कोल्हापूरचे निसर्गचित्रकार - एस. निंबाळकर
🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨
आपण कोणत्या गावात , कोणत्या जिल्हयात , कोणत्या घरात , कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसते . निसर्गाने किंवा सृष्टीकर्त्या विधात्याने तो चॉईस माणसाला दिला नाही . पण समजा तसा चॉईस मला मिळाला असता अशी ज्यावेळी मी मनातल्या मनात कल्पना करतो त्यावेळी एक जिल्हा मला हमखास आवडतो त्या जिल्ह्याचे नाव आहे कोल्हापूर . कोल्हापूर खरं सांगायचे तर सर्वार्थाने कलापूर आहे . अशा या कलापूरात अपघाताने अचानकपणे मी कलाशिक्षण घेण्यासाठी सन 1985 मध्ये एक वर्ष राहीलो . ते एक वर्ष माझ्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करणारे , जाणीवा विकसित करणारे , जीवनाची जडणघडण करणारे व माणूस म्हणून जगताना माणुसकी शिकवणारे ठरले . म्हणून आजही कोल्हापूरला जायचे काही कारण निघाले की मी लगेच एका पायावर तयार असतो .
मी 1984 साली बारावी सायन्स शिकलो होतो पण यापुढे आपल्याला चित्रकार म्हणून जगायचे असे माझ्या मनाने फार गंभीरपणे ठरवले . त्यावर्षी तीन ठिकाणी मी प्रवेशअर्ज भरले होते . पुणे ,मुंबई व कोल्हापूराचे कलानिकेतन कॉलेज . इंटरमिजिएट परीक्षेत A ग्रेड व दहावीला फर्स्टक्लास मिळाला होता त्यामुळे कोणत्याही कलामहाविद्यालयात सहज प्रवेश मिळणार याची खात्री होती . पण चित्रकला क्षेत्रात घुसतानाच दुर्दैवाचे फेरे सुरु झाले . त्यावेळी बाबुराव सडवेलकर जेजे स्कूलचे डीन होते . त्यावर्षी त्यांनी एक नवा फतवा काढला की 12वी पास असणाऱ्या सर्व विद्यार्थीवर्गाला बी.ए , बीएससी , लॉ , किंवा इतर कोणत्याही शाखेत सहज जाता येईल . त्यामुळे यावर्षी प्रथम दहावीच्याच मुलामुलींना प्रवेश मिळणार , त्यापेक्षा जास्त शिकलेल्या इतरानां कोणालाही प्रवेश मिळणार नाही . त्यामुळे माझी चांगलीच गोची झाली . पाचगणीपासून पुणे जवळ होते त्यामुळे पुण्यात मला प्रवेश हवा होता . मुंबई तर खूपच दूर वाटायची त्यावेळी .
पुण्यात एक महिना धडपडलो व खूप निराश झालो .फौडेंशन हा बेसिक कोर्स असतो नंतर पुन्हा वेगळ्या कॉलेजमध्ये जाता येते हे समजल्यानंतर मी निदान कोल्हापूरला तरी प्रयत्न करावा असे ठरवले .
आयुष्यात पहिल्यांदा कोल्हापूरला आलो . बाबूराव पेंटरांचे चिरंजीव अरविंद मेस्त्री त्यावेळी प्राचार्य होते . त्यांनी निसर्गचित्रांचा गठ्ठा पाहीला आणि म्हणाले शासनाला काय येड लागलयं समजत नाही . ज्याला कलेची आवड आहे त्यानां प्रवेश द्यायचा सोडून फक्त दहावी पास असलेले घ्या हे चुकीचे आहे . मग सरांनी दोन दिवस थांब आपण प्रयत्न करू असे सांगितले . मग आयुष्यात पहिल्यांदा बाहेर राहण्याचा प्रश्न पडला . आता काय करावे ? या विचारात कोल्हापूर बसस्थानकावर बसून राहीलो . रात्री तेथेच झोपलो .
दुसऱ्या दिवशी चालत कळंबा येथे असणाऱ्या कलानिकेतन कॉलेजला पोहचलो तर अरविंद सर नुकतेच ऑफिसला येत होते . त्यांनी ऑफीसात बोलावले . रात्री कुठे राहीलास ? काय खाल्ले ? ओळखीचे कोणी आहे का याची प्रेमाने विचारपूस केली . मी ज्यावेळी स्टेशनवरच झोपलो हे ऐकून ते आश्चर्यचकीत झाले . त्यांनी मला सांगितले जा तुला फौडेंशनच्या वर्गात प्रवेश मिळाला असे समज . तुझी शिकायची जिद्द , चिकाटी मला आवडली . बघू पुढे काय होते ते , मी सांगतो तसे कर .
कोल्हापूरच्या कलामहाविद्यालयात मला प्रवेश मिळाला पण जगण्यासाठी अन्न व राहण्यासाठी छप्पर लागते . ते तर माझ्याकडे नव्हते व कोणी ओळखीचेही नव्हते . पण कोल्हापूरची माणसेच भारी . हळूहळू चारपाच कॉटबेसीसवर खोलीत राहणारे काही विद्यार्थी होते त्यांनी मला त्यांच्यात सामावून घेतले . मी साईनबोर्ड करायचो व निसर्गचित्रकार म्हणून मला कलाक्षेत्रात काम करायचे होते . स्वतःच्या पायावर उभे राहून पैसे मिळवून शिक्षण पूर्ण करायचे होते . मग मी व माझा मित्र दिपक सातार्डेकर कामासाठी भटकू लागलो . त्यावेळी छत्र्यांवर नाव टाकणे , सायकली डेकोरेट करणे , दुकानांचे बोर्ड रंगविणे , नाटकाची पोस्टर्स करणे , बंगल्याच्या दर्शनी भागावर घरांवर नावाच्या पाट्या लिहीणे अशी कामे मिळत . ती कामे मिळवत असताना ऐके दिवशी खासबाग मैदानाच्या समोरच्या पहिल्या मजल्यावर एक छोटी पाटी दिसली . पेंटर एस . निंबाळकर आर्ट्स आणि स्टुडीओ . मग उत्सुकतेपोटी नकळत मी पहिल्या मजल्यावर पोहचलो .
निंबाळकराच्या या स्टुडीओमध्ये एकच मोठी खोली होती . त्या दरवाज्या शेजारी एक लाकडी फोल्डींगचे इझल त्यावर माऊंट बोर्ड लावलेला होता . त्या इझलशेजारी एक मोठे टेबल त्या टेबलावर एका प्लास्टीकच्या ट्रे मध्ये असंख्य पोस्टर कलर्सच्या अर्धवट रंगानी भरलेल्या बाटल्या होत्या . जलरंगाचे असंख्य ब्रशेस , पाण्याची छोटी बादली , पॅलेटस व शेजारच्या लोखंडी रॅकवर व टिपॉयवर चित्रांची पुस्तके रचलेली होती .
पांढरा बिनबाह्यांचा बनियन , बुल्गानीन दाढी , अनेक रंगानी शितोंडे उडून मूळ रंग कोणता हे दिसत नसलेली पँट घालून डाव्या हातात सिगारेटचे झुरके घेत हे चित्रकारमहाशय एक दुकानाचा साईनबोर्ड ऑईलपेंटने रंगवत बसलेले होते .
मी त्यानां नमस्कार केला माझी ओळख सांगितली व तुमच्याकडे काही काम मिळेल का याची विचारणा केली . अरे वा ! तु पाचगणीचा का? लई बेस्ट स्पॉट ? लई भारी हाय बघ लँडस्केपसाठी . मी गेलो होतो . टेबललॅन्ड नावाचे पठार हाय बघ तेथे . एकदम बेस्ट . सिगारेटचे झुरके मारत साईनबोर्ड रंगविणारे एस. निंबाळकर पुढे कायमचे मित्र झाले . हळूहळू निंबाळकर मला त्यांची जास्तीचे काम द्यायचे . पण त्यांचे खरे प्रेम हे निसर्गचित्रे रेखाटनावर असायचे . पोटासाठी साईनबोर्ड व इतर रंगविण्याची कसलीही कामे करताना त्यांनी कधी लाज , शरम धरली नाही . किंवा मी मोठा चित्रकार आहे , जी डी आर्ट पेंटींग व कमर्शियल आर्ट शिकलो आहे तर अशी कामे का करू ? असा प्रश्नही त्यानां कधी पडला नाही . त्यांचा हा गुण मला जगण्यासाठी खूप उपयुक्त ठरला .
कोल्हापूरचे अनेक चित्रकार त्यांच्या स्टुडिओला येता जाता सहज भेट देत असायचे त्यांनी कधीच कोणाला रोखले नाही . अपॉईमेंट नावाची भानगडच त्यांनी ठेवली नाही . मुक्त प्रवेश व भरपूर कोल्हापूरी शिव्या घालून ते येणाऱ्या जाणाऱ्यांचे स्वागत करायचे . खूप लोकानां भेटायचे . पुण्या मुंबईतील चित्रकार फोन करून या म्हणायचे पण निंबाळकर त्यानां कधी फोन करायचे नाहीत . मी त्यानां एकदा विचारले की समजा तुम्ही त्या चित्रकाराच्या घरी गेला आणि तो तेथे नसला तर ? ते सहज म्हणाले सुनील , तुला सांगतो ही चित्रकारमंडळी म्हणजे लई म्हंजे लई म्हंजे लईच चतुर जात . तुम्ही त्यानां फोन केला की लई नाटकं करणार . खोटे तर लगेच बोलणार , लई बीझी हाय असं म्हणणार त्यापेक्षा डायरेक्ट भिडायचे . रिक्शा प्रवासाचे पैसे वाया गेले तरी हरकत नाय पण आजपर्यंत माझा अंदाज कधी चुकला नाही . ते पुण्यामुंबईत भ्रमण करत असताना अनेकानां भेटायचे व त्यानां मित्र करून टाकायचे . त्यामुळेच मलाही अनेक चित्रकारानां भेटायची गप्पा मारून नव्या गोष्टी समजून घेण्याचे व्यसन लागले .
त्यांच्याकडे अनेक चित्रांचे रेफरन्स बुक व फोटो कलेक्शन असायचे . कधी एका चित्रातील होडी घ्यायचे तर दुसऱ्या चित्रातील डोंगर घ्यायचे कधी तिसऱ्या रेफरन्समधून मंदीर घ्यायचे . कधी वातावरण निर्मितीसाठी इकडून तिकडून फिगर्स ढापायचे . या सगळ्यांचा परिपाक एक नवीनच स्पॉट किंवा निसर्गदृश्य साकारायचे . ते साकार करताना ते इतके एक्स्पर्ट झाले होते की चार पाच चित्रे एकत्र रंगवूनही कोणाला त्याचा पत्ता लागला नाही . कारण नवे चित्र खरेच वेगळे असायचे .अनेक कलाकारांच्या चांगल्या गोष्टी ते सहजपणे चित्रांत बेमालूमपणे घुसवायचे . कोणी प्रश्न विचारला तर भाबडेपणाने कोठून चित्रात काय घुसवले याची उकल करून सांगायचे .
एकदा कोल्हापूरला प्रसिद्ध चित्रकार प्रताप मुळीक यांचे प्रदर्शन भरवायचे ठरले . त्यावेळी मी त्यांच्याकडेच कामाला होतो . मग चित्र नेणे , रात्री डिस्प्ले करणे , चित्रांवर नंबर टाकणे , बाहेरचा कापडी बोर्ड , बॅनर , जाहिरातीचा फलक रंगविणे इत्यादी कामे करण्यासाठी त्यांनी मला सोबत नेले . सर्व कामे संपल्यावर म्हणाले आता मी माझ्या चुलत भावाकडे मुक्कामासाठी जातो . तु काय करणार आता ? आणि ते मला तेथेच सोडून निघून गेले .खरं तर माझे कोणी नातेवाईक नव्हते तेथे जे होते ते निंबाळकरांसारखे मित्र . त्यानां फोन करून बोलावले तर शाहू स्मारकला लगेच आले . म्हणाले काळजी करू नकोस आज माझ्या स्टुडीओत झोप , कोल्हापूरला आला होतास त्या स्टेशनावर झोपू नको . मुळीक कोल्हापूरचेच पण ते आता पुण्यात राहतात . माणसे बदलतात . तु पुण्यात चार वर्ष राहूनही पुणेकरांकडून काहीच शिकला नाहीस . त्यांनी स्टुडिओची चावी दिली व रिक्शाने आम्ही खासबागच्या स्टुडीओत आलो .एस .निंबाळकर असे फटकळ पण बिनधास्त खरे बोलणारे कोल्हापूरकर होते .
एकदा वडगावचे चित्रकार संपत नायकवडी व एस. निंबाळकर सातआठ दिवसांसाठी चित्र काढायला पाचगणीला आले होते . ते पावसाळ्याचे दिवस होते . आम्ही मस्तपैकी टेबललॅन्डच्या पठारावरच्या गुहेत , डालकेटच्या जुन्या इमारती , पाचगणीचे रस्ते , महाबळेश्वरच्या पॉईंटसवर जाऊन डोंगररांगांची चित्रे काढली . महाबळेश्वरला त्यांचे मित्र बाळू वेल्हाळ नोकरीला होते . त्यांच्याकडे मुक्काम केला व प्रसिद्ध ऑर्थरसीट पॉईंटला जाऊन छान वॉटरकलर केले . मग अचानक एस. निंबाळकर म्हणाले आपण ही चित्रे मांडून पॉईंटवर बसू या . कदाचित कोणी कलारसिक आपली चित्रे विकत घेतील . दोन तासानंतर कोणीही चित्र विकत घेत नाहीत हे पाहुन एस .निंबाळकर म्हणाले . आयला आपण महाराष्ट्रात जन्मलो हिच मोठी चुक झाली . त्यात सातारा जिल्ह्यात चित्र विकायचे म्हणजे राजस्थानाच्या वाळूत शेती करायला घेतल्यासारखे आहे . चित्रातून चित्रकार जगवला पाहीजे , चांगले चित्र भिंतीवर लावले पाहीजे याची भारतात जाणीव नाही . मग गरम भुट्टा (कणीस) खात निसर्ग पाहणाऱ्या लोकांकडे पहात ते म्हणाले . निसर्ग पाहायला येतात की भुट्टा खायला तेच कळत नाही .
चित्र विकण्यासाठी त्यांनी मग त्यांचा अनोखा फंडा सांगितला . एकदा मुंबईला भेटले तर म्हणाले चल तुला स्वस्तात रंग कुठे मिळतात ते दाखवतो . मग अतिशय गर्दी असलेल्या जुन्या बाजाराच्या दोन टाकी परिसरात घेऊन गेले . तेथे इतकी गल्ली बोळे व असंख्य वस्तू विकायला होत्या की फिरताना मी गांगरून गेलो . मग तेथेच एका अरुंद बोळात घुसून एका जुन्या इमारतीच्या गलीच्छ वस्तीत कंपनीचे वाया गेलेले रिजेक्टेट भंगारचे रंगाचे दुकान होते तेथे घेऊन गेले . अर्धवट भरलेल्या , रंग बाहेर पडल्यामुळे रिजेक्ट झालेल्या ट्युब्ज त्यांनी विकत घेतल्या . एका दुकानात बॉक्सबोर्डचे पेपर विकत घेतले . काही ब्रशेस घेतले . दोन तीन हजाराच्या त्या वस्तू मला दाखवून म्हणाले आता बघ याचे सहा महिन्यात दहापट पैसे करतो . सहा महिन्यानंतर ते परत आले व म्हणाले चल आता माझी करामत दाखवतो .
मुंबईत अनेक फ्रेम्समेकर्स आहेत , सदगुरु , पेटेंडरिदम , इंदू फोटोफ्रेम्स या मोठ्या शो रुम्समध्ये ओरीजनल चित्रे विकणारी मोठी व्यापारी मंडळी आहेत . त्याच्यांकडे एस .निंबाळकर प्लास्टीक फाईल्स किंवा कधी कापडी पिशव्या घेऊन जायचे . त्या पिशव्या दुकानाच्या मालकापुढे ठेवायचे . ते देतील ते पैसे घ्यायचे . घासाघीस नाही , वादविवाद नाहीत अशा चार पाच जणांकडे गेले की त्यांची सहा महिन्याची बेगमी पुर्ण व्हायची . चित्र काढण्यासाठी व जगण्यासाठी पैसे मिळाले यामध्ये ते खूष असायचे . त्यांनी कधीही मोठ्या चित्रकारांसारखे जगात नाव व्हावे , स्टाईलमध्ये जगावे , कोल्हापूरात नाव कमवावे , आपली चित्रे कोट्यावधी रुपयांमध्ये विकली जावीत अशी हाव धरली नाही . पायात साधी चप्पल , साधे शर्ट पँट व अस्ताव्यस्त अवतार त्यांनी कधी सोडला नाही . कोणावर इंप्रेशन मारण्याचे ध्येयच नसल्यामुळे आपल्या कलानिर्मितीत हा माणूस धुदंपणे जगला .
एकदा सावर्डे येथील चित्रकार प्रकाश राजेशिर्के यांनी कोल्हापूरजवळ पन्हाळा येथे संजीवन विद्यालयात चित्रकलेचा कॅम्प आयोजित केला होता . प्रत्येक चित्रकाराला राहण्याची सोय व दहा हजार रुपये मिळणार होते . मग मी व स्वाती प्रथमच अशा कॅम्पला गेलो . तेथे एस. निंबाळकर देखील आले होते . मग आम्ही पन्हाळ्यात पायथ्याशी छोट्या गावात चित्र काढायला गेलो . माझ्याकडे खुर्ची , ईझल , बोर्ड सर्व मटेरियल होते . पण निंबाळकर मस्त पायाची मांडी घालून मातीत निवांत बसले होते . पँट खराब होत होती पण त्याची त्यांना जराही पर्वा नव्हती . डाव्या हातात सिगारेट पेटत होती . त्यावेळी मस्तपैकी दोन घरे , त्याच्यां शेणाने सारवलेल्या भिंती , कौले , दोन कोंबड्या , दोन शेळया डोक्यावर लाकडांचा भारा घेऊन जाणारी बाई यांचे मस्तपैकी दोन तासात चित्रण करून निंबाळकर कोल्हापूरला एका दिवसातच परतले . जाताना स्टुडिओत भेटून जा म्हणाले .
त्यांच्या स्टुडीओचा पत्ता बदलेला होता . आता ते तिसऱ्या मजल्यावर शिफ्ट झाले होते . स्टुडीओची जागा बदललेली होती पण निंबाळकर बदलले नव्हते . त्यांच्या रहाणीमानाप्रमाणेच स्टुडीओतील रचना बदललेली नव्हती . त्याच अस्ताव्यस्त पसरलेल्या वस्तू , पुस्तके , भिंतीवरील अनेक टांगलेली चित्रे , तोच ईझल , तोच टेबल , तेच ते जुन्या बाजारातून आणलेल्या पोस्टर कलर्सच्या अर्धवट रंगानी भरलेल्या बाटल्या होत्या सिगारेटची अनेक थेटूक ॲश ट्रे मध्ये पडलेली होती आणि बाल्कनीमध्ये पोत्यात भरलेल्या रिकाम्या बाटल्या बघितल्यानंतर त्यांच्या रोजच्या जगण्याची पद्धत लक्षात आली . तेथेच मित्र उमेश नेरकर यांची भेट झाली .
कोणाशी शत्रूत्व नाही , कोणाशी वैर नाही , कोणाशी स्पर्धा नाही , कोणाशी तुलना नाही . कोणी मान अपमान केला तरी विचलीत झाला नाही असा हा वेगळाच आत्मा होता .आपल्या स्वतःची एक जीवनशैली निवडून फक्त चित्रांवर जगण्याचा काट्याकुट्यातील मार्गावर सर्वांसोबत हसून जगणारा कोल्हापूरचा हा अवलीया निसर्गचित्रकार आज अनंतात विलीन झाला . आता कोल्हापूरला गेलो की चित्रकार एस.निंबाळकर व त्यांच्या फोटोमुळे असंख्य आठवणी नेहमी आठवत राहतील . . . . .
चित्रकार : सुनील काळे✍️