गुरुवार, ७ एप्रिल, २०२२

मूर्त का अमूर्त ?

मूर्त का अमूर्त ?

            आपल्या या छोट्याशा आयुष्यात कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची माणसे भेटत असतात . काही जण मित्र म्हणून येतात तर काहीजण नातेवाईक म्हणून आयुष्यात येतात.  त्यातील थोडे रसिक असतात तर काही जण अरसिक . ते जसे असतात तसे त्यानां स्विकारावेच लागते . फक्त त्यांची एकदा खरी पात्रता कळाली की त्यांना जवळ किंवा दूर करण्याचे स्वातंत्र्य आपल्याला असते . 
           तर सांगायचे कारण म्हणजे माझा एक नातेवाईक आहे. त्याला कोणत्याच विषयाची आवड नाही . चित्रकला , शिल्पकला , नाटक , सिनेमा , वाचन , लिखाण किंवा इतर कोणत्याही कलांशी त्याचे सोयरेसुतक नसते . त्याचे कारण विचारले की तो म्हणतो मी म्हणजे सामान्य माणूस . सरकारी नोकरी मिळाली होती , ती इमानेइतबारे केली त्यामूळे कशाची आवडच निर्माण झाली नाही असे त्याचे उत्तर असते . आणि कोणतीही कला समजून घेण्याचे तो शिताफीने टाळतो पण अनेक गोष्टींवर वादविवाद मात्र नक्की करतो .
            एकदा माझे एक चित्र पाहून हे  मूर्त आहे का अमूर्त ? असा सतत प्रश्नांचा भडिमार त्याने सुरु केला होता . आज त्याच एका चित्राची गोष्ट थोडी विस्ताराने सर्वानां सांगतोय .
           चित्रकलेत जलरंग हे माध्यम बऱ्याच जणानां अवघड वाटते कारण त्यात चुका दुरस्त करता येत नाहीत .पण मला मात्र या माध्यमाचे हेच वैशिष्ट्य महत्वाचे वाटते व ते आव्हानच मला नेहमी नवे चित्र काढण्यास प्रेरीत करते . भारतात जलरंगातील चित्र काढण्याचा कागद 22 इंच बाय 30 इंच आकाराचा असतो त्यापेक्षा मोठा पेपरसाईज मिळत नाही . त्यासाठी मी फ्रान्सचा आर्चेस नावाचा अॅसिड फ्री पेपर वापरतो . तो 45" इंचाच्या रोलमध्ये मिळतो . हवा त्या साईजमध्ये कट करून वापरता येतो . असाच एक 
45" x 81" आकाराचा मोठा पेपरचा तुकडा माझ्याकडे शिल्लक उरला होता .
            या कागदावर मी पूर्वतयारी न करता सहजपणे चित्र काढण्यास सुरूवात केली . संपूर्ण पेपर भिजवला आणि आकाशाची पार्श्वभूमी पूर्ण केली . मला पाचगणीचे टेबललॅन्डचे पठार व सिडने पॉईंटचा परिसर आठवत होता त्यामुळे ते ठरवून मी दृश्य रंगवायला सुरुवात केली आणि अचानक मनात कोकणातील हर्णे बंदराच्या परिसरातील एक वेगळीच  दृश्यमालीका मला आठवू लागली . एकदा कोकणात रात्री उशीरा समुद्रकिनारी फिरत होतो . बंदरावर दोन मोठ्या आकाराच्या अक्राळविक्राळ बोटी उभ्या होत्या . त्या नुकत्याच मोठा प्रवास करून मासेमारी करून आल्या होत्या . मग स्थानिक व बाहेरच्या विकत घेणाऱ्या मोठ्या व्यापाऱ्यांची बोलणी व लिलाव सुरु झाले . ज्यांनी लिलाव घेतले त्यांनी ते छोट्या व्यापाऱ्यांना विक्री करण्यास सुरुवात केली . मोठा जल्लोष व उत्साह भरला होता वातावरणात . लगबिगीने कोळीजमातीचे बांधव त्यांच्या कासोटा घातलेल्या बायका डोक्यावर टोपल्या, हातात कंदील किंवा बॅटरी घेऊन मासे भरत होते . मोठ्या बोटीने दोरी बांधून छोट्या बोटीत मासे उतरवत होते . बोटीवरच्या इंजिनमूळे रंगीत लाईटी चमकत होत्या , समुद्राच्या लाटा उसळत होत्या त्याचा तो वेगळा नादभरलेला घनगंभीर आवाज मला ऐकू येत होता . एका वेगळ्याच विश्वात मी रममाण झालो होतो. डोळे व मन जणू चित्रपट पाहत असल्यासारखे सगळी दृश्ये स्मृतीपटलावर चित्रित करण्यात व्यस्त झाले होते .
            हे सगळे विचार डोक्यातून कागदावर सहज मुक्तपणे रंगाद्वारे  उमटत होते . आणि हे आकार आपोआप माझ्या कळतनकळतपणे कागदावर दृश्यरूपाने आपआपली जागा पकडत होते. कोळ्यांचा हा जीवनप्रवास मला रंगीत वाटला मग चित्राच्या शेवटी मी छोट्या वेगवेगळ्या लाल , पिवळा , हिरवा , जांभळा , भगवा , काळा , पांढरा ,अशा रंगीबेरंगी तुकड्यांनी रंगवून चित्राचा शेवट पूर्ण केला .
अर्ध्या एक तासात एक वेगळीच कलाकृती दृश्यरूप घेऊन पूर्ण झाली . 
मी Mojarto art.com या वेबसाईडवर ती कलाकृती विक्रीसाठी ठेवली  व इतर कामात विसरूनही गेलो.काही दिवसांनंतर ते चित्र विकले गेले . 
          खूप दिवसानंतर केरळच्या एका अज्ञात माणसाचा फोन आला . ज्याने ते चित्र विकत घेतले होते व आता तो परदेशात स्थायिक झालेला होता. त्याने बऱ्याच प्रयत्नाने  मला शोधून खूप उशीरा रात्री फोन केला.
           कित्येकवर्ष  केरळात समुद्रकिनारी घालवलेले माझे सगळे बालपण ,तरुणपण व म्हातारपण मला त्या चित्रात दिसले . खूप खूप आनंद झाला .

            ते चित्र मूर्त आहे की अमूर्त ? हा प्रश्नच मला पडला नाही .

            " तुमचे हृदयापासून काढलेले चित्र माझ्या हृदयापर्यंत पोहचले " .

आणि त्याने फोन ठेवला .

चित्र , शिल्प , गायन  , लेखन , कविता , चित्रपट , फोटोग्राफी , नृत्यकला किंवा इतर कोणतीही कला असो . ती कधी भावते ?
           जेव्हा एक कलाकार हृदयापासून कलानिर्मिती करतो त्यावेळीच . त्या कलाकृतीतील आकार , रंग , रेषा ,पोत , विषयाची मांडणी अगदी सहजपणे दुसऱ्या माणसाच्या हृदयापर्यंत  पोहचते , ती कलाकृती मनातल्या भावभावनांना , पंचइद्रियांना तृप्त करते . अगदी मन व शरीराच्या सर्व रंध्रारंध्रात  शिरून सगळीकडे चिरंतन शांतता , पूर्ण व तृप्तीचे समाधान निर्माण करते . एक अनामिक बेभान मंत्रमुग्ध वातावरण मनात निर्माण करते .  त्यावेळी भांडत बसायचे नसते . फक्त समजून घेत घेत पंचइंद्रियांनी 
त्या कलाकृतीचा फक्त आस्वाद घ्यायचा असतो .
मग अशावेळी मूर्त का अमूर्त हा प्रश्नच निर्माण होत नाही . 
कारण तो प्रवास असतो
 
हृदयापासून हृदयापर्यंत . . . . . . . . . . . .
हृदयापासून हृदयापर्यंत . . . . . . . . . . . . 

💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞

सुनील काळे
9423966486

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड =Part 2

दूरदेशीची मैत्री - पार्ट 2 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝           24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम ...