शनिवार, १५ जानेवारी, २०२२

संकल्प

* संकल्प *     
🎨🖌️🎨🖌️🎨🖌️🎨🖌️🎨🖌️🎨🎨🖌️🎨🖌️🎨🖌️🎨🖌️🎨🖌️🎨🖌️🎨🖌️🎨
         "नवीन वर्षाची सुरुवात होते म्हणजे नेमके काय होते ? तर 31 डिसेंबरला शेवटच्या दिवशी वर्षाची सांगता होते व नव्या कॅलेंडर्सची तारीख सुरु होते .येणारा सुर्य नेहमीप्रमाणे रोजच्या रोज उगवणार असतो आणि  संध्याकाळ झाली की मावळणार देखील असतो. मग परत एकदा रोजचे  रुटीन सुरु होते . आलेला दिवस नेहमीप्रमाणे व्यस्त किंवा स्वस्थ रुटीनप्रमाणे संपतो . नवीन वर्षाची ती नवी नवलाई , नव्याची उत्सुकता आणि मनात ठामपणे ठरवलेले नवनवे संकल्प देखील आपण हळुहळू पूर्णपणे सराईतपणे विसरूनही जातो. सर्वांप्रमाणे मी सुद्धा दरवर्षी काही तरी नवा संकल्प करायचो तो पुर्णत्वास नेण्याचा कसून प्रयत्न करतो . पण गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीने अशी काय विचित्र परिस्थिती निर्माण केली की सगळे संकल्प गुंडाळून ठेवावे लागले . मनातले कितीतरी चांगल्या संकल्पानां , चांगल्या गोष्टीनां मुठमाती द्यावी लागली .
       पण कधीकधी हे मनाशी ठामपणे ठरवलेले संकल्प पूर्ण केल्याचे मला आठवतात . आज अशाच एका पूर्ण केलेल्या संकल्पाची आठवण झाली .
        आपल्या आयुष्यात भेटणारे वेगवेगळे लोक व काही भारी गुरु असे भेटतात की त्यानां उभ्या आयुष्यात विसरताच येत नाही . 
        खूप वर्षांपूर्वी १२वी सायन्स शिकत असतानाच मला चित्ररेखाटनांचा नाद लागला. मी अनेक स्केचेस व चित्र रेखाटत होतो पण मला तंत्र माहीत नव्हते . कोणता कागद घ्यावा ? कोणती पेन्सील वापरावी ? त्या माध्यमांचा वापर करून स्केच प्रभावी कसे करावे ? याची मला माहीती नव्हती त्यामूळे  सतत प्रश्न पडायचे .
          चित्रकलेच्या कॉलेजला जाण्यासाठी इंटरमिजिएटची परिक्षा द्यायला पाहीजे हे मला कळाले . पाचगणीत इतक्या शाळा असूनही चित्रकला परिक्षेचे केन्द्र नव्हते .वाईला द्रविड हायस्कूलमध्ये ते आहे याची मी माहीती काढली . परिक्षेचा फॉर्म भरायला गेलो त्यावेळी प्रथमच द्रविड हायस्कूलची आर्ट रूम पाहीली . एका कोपऱ्यात प्रशस्त मोठी खोली आणि त्या खोलीभर व्यवस्थित लावलेली मुलांची चित्रे . वर्गाबाहेर प्रवेशद्वारावर स .कृ काळे यांचे ऑईल कलरमधील जुने मुख्याध्यापक ढवळीकर सरांचे सुंदर व्यक्तिचित्र लावलेले होते  . वर्गामध्ये आत प्रवेश करतानाच फळयाच्या वर भलेमोठे १२ फूटी निसर्गचित्र लावलेले असायचे. या सर्व चित्रांमध्ये मला अजूनही लक्षात असलेले चित्रकलाशिक्षक सु .पि .अष्टपुत्रे यांचे एक चित्र होते . 
           रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार वडाची मोठी झाडे , त्या वडाच्या झाडाच्या अवाढव्य मोठ्या  फांद्या , जाडजूड बुंधे त्या झाडाच्या दूरवर पसरलेल्या सावल्या व त्या सावल्यांमधून दोन तीन डौलाने चाललेल्या बैलगाड्या होत्या .त्या बैलगाड्यांवरचे शेतकरी कुटूंब मजेने प्रवास करत होते . त्या तैलरंगातील चित्राने माझ्या मनाचा ताबा घेतला . मी पूर्णपणे विसरूनच गेलो होतो स्वतःला . त्या चित्राखालची मराठीतील सही होती सु .पि. अष्टपुत्रे .
         मग मी अष्टपुत्रे सरांचा मनातून चेला झालो. त्यांचे मार्गदर्शन मिळावे म्हणून सतत द्रविड हायस्कूलला जाऊ लागलो . माझी चित्रे दाखवू लागलो सतत नवी चित्रे दाखवूनही गुरुवर्य अष्टपुत्रे सर काही प्रसन्न होईनात . मग मी त्यानां मला मार्गदर्शन करावे अशी इच्छा व्यक्त केली, शिष्यत्व पत्करणाची तयारी दाखवली . नवीन वर्षाचा पहिला दिवस गाठून त्यांच्यापुढे दोन्ही हात जोडून नतमस्तक झालो .
           माझा नव्या वर्षाचा ,नवा सळसळता  उत्साह ,संकल्प पाहून अष्टपुत्रेसर मात्र भयंकर गंभीर झाले व शांतपणे  म्हणाले " असे कर मित्रा , तु मला यापुढे एका वर्षानंतरच भेट . आजचा दिवस मी माझ्या डायरीत लिहून ठेवतो व तू पण तुझ्या  डायरीत लिहून ठेव. बरोबर एक वर्षानंतर भेटू . पण भेटण्यापूर्वी तू एक काम करायचे . प्रत्येक दिवशी एक तरी स्केच किंवा चित्र काढायचेच , ज्या दिवशी चित्र काढले नाही तर त्यादिवशी झोपायचे नाही . एकतरी चित्र पुर्ण करायचेच मगच झोपायचे . अशी ३६५ दिवसांची ३६५ चित्रे पुढच्या जानेवारीच्या एक तारखेला घेऊन ये . आणि हो ,चित्रे काढलीस तरच भेटायला ये अन्यथा येऊ नकोस . "
            एखाद्या विद्यार्थ्याला कटवायची सरांची स्टाईल बघून मी मात्र मनातून जाम नाराज झालो थोड़ा निराशही झालो. त्यावर्षी मला वाईला इंटरमिजिएटला  A ग्रेड मिळाले व मी कोल्हापूरला कलानिकेतन महाविद्यालयात प्रथम वर्ग फौडेंशनला दाखल झालो . पण मनातून मी अष्टपुत्रेसरांचे चॅलेंज स्विकारले होते . मनात एक  ' संकल्प ' ठामपणे  तयार झाला होता .मग नित्यनियमाने रोज एकतरी जलरंगातील छोटे निसर्गचित्र , किंवा पेन्सीलस्केच करायचो . मार्गदर्शनापेक्षा ध्यास महत्वाचा असतो हे मला नव्याने कळत होते . एक चुक पुन्हापुन्हा करायची नाही . तसा मी रोज चुकत होतो पण पुन्हा नव्याने स्वतःला घडवत होतो . आपल्या चुका सुधारत सुधारत पुन्हा नव्याने घडत राहणे ही खरी कलाशिक्षणाची पायरी असते .
         अशी सगळी ३६५ चित्रे त्या वर्षी प्रत्येक दिवसाची तारीख टाकून मी तयार केली . पण वर्षाच्या शेवटी मी अष्टपुत्रे सरानां भेटायला गेलोच नाही . कारण माझा मलाच  नव्याने शोध लागला . त्यांच्या शेजारी बसून मला प्रत्यक्ष चित्रकाम पाहता आले नाही पण अप्रत्यक्षपणे माझ्या कृतीमधून मलाच खूप मार्गदर्शन मिळाले होते . मीच माझा गुरु झालो होतो. चित्रे कोणीतरी काढायला सांगतो म्हणून निर्माण करायची नसतात तर चित्रे ही आपली आंतरिक भूक असायला हवी . रोज पोटाला जशी भूक लागते मग आपल्याला चित्रांची भूक रोज लागते का ? असे प्रश्न पडायचे .
चित्र सांभाळावी लागतात ,त्यांची जपणूक हळूवारपणे आपल्या मुलांपेक्षा जास्त नाजूकपणे करायला हवी कारण तेथे आपला जीव ओतून वेळ घालवलेला असतो . चित्रांचा ध्यास आतूनच घ्यायला हवा . चित्रनिर्मितीची प्रोसेस कोणाला इंप्रेशन मारायची गोष्ट नसते . चित्र काढताना आपण काळ वेळ भान हरपून जातो , ती निर्मितीची अवस्था म्हणजेच ध्यानाची अवस्था असते . आपण कार्यरत असलेल्या कलाप्रकारात किंवा नोकरीत किंवा व्यापार ,उद्योगधंदयाच्या सरकारी किंवा निमसरकारी , प्रायव्हेट शिक्षण , वकीली , वैद्यकिय किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात जरी कार्यरत असलो तरी त्यामध्ये ' सातत्य ' हवे धरसोड वृत्ती नको . जीवनामध्ये  प्रत्यक्ष शिकवणारा गुरु मिळाला तर ठिकच ,नाही समजा नाही मिळाला तर एका मोठ्या गुरुला नेहमी शरण जावे . जो सतत शिकवायला तयार असतो त्याचे नाव  " निसर्ग " . हा निसर्ग गुरु कोणालाही शिकवायला कधीच नकार देत नाही . आणि दुसरा गुरु म्हणजे ' अनुभव ' या येणाऱ्या  अनुभवातून आपण सतत नवीन शिकण्याच्या प्रोसेसमध्ये राहतो . 
आणि न कंटाळता सतत नवीन गोष्टी प्रामाणिकपणे शिकत राहण्याची प्रोसेसच आयुष्यात खूप महत्वाची ठरते , खूप खूप शिकायला मिळते .
            करोनामूळे प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन चित्र काढण्याचे दोन वर्ष झाले जमलेच नाही . त्यात पायाचा अपघात व करोनाचा आजार यात वर्ष कसे निघून गेले ते समजलेच नाही.
         आज नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रत्यक्ष ऑन द स्पॉट चित्र रेखाटण्यासाठी वाईला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या प्राज्ञपाठशाळेची निवड केली . या वाड्यात कितीतरी वेगवेगळ्या क्षेत्रातील संशोधक , दिग्गज , हुशार ,अभ्यासू ,महान , साहित्यिक , चित्रकार , लेखक , यांचा मुक्काम असायचा . तर्कतीर्थांच्या स्पर्शामुळे पावन झालेली ही वास्तू आज आतून मोडकळीस आली आहे पण ती इमारत बाहेरून खंबीरपणे उभी आहे . तिच्या अनेक छोट्या ,मोठ्या खिडक्या , जुन्या वीटांची मांडणी व मोठमोठ्या दगडांचा भारदस्त पाया मला चित्र काढण्यास खुणावतो . आज जाणवते विविध क्षेत्रातील कलांचा पाया म्हणजे सततचा ' सराव ' हा महत्वाचा आहेच पण खरा ' ध्यास ' ही तितकाच महत्वाचा . आणि त्या सरावामूळे कामात सुधारणा होत ' सहजता ' येत जाते .
           
        चित्र पूर्ण करून घरी आल्यानंतर जे.जे स्कूल ऑफ आर्टचे श्री. गजानन शेपाळ यांचा मेसेज पाहीला .काही दिवसांपूर्वी त्यांनी सहकुटूंब आमच्या स्टुडीओला सदिच्छा भेट दिली होती . त्यांनी तरुण भारत या वृत्तपत्रात सुरेख लेख लिहला आहे . त्यांच्या  उत्स्फूर्त लिखाणाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ! 
आजच्या नववर्षाच्या दिवसाची सुरुवात खरेच चांगली झाली .
आपल्या सर्वांचे नववर्षाचे नवे संकल्प , नव्या आकांक्षा  पुर्ण होवोत व येणारे वर्ष आरोग्यपूर्ण ,
आनंदाचे , उत्साहाचे , भरभराटीचे 
करोनामूक्त असावे , स्वच्छ मोकळा श्वास सर्वानां घेता यावा आणि महामारी कायमची निघून जावी हीच शुभेच्छा !
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सुनील काळे
9423966486

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड =Part 2

दूरदेशीची मैत्री - पार्ट 2 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝           24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम ...