गुरुवार, ७ एप्रिल, २०२२

मूर्त का अमूर्त ?

मूर्त का अमूर्त ?

            आपल्या या छोट्याशा आयुष्यात कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची माणसे भेटत असतात . काही जण मित्र म्हणून येतात तर काहीजण नातेवाईक म्हणून आयुष्यात येतात.  त्यातील थोडे रसिक असतात तर काही जण अरसिक . ते जसे असतात तसे त्यानां स्विकारावेच लागते . फक्त त्यांची एकदा खरी पात्रता कळाली की त्यांना जवळ किंवा दूर करण्याचे स्वातंत्र्य आपल्याला असते . 
           तर सांगायचे कारण म्हणजे माझा एक नातेवाईक आहे. त्याला कोणत्याच विषयाची आवड नाही . चित्रकला , शिल्पकला , नाटक , सिनेमा , वाचन , लिखाण किंवा इतर कोणत्याही कलांशी त्याचे सोयरेसुतक नसते . त्याचे कारण विचारले की तो म्हणतो मी म्हणजे सामान्य माणूस . सरकारी नोकरी मिळाली होती , ती इमानेइतबारे केली त्यामूळे कशाची आवडच निर्माण झाली नाही असे त्याचे उत्तर असते . आणि कोणतीही कला समजून घेण्याचे तो शिताफीने टाळतो पण अनेक गोष्टींवर वादविवाद मात्र नक्की करतो .
            एकदा माझे एक चित्र पाहून हे  मूर्त आहे का अमूर्त ? असा सतत प्रश्नांचा भडिमार त्याने सुरु केला होता . आज त्याच एका चित्राची गोष्ट थोडी विस्ताराने सर्वानां सांगतोय .
           चित्रकलेत जलरंग हे माध्यम बऱ्याच जणानां अवघड वाटते कारण त्यात चुका दुरस्त करता येत नाहीत .पण मला मात्र या माध्यमाचे हेच वैशिष्ट्य महत्वाचे वाटते व ते आव्हानच मला नेहमी नवे चित्र काढण्यास प्रेरीत करते . भारतात जलरंगातील चित्र काढण्याचा कागद 22 इंच बाय 30 इंच आकाराचा असतो त्यापेक्षा मोठा पेपरसाईज मिळत नाही . त्यासाठी मी फ्रान्सचा आर्चेस नावाचा अॅसिड फ्री पेपर वापरतो . तो 45" इंचाच्या रोलमध्ये मिळतो . हवा त्या साईजमध्ये कट करून वापरता येतो . असाच एक 
45" x 81" आकाराचा मोठा पेपरचा तुकडा माझ्याकडे शिल्लक उरला होता .
            या कागदावर मी पूर्वतयारी न करता सहजपणे चित्र काढण्यास सुरूवात केली . संपूर्ण पेपर भिजवला आणि आकाशाची पार्श्वभूमी पूर्ण केली . मला पाचगणीचे टेबललॅन्डचे पठार व सिडने पॉईंटचा परिसर आठवत होता त्यामुळे ते ठरवून मी दृश्य रंगवायला सुरुवात केली आणि अचानक मनात कोकणातील हर्णे बंदराच्या परिसरातील एक वेगळीच  दृश्यमालीका मला आठवू लागली . एकदा कोकणात रात्री उशीरा समुद्रकिनारी फिरत होतो . बंदरावर दोन मोठ्या आकाराच्या अक्राळविक्राळ बोटी उभ्या होत्या . त्या नुकत्याच मोठा प्रवास करून मासेमारी करून आल्या होत्या . मग स्थानिक व बाहेरच्या विकत घेणाऱ्या मोठ्या व्यापाऱ्यांची बोलणी व लिलाव सुरु झाले . ज्यांनी लिलाव घेतले त्यांनी ते छोट्या व्यापाऱ्यांना विक्री करण्यास सुरुवात केली . मोठा जल्लोष व उत्साह भरला होता वातावरणात . लगबिगीने कोळीजमातीचे बांधव त्यांच्या कासोटा घातलेल्या बायका डोक्यावर टोपल्या, हातात कंदील किंवा बॅटरी घेऊन मासे भरत होते . मोठ्या बोटीने दोरी बांधून छोट्या बोटीत मासे उतरवत होते . बोटीवरच्या इंजिनमूळे रंगीत लाईटी चमकत होत्या , समुद्राच्या लाटा उसळत होत्या त्याचा तो वेगळा नादभरलेला घनगंभीर आवाज मला ऐकू येत होता . एका वेगळ्याच विश्वात मी रममाण झालो होतो. डोळे व मन जणू चित्रपट पाहत असल्यासारखे सगळी दृश्ये स्मृतीपटलावर चित्रित करण्यात व्यस्त झाले होते .
            हे सगळे विचार डोक्यातून कागदावर सहज मुक्तपणे रंगाद्वारे  उमटत होते . आणि हे आकार आपोआप माझ्या कळतनकळतपणे कागदावर दृश्यरूपाने आपआपली जागा पकडत होते. कोळ्यांचा हा जीवनप्रवास मला रंगीत वाटला मग चित्राच्या शेवटी मी छोट्या वेगवेगळ्या लाल , पिवळा , हिरवा , जांभळा , भगवा , काळा , पांढरा ,अशा रंगीबेरंगी तुकड्यांनी रंगवून चित्राचा शेवट पूर्ण केला .
अर्ध्या एक तासात एक वेगळीच कलाकृती दृश्यरूप घेऊन पूर्ण झाली . 
मी Mojarto art.com या वेबसाईडवर ती कलाकृती विक्रीसाठी ठेवली  व इतर कामात विसरूनही गेलो.काही दिवसांनंतर ते चित्र विकले गेले . 
          खूप दिवसानंतर केरळच्या एका अज्ञात माणसाचा फोन आला . ज्याने ते चित्र विकत घेतले होते व आता तो परदेशात स्थायिक झालेला होता. त्याने बऱ्याच प्रयत्नाने  मला शोधून खूप उशीरा रात्री फोन केला.
           कित्येकवर्ष  केरळात समुद्रकिनारी घालवलेले माझे सगळे बालपण ,तरुणपण व म्हातारपण मला त्या चित्रात दिसले . खूप खूप आनंद झाला .

            ते चित्र मूर्त आहे की अमूर्त ? हा प्रश्नच मला पडला नाही .

            " तुमचे हृदयापासून काढलेले चित्र माझ्या हृदयापर्यंत पोहचले " .

आणि त्याने फोन ठेवला .

चित्र , शिल्प , गायन  , लेखन , कविता , चित्रपट , फोटोग्राफी , नृत्यकला किंवा इतर कोणतीही कला असो . ती कधी भावते ?
           जेव्हा एक कलाकार हृदयापासून कलानिर्मिती करतो त्यावेळीच . त्या कलाकृतीतील आकार , रंग , रेषा ,पोत , विषयाची मांडणी अगदी सहजपणे दुसऱ्या माणसाच्या हृदयापर्यंत  पोहचते , ती कलाकृती मनातल्या भावभावनांना , पंचइद्रियांना तृप्त करते . अगदी मन व शरीराच्या सर्व रंध्रारंध्रात  शिरून सगळीकडे चिरंतन शांतता , पूर्ण व तृप्तीचे समाधान निर्माण करते . एक अनामिक बेभान मंत्रमुग्ध वातावरण मनात निर्माण करते .  त्यावेळी भांडत बसायचे नसते . फक्त समजून घेत घेत पंचइंद्रियांनी 
त्या कलाकृतीचा फक्त आस्वाद घ्यायचा असतो .
मग अशावेळी मूर्त का अमूर्त हा प्रश्नच निर्माण होत नाही . 
कारण तो प्रवास असतो
 
हृदयापासून हृदयापर्यंत . . . . . . . . . . . .
हृदयापासून हृदयापर्यंत . . . . . . . . . . . . 

💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞

सुनील काळे
9423966486

शनिवार, १५ जानेवारी, २०२२

सीमा स्वामी यांचा फोटोग्राफीचा ध्यास

*सीमा स्वामी यांचा फोटोग्राफीचा ध्यास*
📷📸📷📸📷📸📷📸📷📸📷📸📷
           आपल्यापैकी प्रत्येकालाच आयुष्यामध्ये  कसले कसले तरी अनोळखी  कॉम्प्लेक्स मनात तयार झालेले असतात.  मनाला या कॉम्लेक्सची  सतत जाणीवही होत असते . मी  कधी  फोटो काढायला  उभा राहिलो की मला नेहमी असे वाटत राहते की आपली पोझ नेमकी कशी असली पाहिजे ? आपले दोन्ही हात नेमके कसे ठेवावे ? चेहऱ्यावर ते सुंदर सुहास्य कसे आणावे ? सरळ उभे राहावे की जरा स्टाईलमध्ये उभे राहावे ? उजवा पाय पुढे ठेवावा की डावा ? डोळ्याने समोरच्या फोटोग्राफरकडे सहज बघावे की रोखून बघावे ? आपले केस विस्कळीत तर झाले नसतील ना? आपण कपडे जरा ठेवणीतले इस्त्री केलेले  घातले पाहीजे होते का? जरा दाढी करून फोटो काढले असते तर अजून भारी आले असते का? 
आपला चेहरा फोटो चांगले येण्यासाठी पर्सन्यालीटीत जरा अजून काही सुधारणा करता येईल का ? असे नाना  प्रश्न मला पडत असतात . 
   शेवटी मग हे फोटो काढणेच टाळतो .     मग बऱ्याच वेळा मनात एक शल्य राहून जाते की अनेक मित्र मैत्रिणी व प्रसिद्ध मान्यवरांच्यांबरोबर  माझे फोटो आठवण म्हणून तरी काढायचेच राहून गेले आहेत .
          लॉकडाऊनच्या काळात एकदा केस कापायचे बरेच दिवस राहून गेले . मग संधी मिळताच केशकर्तनालयात गेलो .त्या नेहमीच्या तरुण कारागिराकडे मी केस कसे समुद्राच्या लाटांप्रमाणे कानावर येऊन वाकडेतिकडे पसरतात याची तक्रार करत होतो . त्याने माझी बडबड शांतपणे ऐकली व डोक्यावरची टोपी काढली . सर , तुमच्या डोक्यावर या वयात केस आहेत हेच नशीब समजा ,आमचे बघा . मी पहिल्यांदा त्याला टोपी नसताना पाहत होतो. त्याच्या डोक्यावरचे केस पुर्णपणे विरळ झाले होते . तुमच्याकडे केसाचे डोक्यावर चांगले टोपले उगवत असताना उगाचच तक्रार करत बसता .
            त्यानंतर मी कधी त्याच्याकडे व इतरांकडेही कसलीही तक्रार केली नाही. त्याचे दुःख मला चांगलेच समजले होते. माणसाला आपल्याकडे जे नसेल त्याचेच  दुःख उगाळत बसायची सवय लागली आहे . त्यामूळे मनुष्यप्राणी सतत तक्रार करत राहतो याचा मला नव्याने चांगलाच शोध लागला . आणि हो ,आपण सगळे जण नेहमी फक्त वरचा क्लास पाहतो आपल्यापेक्षा खाली पाहिले तर कितीतरी जणांकडे आपल्याकडे असणाऱ्या पण त्यांच्याकडे नसणाऱ्या गोष्टींची उणीव समजते . खरं तर या उणीवांची जरा सर्वानीच जाणीव ठेवली पाहीजे असे मला वाटत राहते . 
       आपण जसे आहोत , जसा आपला बांधा , जसे आपले रंगरूप , जशी आपली उंची , शरीराची  व चेहऱ्याची ठेवण आहे त्याचा स्विकार करायला पाहीजे . इतर जणांशी तुलना करत बसलो की पदरी आणखी घोर निराशा येते . त्यामूळे तुलना करणेच सोडून दिले पाहीजे  याची वयोपरत्वे  जाणीव मला प्रकर्षाने होत गेली. त्यामूळे मी आता बिनधास्तपणे फोटो काढत असतो .
        काही दिवसांपूवी कराडला मित्राच्या मुलांच्या लग्नासाठी गेलो होतो . येताना रात्री उशीर झाला म्हणून साताऱ्यात आमच्या नरेन्द्र रोकडे या मित्राकडे मुक्काम झाला . नेहमीप्रमाणे भरपूर गप्पा झाल्या व दुसऱ्यादिवशी सकाळी परत निघालो तर पहिल्या मजल्यांवरून सीमा स्वामींचा चहा घेऊन जा ! असा प्रेमळ आदेश आला .
              सीमा स्वामींची ओळख करून द्यायची म्हणजे त्या उत्तम फोटोग्राफी करतात . त्यांचा स्वतःचा सर्व साधनसोयीयुक्त स्टुडीओ आहे . त्या स्वतः फोटोग्राफरचे मस्त जॅकेट घालून सातत्याने प्राणी , पक्षी , फुले , किटक अशा निसर्गाच्या विविध घटकांचा अगदी सुक्ष्म मायक्रोलेन्स लावून सतत फोटोग्राफी करत असतात . अतिशय साधे दुर्लक्षित वाटणारे विषय त्यांच्या लेन्समधून असे फक्कड ,अनोळखी , अद्भूत रुप घेऊन सजीव होतात की फोटो बघणारा स्तिमितच होत जातो . एका वेगळ्या विश्वात हरवतो . त्या सामान्य दृश्याला अलौकीक असे असामान्यत्व प्राप्त होते .
            आपली फोटोग्राफीची पॅशन आपण स्वत:च कशी डेव्हलप केली त्याची माहीती सांगताना त्याच्यांकडे छान उत्साह असतो. त्यांचे मिस्टर प्रसाद हे सध्या पुण्यात सरकारी नोकरीत उच्च पदावर कार्यरत आहेत . मुलगी मुक्ता आता अहमदाबादला शिकत आहे. पण सर्व सुविधा असल्यातरी मनात हा विचार येत असे की आपण काहीतरी केले पाहीजे . आपल्या उच्चशिक्षणाचा उपयोग  प्रत्यक्ष नोकरी करत किंवा घर सांभाळत राहण्यापेक्षा एखादी वेगळी कला जोपासण्यासाठी ध्यास घेतला पाहीजे .  २००९ साली त्यांच्या आयुष्यात त्यानां एका खडतर प्रसंगाला सामोरे जावे लागले . मोठ्या धीराने त्या प्रसंगाला सामोरे गेल्या . स्वतःला व कुटूंबाला सावरले या सावरण्याच्या प्रक्रियेतच त्यानां त्यांच्यातील कलागुणांची जाणीव झाली .  स्वतःला सावरत असताना त्यानां फोटोग्राफीची आवड निर्माण झाली . त्यानंतर सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या जीवन सुरळीत सुरु झाले असताना त्यांनी खास फोटोग्राफीचा छोटा कोर्स पूर्ण करुन सखोल एकलव्या प्रमाणे ध्यास घेऊन अभ्यास सुरु केला .  
         आज त्यांच्याकडे पोट्रेट , स्टील फोटोग्राफीसाठी लागणारी सर्व प्रकारची उपकरणे उपलब्ध आहेत .उत्तम पद्धतीचे कॅमेरे व स्टुडीओ उपलब्ध आहेत . फोटोग्राफीचे क्लासेस सुरु करून आपले मिळविलेले ज्ञान सर्वांपर्यत पोहचविण्याची त्यांची इच्छा व प्रयत्न  आहे .
            एखाद्याकडे रंग , ब्रश , पॅलेट , इझल असले म्हणजे ती व्यक्ती चित्रकार होत नाही , एखाद्याकडे उत्तम महागडे पार्करचे पेन असले म्हणजे कोणी लगेच लेखक होत नाही . तसेच हातामध्ये महागडा मोबाईल आला म्हणून कोणी उत्तम फोटोग्राफर होत नाही . कारण या सर्व कलाप्रकारांमध्ये लागतो तो म्हणजे तिसरा डोळा . सतत निरिक्षण व नाविन्याचा शोध घेत राहणारे मन . या मनाला उर्जा निर्माण करणारी अविश्रांत परिश्रमाची जोड लागते . नव्या तंत्रज्ञानासोबत मैत्री करण्याची आवड आणि परिश्रम करण्याची उर्जा त्याच्यांकडे विपूल प्रमाणात आहे .
             आपला हा फोटोग्राफीचा छंद जोपासत त्यांनी अनेक देशी विदेशी स्पर्धांमध्ये भाग घेऊन मानाचे अनेक
 पुरस्कार मिळवलेले आहेत . अनेक मान्यवरांनी त्यानां सेमिनार्स व वर्कशॉप्स ला मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले आहे . अनेक नव्या फोटोग्राफर तरुण तरुणींचे ते प्रेरणास्थान बनत आहेत .
         चहा पानाचे आमंत्रण देत असतानाच त्यांनी त्याचां वजनदार कॅमेरा आणला व स्टुडीओत नेऊन स्वाती व माझे अनपेक्षितपणे एक फोटोसेशनच सुरु केले . कोणतीही मानधनाची अपेक्षा  नसतानाही आपल्या हातात कॅमेरा आल्यावर त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणखी सुंदर , प्रभावी कसे होईल याचा अंदाज घेत घेत त्यांनी आमचे एकत्रित व स्वतंत्र अनेक फोटो घेतले . आणि आयुष्यात लग्नानंतर  प्रथमच आमचे फोटोसेशन सीमा मॅडममूळे पार पडले . मी तर फार भारावून गेलो होतो .
           सीमा मॅडम उत्तम कलात्मक फोटोग्राफी करणाऱ्या  कलाकार तर आहेतच पण त्यापेक्षा माणुसकी व मित्रत्व जपणाऱ्या आहेत. प्राणीप्रेमी आहेत. घरातली कर्तव्ये पूर्ण करत स्त्रीयांनी आता सर्वच क्षेत्रात यशस्वी पदार्पण केले आहे . अनेक जणींनी निवडलेल्या , स्विकारलेल्या ,आवडलेल्या क्षेत्रात  मोठी झेप घेऊन स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले आहे . सीमा स्वामी देखील अशीच एकलव्यासारखी मोठी झेप घेऊन त्यांचे कर्तृत्व सिद्ध करतील अशी खात्री वाटते .
     त्यानां भविष्यातील फोटोग्राफीतील उज्ज्वल प्रकल्पांसाठी खूप खूप शुभेच्छा !💐💐त्यांचे फोटो पाहण्यासाठी खाली लिंक दिल्या आहेत . जरूर पहा . तुम्हाला नक्की आवडतील .
 https://www.facebook.com/seema.swami
 
https://www.seemaswami.com/

https://instagram.com/seema_swami?utm_medium=copy_link

📸📸📸📸📸📸📸📸📸📸📸📸📸
सुनील काळे
9423966486

संकल्प

* संकल्प *     
🎨🖌️🎨🖌️🎨🖌️🎨🖌️🎨🖌️🎨🎨🖌️🎨🖌️🎨🖌️🎨🖌️🎨🖌️🎨🖌️🎨🖌️🎨
         "नवीन वर्षाची सुरुवात होते म्हणजे नेमके काय होते ? तर 31 डिसेंबरला शेवटच्या दिवशी वर्षाची सांगता होते व नव्या कॅलेंडर्सची तारीख सुरु होते .येणारा सुर्य नेहमीप्रमाणे रोजच्या रोज उगवणार असतो आणि  संध्याकाळ झाली की मावळणार देखील असतो. मग परत एकदा रोजचे  रुटीन सुरु होते . आलेला दिवस नेहमीप्रमाणे व्यस्त किंवा स्वस्थ रुटीनप्रमाणे संपतो . नवीन वर्षाची ती नवी नवलाई , नव्याची उत्सुकता आणि मनात ठामपणे ठरवलेले नवनवे संकल्प देखील आपण हळुहळू पूर्णपणे सराईतपणे विसरूनही जातो. सर्वांप्रमाणे मी सुद्धा दरवर्षी काही तरी नवा संकल्प करायचो तो पुर्णत्वास नेण्याचा कसून प्रयत्न करतो . पण गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीने अशी काय विचित्र परिस्थिती निर्माण केली की सगळे संकल्प गुंडाळून ठेवावे लागले . मनातले कितीतरी चांगल्या संकल्पानां , चांगल्या गोष्टीनां मुठमाती द्यावी लागली .
       पण कधीकधी हे मनाशी ठामपणे ठरवलेले संकल्प पूर्ण केल्याचे मला आठवतात . आज अशाच एका पूर्ण केलेल्या संकल्पाची आठवण झाली .
        आपल्या आयुष्यात भेटणारे वेगवेगळे लोक व काही भारी गुरु असे भेटतात की त्यानां उभ्या आयुष्यात विसरताच येत नाही . 
        खूप वर्षांपूर्वी १२वी सायन्स शिकत असतानाच मला चित्ररेखाटनांचा नाद लागला. मी अनेक स्केचेस व चित्र रेखाटत होतो पण मला तंत्र माहीत नव्हते . कोणता कागद घ्यावा ? कोणती पेन्सील वापरावी ? त्या माध्यमांचा वापर करून स्केच प्रभावी कसे करावे ? याची मला माहीती नव्हती त्यामूळे  सतत प्रश्न पडायचे .
          चित्रकलेच्या कॉलेजला जाण्यासाठी इंटरमिजिएटची परिक्षा द्यायला पाहीजे हे मला कळाले . पाचगणीत इतक्या शाळा असूनही चित्रकला परिक्षेचे केन्द्र नव्हते .वाईला द्रविड हायस्कूलमध्ये ते आहे याची मी माहीती काढली . परिक्षेचा फॉर्म भरायला गेलो त्यावेळी प्रथमच द्रविड हायस्कूलची आर्ट रूम पाहीली . एका कोपऱ्यात प्रशस्त मोठी खोली आणि त्या खोलीभर व्यवस्थित लावलेली मुलांची चित्रे . वर्गाबाहेर प्रवेशद्वारावर स .कृ काळे यांचे ऑईल कलरमधील जुने मुख्याध्यापक ढवळीकर सरांचे सुंदर व्यक्तिचित्र लावलेले होते  . वर्गामध्ये आत प्रवेश करतानाच फळयाच्या वर भलेमोठे १२ फूटी निसर्गचित्र लावलेले असायचे. या सर्व चित्रांमध्ये मला अजूनही लक्षात असलेले चित्रकलाशिक्षक सु .पि .अष्टपुत्रे यांचे एक चित्र होते . 
           रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार वडाची मोठी झाडे , त्या वडाच्या झाडाच्या अवाढव्य मोठ्या  फांद्या , जाडजूड बुंधे त्या झाडाच्या दूरवर पसरलेल्या सावल्या व त्या सावल्यांमधून दोन तीन डौलाने चाललेल्या बैलगाड्या होत्या .त्या बैलगाड्यांवरचे शेतकरी कुटूंब मजेने प्रवास करत होते . त्या तैलरंगातील चित्राने माझ्या मनाचा ताबा घेतला . मी पूर्णपणे विसरूनच गेलो होतो स्वतःला . त्या चित्राखालची मराठीतील सही होती सु .पि. अष्टपुत्रे .
         मग मी अष्टपुत्रे सरांचा मनातून चेला झालो. त्यांचे मार्गदर्शन मिळावे म्हणून सतत द्रविड हायस्कूलला जाऊ लागलो . माझी चित्रे दाखवू लागलो सतत नवी चित्रे दाखवूनही गुरुवर्य अष्टपुत्रे सर काही प्रसन्न होईनात . मग मी त्यानां मला मार्गदर्शन करावे अशी इच्छा व्यक्त केली, शिष्यत्व पत्करणाची तयारी दाखवली . नवीन वर्षाचा पहिला दिवस गाठून त्यांच्यापुढे दोन्ही हात जोडून नतमस्तक झालो .
           माझा नव्या वर्षाचा ,नवा सळसळता  उत्साह ,संकल्प पाहून अष्टपुत्रेसर मात्र भयंकर गंभीर झाले व शांतपणे  म्हणाले " असे कर मित्रा , तु मला यापुढे एका वर्षानंतरच भेट . आजचा दिवस मी माझ्या डायरीत लिहून ठेवतो व तू पण तुझ्या  डायरीत लिहून ठेव. बरोबर एक वर्षानंतर भेटू . पण भेटण्यापूर्वी तू एक काम करायचे . प्रत्येक दिवशी एक तरी स्केच किंवा चित्र काढायचेच , ज्या दिवशी चित्र काढले नाही तर त्यादिवशी झोपायचे नाही . एकतरी चित्र पुर्ण करायचेच मगच झोपायचे . अशी ३६५ दिवसांची ३६५ चित्रे पुढच्या जानेवारीच्या एक तारखेला घेऊन ये . आणि हो ,चित्रे काढलीस तरच भेटायला ये अन्यथा येऊ नकोस . "
            एखाद्या विद्यार्थ्याला कटवायची सरांची स्टाईल बघून मी मात्र मनातून जाम नाराज झालो थोड़ा निराशही झालो. त्यावर्षी मला वाईला इंटरमिजिएटला  A ग्रेड मिळाले व मी कोल्हापूरला कलानिकेतन महाविद्यालयात प्रथम वर्ग फौडेंशनला दाखल झालो . पण मनातून मी अष्टपुत्रेसरांचे चॅलेंज स्विकारले होते . मनात एक  ' संकल्प ' ठामपणे  तयार झाला होता .मग नित्यनियमाने रोज एकतरी जलरंगातील छोटे निसर्गचित्र , किंवा पेन्सीलस्केच करायचो . मार्गदर्शनापेक्षा ध्यास महत्वाचा असतो हे मला नव्याने कळत होते . एक चुक पुन्हापुन्हा करायची नाही . तसा मी रोज चुकत होतो पण पुन्हा नव्याने स्वतःला घडवत होतो . आपल्या चुका सुधारत सुधारत पुन्हा नव्याने घडत राहणे ही खरी कलाशिक्षणाची पायरी असते .
         अशी सगळी ३६५ चित्रे त्या वर्षी प्रत्येक दिवसाची तारीख टाकून मी तयार केली . पण वर्षाच्या शेवटी मी अष्टपुत्रे सरानां भेटायला गेलोच नाही . कारण माझा मलाच  नव्याने शोध लागला . त्यांच्या शेजारी बसून मला प्रत्यक्ष चित्रकाम पाहता आले नाही पण अप्रत्यक्षपणे माझ्या कृतीमधून मलाच खूप मार्गदर्शन मिळाले होते . मीच माझा गुरु झालो होतो. चित्रे कोणीतरी काढायला सांगतो म्हणून निर्माण करायची नसतात तर चित्रे ही आपली आंतरिक भूक असायला हवी . रोज पोटाला जशी भूक लागते मग आपल्याला चित्रांची भूक रोज लागते का ? असे प्रश्न पडायचे .
चित्र सांभाळावी लागतात ,त्यांची जपणूक हळूवारपणे आपल्या मुलांपेक्षा जास्त नाजूकपणे करायला हवी कारण तेथे आपला जीव ओतून वेळ घालवलेला असतो . चित्रांचा ध्यास आतूनच घ्यायला हवा . चित्रनिर्मितीची प्रोसेस कोणाला इंप्रेशन मारायची गोष्ट नसते . चित्र काढताना आपण काळ वेळ भान हरपून जातो , ती निर्मितीची अवस्था म्हणजेच ध्यानाची अवस्था असते . आपण कार्यरत असलेल्या कलाप्रकारात किंवा नोकरीत किंवा व्यापार ,उद्योगधंदयाच्या सरकारी किंवा निमसरकारी , प्रायव्हेट शिक्षण , वकीली , वैद्यकिय किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात जरी कार्यरत असलो तरी त्यामध्ये ' सातत्य ' हवे धरसोड वृत्ती नको . जीवनामध्ये  प्रत्यक्ष शिकवणारा गुरु मिळाला तर ठिकच ,नाही समजा नाही मिळाला तर एका मोठ्या गुरुला नेहमी शरण जावे . जो सतत शिकवायला तयार असतो त्याचे नाव  " निसर्ग " . हा निसर्ग गुरु कोणालाही शिकवायला कधीच नकार देत नाही . आणि दुसरा गुरु म्हणजे ' अनुभव ' या येणाऱ्या  अनुभवातून आपण सतत नवीन शिकण्याच्या प्रोसेसमध्ये राहतो . 
आणि न कंटाळता सतत नवीन गोष्टी प्रामाणिकपणे शिकत राहण्याची प्रोसेसच आयुष्यात खूप महत्वाची ठरते , खूप खूप शिकायला मिळते .
            करोनामूळे प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन चित्र काढण्याचे दोन वर्ष झाले जमलेच नाही . त्यात पायाचा अपघात व करोनाचा आजार यात वर्ष कसे निघून गेले ते समजलेच नाही.
         आज नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रत्यक्ष ऑन द स्पॉट चित्र रेखाटण्यासाठी वाईला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या प्राज्ञपाठशाळेची निवड केली . या वाड्यात कितीतरी वेगवेगळ्या क्षेत्रातील संशोधक , दिग्गज , हुशार ,अभ्यासू ,महान , साहित्यिक , चित्रकार , लेखक , यांचा मुक्काम असायचा . तर्कतीर्थांच्या स्पर्शामुळे पावन झालेली ही वास्तू आज आतून मोडकळीस आली आहे पण ती इमारत बाहेरून खंबीरपणे उभी आहे . तिच्या अनेक छोट्या ,मोठ्या खिडक्या , जुन्या वीटांची मांडणी व मोठमोठ्या दगडांचा भारदस्त पाया मला चित्र काढण्यास खुणावतो . आज जाणवते विविध क्षेत्रातील कलांचा पाया म्हणजे सततचा ' सराव ' हा महत्वाचा आहेच पण खरा ' ध्यास ' ही तितकाच महत्वाचा . आणि त्या सरावामूळे कामात सुधारणा होत ' सहजता ' येत जाते .
           
        चित्र पूर्ण करून घरी आल्यानंतर जे.जे स्कूल ऑफ आर्टचे श्री. गजानन शेपाळ यांचा मेसेज पाहीला .काही दिवसांपूर्वी त्यांनी सहकुटूंब आमच्या स्टुडीओला सदिच्छा भेट दिली होती . त्यांनी तरुण भारत या वृत्तपत्रात सुरेख लेख लिहला आहे . त्यांच्या  उत्स्फूर्त लिखाणाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ! 
आजच्या नववर्षाच्या दिवसाची सुरुवात खरेच चांगली झाली .
आपल्या सर्वांचे नववर्षाचे नवे संकल्प , नव्या आकांक्षा  पुर्ण होवोत व येणारे वर्ष आरोग्यपूर्ण ,
आनंदाचे , उत्साहाचे , भरभराटीचे 
करोनामूक्त असावे , स्वच्छ मोकळा श्वास सर्वानां घेता यावा आणि महामारी कायमची निघून जावी हीच शुभेच्छा !
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सुनील काळे
9423966486

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड =Part 2

दूरदेशीची मैत्री - पार्ट 2 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝           24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम ...