार करणाऱ्या सर्व मेणवलीकरबंधूचे मनापासून कौतुक केले . त्यानां दिलेले स्मृतीचित्र (मोमेन्टो) आवडल्याचे त्यांनी कबूल केले .पाचगणी महाबळेश्वरला होणाऱ्या अमाप गर्दीमुळे पर्यटकांनां नव्याने उदयास आलेला जिर्णोद्धारीत मेणवलीचा वाडा सर्वानां आकर्षित करेल अशी अपेक्षा व्यक्त केली. वाईच्या परिसरात असलेल्या अनेक जुन्या मंदिरानां , वाड्यानां नव्याने पुनर्जिवित करण्याची गरज असून पर्यटनवाढीसाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे. हे कार्य स्थानिक व शासनातील मंडळीनी मिळून करावे असे आवाहन त्यांनी केले .
इतिहासकार पांडूरंग बलकवडे यांनी पेशवाईतील नाना फडणवीस यांच्या कार्यावर नव्याने प्रकाश टाकला. अतिशय धोरणी , चतुर व मुत्सदी नानांनी कठीण काळात पेशवाईचा डोलारा सावरण्यासाठी किती कष्ट घेतले याची जाणीव करून दिली . महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी विखुरलेले किल्ले , वाडे , जलदुर्ग यांचा जिर्णोध्दार करून असे वैभव व परंपरा जपण्याची जबाबदारी सर्वांनी थोडीथोडी घेतली पाहीजे , हातभार लावला पाहीजे अशी अपेक्षा व्यक्त केली . त्यांचे हे छोटे भाषण संपूर्ण साडेतीनशे वर्षाच्या इतिहासाला उजळणी देणारे ठरले .
मेणवली ग्रामस्थांनी उपस्थित पाहुण्यांचा सत्कार केला . उपसरपंच संजय चौधरी यांनी जिल्हाधिकारी ,
शासनातील उपस्थित असलेल्या प्रांत ,
तहसिलदार , सर्कल , उपविभागीय अधिकारी , वाईचे मुख्याधिकारी व काही नगरसेवक , मान्यवर नागरीक यांच्या उपस्थितीबद्दल संतोष व्यक्त केला . तसेच मेणवली हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी , तरुण मुलानां नव्या रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी योजनांचा पाठपुरावा करावा म्हणून अपेक्षा व्यक्त केली . वाड्याजवळ नदीशेजारी पर्यटकांसाठी बोटींग सुरू करण्याची मागणी केली . वाड्याच्या परिसरात सार्वजनिक शौचालय व स्वच्छता अभियान राबविण्यासाठी व विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी केली . आणि हे सगळे प्रत्यक्षात उतरले तर एकमेकांच्या साथीने मेणवली गाव एक दिवस खरोखर भारताच्या पर्यटनाच्या दृष्टीने दखलपात्र होईल अशी अपेक्षा केली .
अतिशय नीटनेटकेपणा व उत्तम व्यवस्थापन उत्तम सुत्रसंचालन केलेल्या या कार्यक्रमाची सांगता सुंदर आवाजाच्या पसायदानाने झाली
आज आपण या परिसरात घर बांधून चूक केली नाही या विचाराने माझ्या मनाला आनंदच झाला .
या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या सर्व उत्साही मेणवलीकर बंधू व कुटूंबातील सर्व सदस्य ,त्यांच्या टिममधील श्री . रोहन देशपांडे , श्री .जगताप यांच्यासह सर्व सहकारी सदस्यांचे मनापासून आभार व धन्यवाद ! या सर्वांचे टिम वर्क खरोखर कौतुकास्पद होते .
मेणवली वाडा व परिसर संपूर्ण फडणवीस यांची खाजगी मालमत्ता आहे . त्यासाठी सुधारणा , विकास व मेंटेनन्ससाठी आता पार्किंग (३० रुपये) व प्रवेशमुल्य ( ४० रुपये )आहे हे जाण्यापूर्वी लक्षात घ्यावे .
विशेष सुचना : चित्रकारानां , फोटोग्राफर्सना घाटावर प्रत्यक्ष स्केचिंग करणाऱ्यानां मात्र एकदा प्रवेशमूल्य दिल्यानंतर परत स्वतंत्र लेखी परवानगी अर्ज द्यावा ,चित्र काढण्यासाठी वेगळे कमिशन मूल्य द्यावे अशी कृपया सक्ती करू नये अशी मेणवलीकर बंधूना प्रेमळ विनंती . कारण ते त्यांच्या चित्रांतून तुमचा वाडा व घाटाचा परिसर आणखी सौंदर्यपूर्ण करून प्रदर्शनाद्वारे जगभर प्रसिद्धच करत असतात . त्यानां मुक्तपणे चित्रण करून द्यावे . ती चित्रे , स्केचेस रसिक पाहतील त्यावेळी त्यांचाही आनंदही द्विगुणित होणार आहे व पर्यटन वाढीसाठी प्रसार होणार आहे याची जाणीव ठेवावी .
आजचा गुढीपाडवा खऱ्या अर्थाने साजरा झाला .
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
सुनील काळे
9423966486
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा