शुक्रवार, २ जुलै, २०२१

कॅलिग्राफीचे दिवस

कॅलिग्राफीचे दिवस
✍️✍️✍️✍️✍️✍️   
          एकदा वाईच्या बँकेमध्ये काही कामासाठी गेलो होतो . माझ्या  घराचे बांधकाम चाललेले होते त्यामुळे अनेक जणांना चेकने पैसे द्यावे लागायचे . अशावेळी एक दिवस बाहेरच्या शिपायाने मला थांबवले व तुम्हाला बँकेचे प्रमुख मॅनेजर यांनी केबिनमध्ये बोलावलेले आहे असे सांगितले . मी आश्चर्यचकित झालो . कदाचित लिहताना दिलेला चेक चुकला असावा किंवा काही वेगळे काम असावे असा अंदाज करत मी आत गेलो . मॅनेजर साहेबांनी मला पाहताच उठून अभिवादन केले आणि मला बरेच दिवसांपासून तुम्हाला भेटायचे होते असे सांगितले . मी त्यांना काय काम आहे ? असे विचारले असता तुमचे सगळे चेक मी काळजीपूर्वक पाहतो . त्या चेकवरचे हस्ताक्षर मला खूप आवडते .म्हणून मी शिपायाला सांगून ठेवले होते की तुम्ही बँकेत कधी आला तर मला जरूर भेट करून द्या . आज खूप दिवसांनी योगायोग आला . तुमच्या चेकवरचे हस्ताक्षर आणि सही पाहून मलाही अशा पद्धतीची वेगळी सही शिकायची आहे तर त्यासाठी काय करावे लागेल ?
         मला या शनीवार ,रविवारी रिकामा वेळ आहे . कॅलिग्राफी या दोन दिवसात  जमेलच ना ? थोडे तुमचे मार्गदर्शन हवे होते
          असे दोन दिवसात कॅलिग्राफी शिकण्याचा उत्साह व आत्मविश्वास पाहून मी अचंबितच झालो. मला असे विचारल्यानंतर काय उत्तर द्यावे ते सुचलेच नाही . त्यांनी केबीनमध्ये मागावलेला चहा पीत असतानाच मला कॅलिग्राफीचे माझे दिवस आठवायला सुरुवात झाली .
          तो  शाळेत असतानाचा काळ आठवला .  मला कॅलिग्राफी हा शब्दही माहीत नव्हता .परंतु आपले अक्षर जास्तीत जास्त चांगले काढण्याचा मी नेहमी प्रयत्न करायचो . पुढे चित्रकलेचा नाद लागला परंतु वडीलांनी कधीही रंगाची पेटी व साहीत्य दिले नाही . मग आपणच आपल्या चित्रांचे साहित्य स्वकमाईतून कमवायचा मला ध्यास लागला . पूर्वी फ्लेक्स नव्हते . सगळेजण ऑईलपेंटने रंगवलेले बोर्ड करायचे मग मी देखील साईन बोर्डाची कामे करायला लागलो .
         पाचगणीत हनुमान गल्ली मध्ये वसंत पेंटर नावाचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते.  थोडी बुटकी शरीरयष्टी , केसांचा कोंबडा , साधा शर्ट आणि पँट आणि त्यांच्या हातामध्ये सतत एक पिशवी असायचीच . या पिशवीमध्ये रंगाचे सगळे सामान घेऊन ते साईन बोर्ड करायला जायचे . मग मी त्यांच्या पाठोपाठ जायला सुरुवात केली . हळू माझी भीड चेपली व मी त्यांना वसंतमामा म्हणू लागलो . मला साईनबोर्डाचे काम शिकायचे आहे असे सांगितले , त्यांनाही कोणी तरी फुकटचा जोडीदार पाहिजेच होता . त्यांच्याबरोबर LT लार्सन अँड टुब्रो , सेंट पीटर स्कूलच्या असेंब्ली हॉलचे बोर्ड ( नंतर याच शाळेत मी कलाशिक्षक म्हणून चार वर्ष काम केले ) , वाडीलाल साराभाई संघवी आरोग्यभवन ,  प्रोस्पेक्ट हॉटेल , इल पलाझो हॉटेलचे बोर्ड  व इतर गावातील दुकानांचे साधे बोर्ड आम्ही रंगवायचो . म्हणजे मी बोर्ड स्क्रॅपरने घासायचो व ते रंगवायचे .वसंत पेंटर मनाने चांगले असले तरी खूप कंजूष होते . ते मला एकही रुपया  द्यायचे नाहीत मग हळूहळू मी निराश होऊन स्वतःची बोर्ड रंगविण्याची कामे करायला लागलो . सगळ्यात मोठा बोर्ड म्हणजे आमच्या घरावरच्या मजल्यावर राहणाऱ्या लिंगांण्णा पोतघंटे यांचा दोन बाय पंचवीस फुटांचा दीपक ड्रायक्लीनर्स नावाचा इंग्रजी बोर्ड . दोन फूट आकाराचे एकेक डेकोरेटीव्ह लेटरींग करताना माझी चांगली दमछाक झाली . त्यासाठी शिडीवर उभे राहून लेटरिंग करायला लागायचे . फक्त रात्री काम करायचो त्यामूळे पंधरा ते वीस दिवस लागले कारण मला कामाचा स्वतंत्र अनुभव नसतानाही जिद्दीने मी तो बोर्ड पूर्ण केला .  बोर्ड झकास झाला. पुढे तो बोर्ड पाहून मला VXL जाम या रुस्तम दुभाष यांच्या साईनबोर्डांची मोठी ऑर्डर मला मिळाली . (आता केमरॉन दुभाष व्हेलोसीटी एन्टरटेनमेन्टस भोसे  यांचे आजोबा ) ह्या मिळालेल्या पैशातून मी चित्रकलेचे सामान विकत घ्यायचो.
            कोल्हापूरला कलानिकेतन महाविद्यालयात गेल्यानंतर कॅलिग्राफी या विषयाची  असाइनमेंट आम्हाला भोसले मॅडमनी दिली . 
ब्राह्मणे बाळबोध अक्षर ।
घडसुनी करावे सुंदर ॥ 
जे देखताची चतुर ।
समाधान पावती ॥ 
           या वाक्याचे पेन्सिल , बोरू , पेन ,कटनीप यांच्या साह्याने सुलेखन करायचे .आणि त्याला "कॅलिग्राफी " म्हणजे सुंदर हस्ताक्षराची कला असे म्हणतात हे प्रथम कळाले . वाचनीयता हा अक्षर सौंदर्याचा प्राथमिक घटक आहे हे ही कळले. सुलेखनामागे प्रामुख्याने कलात्मक उद्दीष्टे व प्रेरणा असतात आणि दर्शकाला सौंदर्यानुभुती व उच्च प्रतीचा कलात्मक आनंद देण्याची भुमिका असते. त्यामूळे सुलेखन हा एक ललित कलाप्रकार मानला जातो.
           पुढे पुण्याला आल्यानंतर कमर्शियल आर्ट शिकताना प्रा.मिलिंद फडके व प्रा . बाबू उडुपी यांची कॅलिग्राफी पाहून मी खूपच खूप प्रभावित झालो होतो . चिन्हच्या एका मासिकांमध्ये प्रसिद्ध   कॅलिग्राफर अच्युत पालव यांचा एक सुंदर लेख आला होता . तो वाचल्यानंतर मी त्यांना राजकोटवाला चाळ लालबाग येथे भेटायला गेलो . त्यांची कॅलिग्राफी पाहून , त्यांचा ध्यास , तळमळ व कामाचा सपाटा पाहून कॅलिग्राफी नावाचे भूत माझ्यामध्ये वेगाने संचारले . फार पछाडून गेलो होतो कॅलिग्राफीमूळे . नंतर सुलेखनाचा मग सतत सराव करायला सुरुवात केली . 
           पुण्यामध्ये अभिनवला शिकत असताना जवाहर आर्ट या नाना पेठेतील साईन बोर्डच्या दुकानांमध्ये मी जगण्यासाठी पैसे कमवायचो .
         कॅलिग्राफी हा शब्द मूळ ग्रीक Kalligraphia (कॅलिग्राफीया ) ह्या 
" सुंदर अक्षर " या अर्थाच्या शब्दापासून उत्पन्न झालेला आहे .फार प्राचीन काळापासून सुलेखनाची दोन गटांमध्ये विभागणी होत आली आहे एक व्यवहारोपयोगी व दुसरी अलंकरणात्मक .
       आपण जे रोजचे वेगाने लिहीत असतो त्याला कॅलिग्राफी म्हणता येणार नाही कारण कॅलिग्राफी करायची म्हणजे प्रत्येक अक्षराला नेत्रदीपक ,सुंदर , सुवाच्चता ,सुस्पष्टपणे सादर करण्याची लिपी होय . नेत्रसुखदता , सौंदर्य, व 
वाचनसुलभता यांचा आदर्श ,परिपुर्ण सुरेख मेळ साधलेला दिसून येतो .
कॅलिग्राफी म्हणजे सुंदर अक्षरांची माळच . यामध्ये प्रत्येक अक्षरांमध्ये एकमेकांचे साधर्म्य शोधायचे व ते साधर्म्य साधत वेगळ्या पद्धतीने  मुक्तपणे वळणदार अक्षरे काढायची . हळूहळू त्या अक्षरांचा सराव करत स्वभाव ओळखायचा ही सगळी अक्षरं एकमेकांमध्ये गुंफली की अक्षरांचा समुह एक वेगळेच स्वरूप धारण करतो आणि त्यातील सुसंबंधता , सुसुत्रता जपली की अक्षरे पाहणाऱ्याला आनंदाने मनाला मोहून टाकतात . अक्षरांची नेमकी व सुबक घडण , वेगवेगळ्या सुट्या अक्षरांची वा घटकांची सुसंघटीत क्रमबद्ध रचना, तसेच प्रमाणबद्ध व सुसंवादी एकात्म मेळातून साधलेले कलात्मक अक्षराकृतिबंध हे कॅलिग्राफीचे स्वरूपवैशिष्ठय म्हणता येईल . त्यामूळे कॅलिग्राफीला चित्रकलेच्या बरोबरीनेच उच्च दर्जा व प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. पक्षांच्या पिसांच्या लेखण्या , बोरू , वेगवेगळ्या आकाराचे कुंचले , टाक , पेन , निबांचे टोकदार , गोलाकार , तिरपे , चपटे , यासारखे विविध प्रकार , वेगवेगळ्या रंगीत शाई , जलरंग , तैलरंग
अक्रॅलिक कलर्स इ. अनेक साधने सुलेखन करण्यासाठी वापरली जातात .
         भारतात मुद्रणपूर्व काळात हस्तलिखित , पोथ्या , पुराणातील धार्मिक ग्रंथाच्या सजावटीतून , इस्लामी , मोगल संस्कृतीत कुराणाच्या लेखन सामुग्रीत कॅलिग्राफीची कला जोपासली गेली . जैन , बौद्ध हस्तलिखितांमूळे जगाला भारतीय सुलेखनशैलीची ओळख झाली . चीन जपान , तिबेट येथील मठांत व देवळात पारंपारिक पद्धतीचे सुलेखन अद्यापही अत्यंत श्रध्देने केले जाते.
           १९व्या शतकात मुखपृष्ठ सजावटीत व अक्षरांलकरणात विकासात्मक बदल होत गेले . ग्रंथाप्रमाणेच वृत्तपत्रे , नियतकालिके यांची शीर्षक , लेखशीर्षके , मथळे , उपशीर्षके , अशा सर्वच घटकांत कलात्मक ,अलंकरणात्मक कॅलिग्राफी दिसू लागली . नाटक , जाहिराती , पोस्टर्स , वृत्तपत्रीय जाहिराती . अशा अनेक माध्यमात विपुलतेने व वैविध्यपूर्ण रितीने कॅलिग्राफीचा वापर केला जातो .
         कॅलिग्राफीच्या या ध्यासामुळे  माझी कितीतरी चांगल्या लोकांची ओळख झाली . मी जिथे राहत होतो त्या हॉस्टेलजवळ प्रसिद्ध चित्रकार प्रताप मुळीक राहायचे .त्यावेळी त्यांची अमर चित्रकथासाठी केलेली कॉमिक्स खूप प्रसिद्ध होती . ह्या कॉमिक्समध्ये चित्रांतील संभाषण लिहिण्याचे , कॅलिग्राफी करण्याचे काम मी मिळवले ,काही दिवस ते मी करत होतो . ही कॅलिग्राफी करत असतानाच मला त्यांचा शरीरशास्त्र व माणसांची चित्रे काढण्याचा  अलौकिक ध्यास पाहून मी खूपच प्रभावित झालो .पण नंतर ते हैद्राबादला काही वर्षांसाठी गेले व माझा कॉमिक्सचा अभ्यास संपला. पण त्यावेळी रामानंद सागर यांची रामायण ही प्रसिद्ध मालीका सुरु होती . मुळीकांमूळे मीही अभ्यासासाठी त्याची प्रतिकृती पूर्णपणे हस्तलिखित चित्रे काढून पूर्ण केली होती. त्या कॉमिक्सची ओरिजनल डमी आज खूप तेहतीस वर्षांनी अचानक सापडली.  तिथेच माझी मिलिंद मुळीकची भेट झाली व नंतर आम्ही निसर्गचित्रांमध्ये रमलो .
         कॅलिग्राफीमुळे पुण्याचे प्रसिद्ध स्कायलाइन आर्किटेक्टचे मालक 
श्री .रमेशभाई गुजर यांची कामामूळे माझी अचानक भेट झाली . त्यांनी मार्केटयार्ड जवळ नवीन ऑफिस चालू केले होते . आणि त्या ऑफीसच्या स्थलांतराची पत्रिका कॅलिग्राफीमध्ये करायची होती . संपूर्ण पत्रिका प्रिंट झाली आणि नंतर त्यांच्या लक्षात आले की त्या प्रत्येक पत्रिकेवर  चुकून " श्री " शब्द लिहायचे विसरून गेले आहे .म्हणून हा "श्री " शब्द  लिहिण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो .त्यादिवशी रमेशभाईंबरोबर असलेल्या सौ . प्रविणाभाभी व त्यांच्या इतर सर्व कुटूंबियाची ओळख पुढे घट्ट मैत्रीमध्ये रुपांतरीत झाली आणि ती सर्वांबरोबर आजही एकतीस वर्ष टिकून आहे .
          कॅलिग्राफी करताना अक्षरांमध्ये जो जिवंतपणा येतो तो आणताना मन भारावून जाते , आणि किती लिहू याचे भानच राहत नाही . त्यामूळे मी त्या काळात खूप जणानां पत्रे लिहायचो .आजही मला कॅलिग्राफी करायला आवडते . तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी प्रत्यक्ष कॅलिग्राफी करताना जो आनंद मिळतो त्याची तुलना मला शब्दात करता येणार नाही .         
          मला अच्यूत पालव  किंवा इतर कोणीही  प्रत्यक्ष समोर बसवून कॅलिग्राफी कधीही  शिकवली नाही पण त्याच्यां कामातूनच ती शिकवण आपोआप झाली  अच्यूत पालव यांच्या ओळखीमूळे मला संघर्षाच्या काळात सिनेमा होर्डींग करणाऱ्या ' बाळकृष्ण आर्ट '  या दादरच्या पाटीलवाडीतील  कंपनीत सहा महिनेकाम करण्याची मोठी संधी मिळाली . त्या सिनेमा होर्डींगच्या धम्माल अनुभवांबद्दल नंतर कधीतरी सविस्तर लिहावे लागेल .
         आजही मला कॅलिग्राफीचे दिवस आठवले की  प्रा. मिलिंद फडके यांचे स्वच्छ, सुंदर , नीटनेटके  हस्ताक्षर आठवते , प्रा .बाबू उडूपी यांची बिनधास्त झोकदार , वळणदार मुक्तपणे साकारलेली अक्षरे आठवतात व कॅलिग्राफर मास्टर अच्युत पालव यांचे व त्यांच्या कॅलिग्राफी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे पुण्याच्या राजा रविवर्मा आर्ट गॅलरीत भरलेले 
" कॅलिफेस्टीवल " या प्रचंड मोठ्या व जबरदस्त , असंख्य कॅलिग्राफी प्रयोगांचे प्रदर्शन आठवते  व मनात आनंदाच्या सुखद लहरी  निर्माण होतात . त्यांचे कॅलिग्राफीच्या क्षेत्रातील कौशल्य अफलातून आहे. ते कौशल्य खूप खडतर साधनेतून निष्ठेतून आलेले आहे . त्यांचे सुलेखनातील योगदान ,कार्य ,अतुलनीय व अविस्मरणीय आहे. त्यासाठी आदराने त्यानां मनातून मी नेहमी सॅल्यूट ठोकत असतो .
          या अशा ज्ञात व अज्ञात वेळोवेळी भेटलेल्या सर्व कॅलिग्राफीच्या गुरुनां मी मनातून नेहमी  मनःपूर्वक वारंवार अभिवादन करत असतो . कारण सुलेखनात प्राविण्य मिळविण्यासाठी या कलाकारांनी आपले संपूर्ण आयुष्य झोकून दिलेले आहे . आणि आजही ते सतत त्यांच्या ध्यासात नवनवीन प्रयोग करत मग्न असतात. कला ही गोष्ट  फक्त दाखविण्यासाठी नसून आयुष्य जगताना प्रत्येक क्षण हा कलेचाच एक भाग आहे असे समजणारी ही मंडळी सर्वानांच आदरनीय आहेत म्हणून ते सर्वानांच भावतात .

        आणि बँकेचे मॅनेजरसाहेब सहज विचारत होते दोन दिवसात मला थोड्या सरावाने कॅलिग्राफी सहज जमेलच की ? 
आता यावर काय उत्तर देणार मी ? 
आणि काय बोलणार ? 
      
           या लेखासोबत त्यावेळी शिकत असताना कॅलिग्राफीच्या भरपूर केलेल्या सरावाचे थोडेसे नमूने व  रामायण कॉमिक्सचे संपूर्ण रंगीत हस्तलिखित नुमन्यांचे फोटो व काही जणानां पाठवलेल्या पत्रांचे नमूने जोडले आहेत .

✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
सुनील काळे 
9423966486

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड =Part 2

दूरदेशीची मैत्री - पार्ट 2 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝           24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम ...