सोमवार, ३१ मे, २०२१

ग्रीन टाय

                                           




                                           ग्रीन टाय    

आयुष्य मोठे गमतीशीर असते, किती तरी अकल्पित,नावीन्यपूर्ण, रोमांचक , सुखाच्या, दुःखाच्या घटना आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात रोज घडत असतात.... आणि विशेष म्हणजे प्रत्येकाचे रोजचे जगणेही वेगवेगळे असते.... एकासारखे दुसऱ्याचे जगणे साचेबंद नसते.

        अशा या आयुष्यात कधीकधी वाईट प्रसंगाची मालिकाच सुरु होते, आणि चांगला कणखर दिसणारा माणूसही निराशेच्या गर्ततेत खोलवर रुतत जातो . काही माणसं चेहऱ्यावर हुशारीचा आव आणत असतात पण मनातून मात्र कोलमडून एखाद्या वटवृक्षाप्रमाणे उन्मळून पडलेली असतात.............. असा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येतोच की खूप झाले जगून, आता नको जगायला यापुढे...... माणसं कबूल करत नाहीत पण आतून त्यांना या प्रसंगाची आठवण धगधग मनात साठलेली असते .

          1995 साली मी मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये चित्रप्रदर्शन केले होते आणि ते सर्व प्रकारे विशेषतः व्यावसायिक स्तरावर यशस्वी झाले . त्याकाळात मी नालासोपारा येथे राहायचो. माझी नोकरी केमोल्ड कंपनीच्या फ्रेमिंग डिपार्टमेंटमध्ये असल्याने कंपनीच्या लोअर परेल, प्रिन्सेस स्ट्रीट, वसई आणि जहांगीर आर्ट गॅलरी येथे मला रोज जायला लागायचे .सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत मी थकून भागून घरी परत यायचो. माझं हे रोजचं रुटीन झालं होते त्या रुटीनला आणि त्या भयानक गर्दीच्या रेल्वे प्रवासाला मी मनापासून कंटाळलो होतो. रोज जगण्याऐवजी मी रोज मरत चाललोय ही भावना खूप खोल ठसली होती माझ्या मनात....

            मला वाई  पाचगणी ,महाबळेश्वर चा निसर्ग खूप आवडायचा म्हणून मी परत कायम मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला. पाचगणी मध्ये मला चित्र विक्रीसाठी आर्ट गॅलरी तयार करायची होती या आर्ट गॅलरीच्या ध्येयासाठी मी बेफाम झालो होतो, मी मनापासून प्रयत्न करत होतो. शेवटी सिडने पॉईंटच्या जवळ मला एक जुना बंगला भाड्याने मिळाला त्या जुनाट बंगल्याला आर्ट गॅलरी चे स्वरूप देताना माझे सर्व पैसे कसे संपले हे मलाही कळले नाही तरीही जिद्दीने आम्ही आर्ट गॅलरी सुरू केली अतिशय उत्तम प्रतिसाद सर्व पर्यटकांकडून व स्थानिकांकडून आम्हाला मिळत होता. परंतु एका वर्षाच्या आत घरमालकाने फसवले आणि त्याची जागा परत मागितली मी त्याला अनेक विनंत्या करूनही त्याने नकार दिला. त्यामुळे खऱ्या अर्थाने व्यवसायिक रित्या मी पूर्णपणे कोलमडून पडलो. 

त्यानंतर उतरती कळा लागली ...........

            मग नव्या जागांसाठी शोध सुरू राहिला पुढे पाचगणी क्लब, टेबल लँड वरची गुहा, मॅप्रो गार्डन अशा वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न करत राहिलो . प्रत्येक ठिकाणी नवीन अडचण, नवा प्रयोग, नवे इंटेरियर करावे लागायचे. प्रत्येक वर्षी जागा बदलावी लागायची. त्याकाळात मॅप्रो गार्डन येथे उघड्यावर प्लाझा सारखे प्रदर्शन लावले होते. मे महिन्यात एक दिवस अचानक वळवाचा पाऊस वादळासारखा कोसळला आणि सर्व चित्रे, ग्रीटिंग कार्डस, कॅलेंडर, पोस्टर्स, सर्व काही धो धो पावसात भिजून गेले .मॅप्रोचे कोणीही कामगार मदतीस आले नाहीत , त्यामुळे जवळपास 200 प्रत्यक्ष जागेवर जाऊन काढलेली ओरिजिनल जलरंगातील निसर्ग चित्रे पूर्णपणे बेचिराख झाली. ही ओरिजनल चित्रे पावसामुळे पूर्णपणे धूवून गेली. मॅप्रोच्या मालकांनी कोणतीही मदत केली नाही उलट सर्वच्या सर्व चित्रांचा कचरा ताबडतोब उचलला नाही तर दुसऱ्या दिवशी रस्त्यावर टाकला जाईल अशी धमकी दिली........... आणि पूर्ण देखील केली.....आणि जी अवहेलना  केली ती मनाच्या पटलावर एखाद्याने चाकुचे अनेक वार करावे तशी जखम करुन गेली .

अतिशय कष्टाने काढलेली मूळ चित्रे धुळीस मिळाल्यामुळे जगण्याचा आधारच संपला . राहायला घर नाही , जगण्यासाठी पैसे नाहीत , घरातून सकारात्मक प्रतिसाद नाही अशा परिस्थितीत सगळीकडे निराशेच्या अंधाराने मनाला ग्रासून टाकले, मनात काळ्या ढगांची काळीकुट्ट गर्जना सतत येत राहू लागली आणि मग सर्व पसारा आवरून मी मुंबईला गेलो तिथे नालासोपारा येथे माझ्या एकुलत्या एक मुलीचा डॉक्टरांच्या चुकीच्या दिलेल्या इंजेक्शनमूळे मृत्यू झाला आणि खऱ्या अर्थाने मी पूर्णपणे धुळीस मिळालो, पूर्णपणे खचलो.

           आणि मग जगण्यात राम नाही ,मजा नाही सर्व ठिकाणी निराशाच निराशा पदरी पडल्यामुळे मग जगायच तरी कसे ?

कशासाठी ? 

असे संघर्षमय जीवन किती वर्ष जगायचे ? 

सततच्या संघर्षाचाच मला खूप कंटाळा आला म्हणून मी मनातल्या मनात आत्महत्या करण्याचे नक्की केले.

           पाचगणी क्लबच्या समोरच मुख्य रस्त्याला लागूनच छोट्या रस्त्यावर सेंट पीटरचे चर्च आहे त्या चर्चच्या पाठीमागे अँग्लो इंडियन ख्रिश्चन लोकांची दफनभूमी आहे . येथील परिसर अतिशय शांत आणि निसर्गमय आहे.

पाचगणीचा शोध ज्या ब्रिटिश अधिकाऱ्याने लावला त्या जॉन चेसन याची दफन केलेली दुर्लक्षित समाधी येथे आहे. 

माहीत नाही पण आत्महत्या करण्यापूर्वी त्या थडग्याचे दर्शन घेऊन आत्महत्या करण्याचे मी नक्की केले होते 

दुपारी दोनच्या सुमारास मी तेथे पोचलो ज्या माणसाने पाचगणीचा शोध लावला, असंख्य फळाफुलांची ,सिल्वर वृक्षांची झाडे लावली ,कॉफी, बटाटे, स्ट्रॉबेरी यांची लागवड केली, या ठिकाणी पहिला बंगला बांधला या परिसराचा संपूर्ण अभ्यास करून हिल स्टेशनला लागणाऱ्या सर्व सुधारणा केल्या, गाईड बुक लिहिले , ब्रिटिशांच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या त्या महान जॉन चेसनची दफनभूमी मात्र उघड्यावरच अनेक ऊनपावसाळे झेलत मलूल पडलेली होती. गवतांच्या व काट्याकुट्यां मध्ये कधीही साफसफाई नसल्याने नीट दिसतही नव्हती . 

मी थोडी बसण्यासाठी जागा साफ केली व डोळे मिटून जॉन चेसन बरोबर बोलत राहिलो . त्याची व माझी पाचगणीकरांनी केलेली दुर्लक्षित अवस्था सारखीच होती. अचानकपणे डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. या निर्जनस्‍थळी मी पूर्णपणे ध्यानस्थ होऊन एकरूप झालो होतो मला कशाचेही भान राहिले नव्हते कितीतरी वेळ मी तसाच सुन्न बसून होतो आणि .................. अचानकपणे कोणीतरी खांद्यावर हात ठेवल्याची जाणीव झाली ,डोळे उघडले आणि पाठीमागे पाहिले तो माझा मित्र आयझॅक सिंग दिसला . आयझॅकने मला कडकडून मिठी मारली माझे डोळे पुसले माझे सांत्वन केले आणि माझी निराशेची पूर्ण कथा मनापासून ऐकली. 

          आयझॅक पाचगणीत कम्प्युटरचे प्रायव्हेट क्लासेस चालवायचा संगणक व त्याचे शास्त्र याची त्याला खूप माहिती होती. सर्वांना फार प्रेमाने तो शिकवायचा .

मी चित्रकार असल्याने कॉम्प्युटरवर चित्र, स्केचिंग काढायला प्रोत्साहन द्यायचा.

फुकट शिकवायचा आणि एखादे सुंदर स्केच झाले की खूप कौतुक करायचा. सर्वांना अतिप्रेमाने शिकवत असल्यामुळे अनेक देशी, परदेशी विद्यार्थी त्याच्या क्लासमध्ये आवडीने येत असत. तो सतत बिझी असायचा चालताना देखील धावत धावत चालायचा.... आयझॅक खूप गमतीशीर पण विनोदी माणूस होता .

मी सुसाईड करणार असल्याचे सांगितल्यावर त्याने माझे प्रथम खूप मनापासून अभिनंदन केले .................

आणि मला म्हणाला इतक्या प्रचंड संघर्षाने चित्रकलेचे प्रशिक्षण घेतलेस ,पाचगणी परिसरातील असंख्य चित्रे रेखाटलीस चित्रप्रदर्शने केलीस, पण जागेअभावी तुला खूप त्रास झाला त्याचा मी साक्षीदार आहे. चित्रे पावसात भिजली, तुझे खूप नुकसान झाले याचीही मला जाणीव आहे तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नाहीत, तुला यश का मिळाले नाही ? हे मी सांगू शकत नाही तू खूप कष्ट घेतले आहेस त्यामुळे तू आत्महत्या करू नकोस असेही मी तुला सांगणार नाही. पण मी एक तुला विनंती करतो की तुझी जी कला हातामध्ये जिवंत आहे ही तुझ्याबरोबरच संपणार............ तर काही दिवस तू बिलिमोरिया स्कूलमध्ये मुलांना चित्रकला शिकव , तेथे कोणीही कलाशिक्षक नाही त्या मुलांना एलिमेंटरी व इंटरमिजिएट या चित्रकला विषयाच्या परीक्षा द्यायच्या आहेत त्यांना गुरुची (कलाशिक्षकाची ) फार आवश्यकता आहे जर तू सुसाईड करून मरून गेलास तर तुझी कलाही तुझ्याबरोबर मरणार............ '

जर तू ही कला कोणाला शिकवली नाहीस तर या चर्च मधला येशु तुला कधीही माफ करणार नाही .

फक्त एक महिना तु या मुलांना शिकव व नंतर निवांतपणे आत्महत्या कर .

तुला मी अडवणार नाही ..........

पण मी चित्रकला कधी शिकवली नाही, ही शाळा इंग्रजी माध्यमाची आहे माझे अे. टी. डी किंवा ए .एम झालेले नाही. ते शाळेतील लोक मला कसे स्वीकारतील ? हे मला जमणार नाही .. मी कमर्शियल आर्ट शिकलेलो आहे शिक्षण क्षेत्राशी माझा कधी संबंध आला नाही, अशी मी विनंती त्याला केली.

आयझॅक जिद्दी होता त्याने त्याच्या गळ्यातील ग्रीन रंगाची टाय काढली आणि माझ्या गळ्यात घातली. आणि म्हणाला 

"मिस्टर आर्टीस्ट सुनील काळे नाऊ यु आर लुकिंग व्हेरी स्मार्ट आर्टटीचर.. ".............. 

तुला मी वचन देतो की तुला कसलाही त्रास होणार नाही कसलाही इंटरव्यू घेतला जाणार नाही, कसल्याही अटी टाकल्या जाणार नाहीत सकाळचा नाष्टा ,दोन्ही वेळचे जेवण, संध्याकाळचा चहा आणि राहण्यासाठी तुला एक  खोली मिळेल. माणसाला जगायला आणखी काय लागते ? अन्न ,वस्त्र निवारा व जॉब .............तुला जर या सगळ्या गोष्टी मिळत असतील तर हे चॅलेंज तु का स्वीकारू नये ? एक महिन्याचा तर फक्त प्रश्न आहे . शिवाय तु जी आत्महत्या करणार आहेस त्याला मी विरोधही करत नाही मग प्रश्न येतो कुठे ? या जगातून जाण्यापूर्वी अनुभवलेले, शिकलेले सर्वोत्तम ज्ञान तू त्या मुलांना दे एवढीच माझी मागणी आहे .

थोडा शांतपणे विचार केल्यानंतर मलाही त्याचे म्हणणे पटले. 

आपले सर्वोत्तम ज्ञान मुलांना द्यायचे मगच मरायचे .................असे मी ठरवले.

          दुसऱ्या दिवशी बिलिमोरिया स्कूलमध्ये सकाळी हजर झालो .प्राचार्य सायमन सरांनी मला अपॉइंटमेंट लेटर दिले आणि एका छोट्या मुलांच्या वर्गात शिकवण्यासाठी पाठवले.वर्गात प्रवेश केल्यानंतर मला पाहून ती छोटी मुले फार आनंदित झाली त्यांना खूप वर्षांनी आर्ट टीचर मिळाल्यामुळे उत्साह आला होता ती सगळी मुले आणि मुली माझ्या भोवती जमा झाली त्यांची स्वतःची चित्रे, चित्रकलेच्या वह्या ,क्रेयॉन कलरचे बॉक्स दाखवू लागली. मुलांचा उत्साह पाहून मीही खुष झालो आणि त्यांना चित्रकला शिकवू लागलो ,जणू मी माझ्या छोट्या स्वतःच्या मुलीला शिकवत आहे असा भास मला होत होता....... शिकवता शिकवता दोन तास कसे संपले हे मलाही कळले नाही. सायली पिसाळ, आकाश दुबे, उत्सव पटेल , ताहीर अली, अशी अनेक  नावे आजही मला आठवत आहेत. नंतर दुसरा वर्ग ,नवीन तास, नव्या ओळखी नवी उत्सुकता असलेली मुले, त्यांच्या निरागस भावना मला हेलावून गेल्या. नव्याने ओळखीची होत असलेली छोटी मुले व मुली शाळा सुटल्यानंतरही माझ्या खोली भोवती घिरट्या घालत राहिली त्यांना त्यांची नवीन चित्रे दाखवायचा खूप उत्साह असायचा मग मीही त्यांना क्राफ्ट, अरोगामी .चित्रांचे वेगवेगळे विषय उत्साहाने शिकवू लागलो. मीही नियमित त्यांची व्यक्तिचित्रे, स्केचिंग करु लागलो. शशी सारस्वत, संजय अपार सर, दुबे मॅडम, छाया व संजय उपाध्याय, मोहीते सर , नॅथलीन मिस, सुनील जोशी सर ,असे नवीन मित्रही या बिलीमोरिया शाळेत भेटले. अशा रीतीने एक महिना, दुसरा महिना ,तिसरा महिना कसा संपला हे कळलेच नाही..... एक शाळेचे नवे वेगळे विश्व मी अनुभवत होतो ...... हे माझ्यासाठी फार वेगळे जगणे होते. शाळेत मी जरी रोज नवीन शर्ट घालत असलो तरी माझी टाय मात्र एकच होती... आयझॅकने दिलेली  ... ग्रीन टाय.

           अशा रीतीने एक वर्ष संपले आणि मी सेंट पीटर्स या ब्रिटिश स्कूलमध्ये गेलो आणि माझी पत्नी स्वाती बिलिमोरिया स्कूलमध्ये जॉईंट झाली .

         सेंट पीटर्स मध्ये चित्रकला विषयाला खूप प्रोत्साहन मिळत होते मुलं देखील नव नवीन गोष्टी शिकत होती त्याच बरोबर माझी चित्रकला ही नव्याने बहरून येत होती. या नव्या शाळेच्या परिसरातील मी अनेक निसर्ग चित्रे नव्याने रेखाटू लागलो . त्याकाळात माझे चित्रकलेचे प्रदर्शन नेहरू सेंटर , नंतर ओबेराय टॉवर हॉटेल व 2002 मध्ये जहांगीर आर्ट गॅलरी येथे झाले याठिकाणी अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला .माझी आर्थिक स्थितीही सुधारली 2003 साली मी नवीन रो हाऊस घेतले नवा स्टुडिओ बांधला .

सेंट पीटर्स येथे ड्रेस कोड असल्यामुळे भरपूर कपडे घेतले त्यावेळी माझ्याकडे रंगीबेरंगी 80 टाय झाल्या होत्या. आजही त्या आठवण म्हणून माझ्याकडे आहेत .

पण एक टाय मात्र मी प्रेमाने जिव्हाळ्याने कायमची जपून ठेवलेली आहे .

ती म्हणजे आयझॅक सरांची  *ग्रीन टाय.*

        मी कधीही दुःखी आणि निराशेच्या गर्तते मध्ये असलो की मला आयझॅकची आठवण येते. आता आयझॅक अमेरिकेत असतो त्याने आता लग्नही केलेले आहे .फेसबुकवर अधून मधून भेटत असतो. मी कितीही श्रीमंत झालो, माझी परिस्थिती सुधारली ,बिघडली तरी एक गोष्ट मी त्याला कधीही परत करणार नाही ती म्हणजे *ग्रीन  टाय .*  कारण ती टाय मला स्वतःलाच कधीकधी आयझॅक बनवते. माझ्याकडे कितीतरी कलाकार मित्र येत असतात .काही नवीन शिकणारी असतात, काही निराश झालेले असतात ,काही उमेद हरवलेले कलाशिक्षक असतात, अनेक गोष्टींच्या तक्रारी करत असतात त्यानां मार्ग सापडत नसतो अशावेळी मी काळे सरांच्या ऐवजी आयझॅक होतो नव्हे आयझॅक सर संचारतो माझ्यात............. ज्या ज्या वेळी अशी निराशेने ग्रासलेली , व्यथित, दुःखी माणसे मला भेटतात त्यावेळी आपण प्रत्येकाने आयझॅक झाले पाहीजे असे माझे आंतरमन मला नेहमी सांगत असते, कारण त्याची *ग्रीन टाय* सतत मला आठवण करून देते.

            जीवन हे आत्महत्या करून संपवण्यासाठी नसते तर आपल्यातील सर्वोत्तम देण्यासाठी, सर्वोत्तम जगण्यासाठी ,सर्वोत्तम शिकण्यासाठी, सर्वोत्तम पाहण्यासाठी, सर्वोत्तम शिकवण्यासाठी , सर्वोत्तम ऐकण्यासाठी असते.सुदैवाने असे अनेक आयझॅक मला वेळोवेळी भेटत गेले. आणि माझे आयुष्य समृद्ध करत गेले. एकवीस वर्ष झाली आता या घटनेला, आत्महत्या करायचे तर मी कधीच विसरून गेलो आहे. 

          असे अनेक आयझॅक आपल्याला वेगवेगळ्या नावाने, वेगवेगळ्या रुपात भेटत असतात. कधी भेटले नसले तर तुम्हालाही असा आयझॅक भेटावा व एक *ग्रीन टाय* मिळावी किंवा तुम्हीच कोणाचे तरी आयझॅक व्हावे आणि त्या निराश माणसाला एक ग्रीन टायसारखी वस्तू द्यावी म्हणजे 

निराशेचा अंधार कायमचा दुर व्हावा....म्हणून 

खूप खूप शुभेच्छा !                       

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

तर अशी  आहे माझी  ग्रीन टायची आठवण..... 

मला सतत प्रेरणा देणारी........


सुनील काळे

9423966486 .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड =Part 2

दूरदेशीची मैत्री - पार्ट 2 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝           24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम ...